केरळमध्ये त्रिवेंद्रम जवळ पूवर नावाचे गाव आहे. साधारण तास-दीड तास लागतो तिथे पोहोचायला. तिथे प्रवाशांसाठी बॅक वॉटर सहलीचे आयोजन केले जाते. तिथे जवळच इश्चुरी आयलँड नावाचे रिसॉर्ट आहे. तिथे राहायची सोय आहे. पण दिवसभराच्या सहलीसाठीही आपण तिथे जाऊ शकतो.
आम्ही जून 2016 मध्ये त्रिवेंद्रमला जावई आणि मुलीकडे गेलो होतो तेव्हा या रिसॉर्टला भेट दिली. जावयाच्या गाडीतून आम्ही दिवसभरासाठी तिथे गेलो होतो. इथे राहण्यासाठी अतिशय आरामदायी आणि सुंदर वास्तुरचना असलेल्या खोल्या आहेत. सर्व परिसर हिरवागार आहे. नारळाची झाडे, विविध फुलझाडे, रिकाम्या जागेत लावलेली हिरवळ यांनी तिथले सौंदर्य अजूनच खुलते. या सौंदर्याला शांततेची किनार आहे म्हणूनच गेल्या क्षणी हे ठिकाण मनास आनंद देते.
इथे पोहण्यासाठी तलाव, मोठे जेवणघर, नारळाच्या झाडांना बांधलेले झोपाळे, समुद्रकिनाऱ्यावर बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या, अधेमधे बसण्यासाठी शाकारलेले तंबू, बाके अशी सर्व सोय आहे.
पर्यटकांना खेळण्यासाठी कॅरम, पत्ते आहेत. छोटे वाचनालय, केरळी वस्तूंच्या विक्रीचे दुकान, आयुर्वेदिक उपचार व मसाज केंद्र, योगासन केंद्र इत्यादी विविध सोयी आहेत.
थोडक्यात केरळची एक झलक किंवा एका दृष्टीक्षेपात केरळ असे तिथे गेल्यावर वाटते. या रिसॉर्टमध्ये देऊळ नाहीये पण देवळात असते तशी कमालीची शांतता आणि स्वच्छता इथे आहे. जणू आकाशाचा मांडव आणि समुद्राचा पाट करून त्यात तो निर्गुण निराकार ईश्वर आहे ज्याने ही सृष्टी सगुण साकार केली आहे. समोर वाळूची महिरप, नारळाच्या झाडांची रांगोळी असा सगळा थाट आहे.
इथे पाहायला मिळणारी अत्यंत दुर्मिळ गोष्ट म्हणजे इथे नेय्यार नावाची नदी, एक तळे आणि समुद्र एकाच ठिकाणाहून आपल्याला न्याहाळता येतात. या रिसॉर्ट च्या कडेला सर्व इमारतींना पाठ करून उभे राहिले की जे दृश्य दिसते त्याला तोडच नाही. एका वळणावर नेय्यार नदी जी लवकर समुद्राला मिळते, समोर रिसॉर्ट तर्फे बांधलेले पण बरेचसे नैसर्गिक तळे आणि मध्ये वाळूचा सोनेरी पट्टा, त्याही पलीकडे असलेला विस्तीर्ण समुद्र.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात समुद्र देखणा दिसतो. देवाने त्याचे पाचूचे अलंकार स्वच्छ करण्यासाठी समुद्रात बुचकळून धुतले अन् समुद्राला पाचूचा रंग चढला असे वाटते. अगदी नितळ हिरव्या निळ्या रंगाचे पाणी बघून भान हरपते.
गेल्यागेल्या स्ट्रॉबेरी मिल्क शेक पिऊन आम्ही तिथल्या आवारात हिंडत होतो. गप्पा मारताना अचानक ढग दाटून आले आणि एक सर कोसळली. हवेच्या बदलणाऱ्या वासामुळे वातावरण सुगंधित झाले. समोर समुद्राचे पाणी, वरून पडणारे पावसाचे पाणी, नेय्यार नदीची समुद्राला जाऊन मिळते याची लगबग, तळ्यातले शांत पाणी, लाटांचा पांढरा फेसाळ दंगा- एकाच पाण्याची विविध रूपे ! मग पाऊस थांबून ऊन आले आणि वाफेच्या रुपातले पाणी, न दिसणारे पण गरम हवेमुळे जाणवणारे हेही एक रूप लक्षात आले. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो.
शाकाहारी जेवणात सॅलड, सूप, भाज्या, पराठे, भात काही केरळी पदार्थ, दोन-तीन गोड पदार्थ आणि शेवटी आईस्क्रीम. समुद्राच्या साक्षीने चवीचवीने जेवण झाले. मग समुद्राकाठच्या खुर्च्यांवर निवांत बसलो. थोडे पायी गेलो. काही खरेदी झाली. दुपारचा चहा आणि भजी असा बेत होता. मग तिथे व्यवस्था असलेल्या बोटीने साधारण वीस-पंचवीस मिनिटातच आम्ही समुद्रकिनाऱ्या कडे पोहोचलो. आता तो पाचूचा समुद्र अगदी समीप आला होता. एका पाठोपाठ एक लाटा उसळत होत्या. शेवटच्या टप्प्यावर त्या अगदी उंच व्हायच्या. नागाच्या फण्यासारखा आकार घेत धाडकन खाली कोसळायच्या आणि क्षणार्धात त्याचे रुपांतर पांढर्याशुभ्र फेसात व्हायचे.
लाटांचा आवाज, त्यांचा जोश, त्यांचा अखंड प्रवास या लयीची एक गुंगी आली मनावर. तिथून निघावेसेच वाटेना. परत जाण्यासाठी म्हणून बोटीकडे निघालो तर काय ! आता आमची समुद्राकडे पाठ होती समोर रिसॉर्ट, तळे आणि नदी विसावलेले होते. सूर्य मावळू लागला होता. उन्हाला सोनेरी झळाळी आली होती. समोर आकाशाला भिडणारी एकमेकांना खेटून उभी असणारी नारळाची झाडे किंचित कमरेत आणि मानेत झुकून समुद्राकडे पहात होती. सूर्याचे सोनेरी किरण वाळूला स्पर्श करताच वाळू चमचम करू लागली आणि गोल्डन सॅण्ड बीच हे नाव अगदी सार्थ झाले. वरती निळसर तांबूस आकाश, भोवताली हिरवे निळे पाणी, मध्ये वाळूचा सोनेरी पट्टा, समोर झाडांची हिरवी गर्दी- आम्ही मंत्रमुग्ध झालो. भारावून गेलो. मग बोटवाल्याने हाक दिली. पायाला गुदगुल्या करणाऱ्या वाळूतून चालू लागलो.
त्या चिमुकल्या वाळूच्या पट्ट्यावर अननस, आईस्क्रीम, शहाळी इत्यादीच्या विक्रीच्या हातगाड्या होत्या. शांतपणे बोटीत बसलो आणि नंतर गाडीने घरी आलो. पण तिथे पाहिलेले दृष्य मनावर कोरले गेले ते कायमचेच आणि अजूनही त्या आठवणी मनाला खूप आनंद देतात.
मला वाटते की इथे देवाने त्याच्या जवळील निळ्या कागदावर हिरव्या शाईने काही चितारून ठेवले आहे की हिरव्या वस्त्रावर निळी नक्षी काढून तो इथेच विसरला आणि या देवभूमी चा जन्म झाला ? हिरव्यावर निळे का निळ्यावर हिरवे असे कोडे येथे पडते. पण ते कोडे सुटण्यापेक्षा त्यात गुंतून राहण्यातच मजा आहे.

– लेखन : मेधा जोगदेव
– संपादन : अलका भुजबळ 9869484800
वाह,फारच सुंदर लिखाण!! इश्चुरी आयलँड ची सफर करून आले असं वाटलं हा लेख वाचून.😊
मेधा फार सुंदर वर्णन केलं आहेस फोटो पण खूप छान, त्यामुळे लेखाला अधिकच उठाव आलेला आहे. लिहित रहा, अनेक शुभेच्छा.