लोक साहित्याच्या संशोधक, अभ्यासक, लेखिका दिवंगत सरोजिनी बाबर यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, त्यांच्या भगिनी कुमुदिनी पवार यांचे गेल्या महिन्यात, २ सप्टेंबर रोजी निधन झाले.बोलता बोलता महिना झाला. या निमित्ताने त्यांचे सुहृद श्री संजय पाटील यांनी जागविलेल्या काही आठवणी…. आदरणीय कुमुदिनी पवार यांना आपल्या पोर्टल तर्फे भावपूर्ण आदरांजली.
– संपादक
समाज शिक्षण मालेतील बरीच पुस्तकं कुणी ना कुणी घरी घेऊन यायचं.. त्यातल्या एका लेखिकेचं कुठलंसं पुस्तक वाचलेलं… कोणतं ते काही आत्ता आठवत नाही..
हायस्कूलला होतो.. पुस्तकातल्या भाषेनं खेचून घेतलेलं… मराठमोळी,
अस्सल वाणाची, लाघवी, टपोरेदार देखणी आणि जातिवंत मधाळ भाषा…अहाहा ss..
लेखिकेचं नाव, कुमारी विद्या देसाई…
वाटायचं, आपल्या घराण्यातली हीच मूळ भाषा..
जुनी जाणती माणसं असंच तोंड भरून बोलायची.. रक्तातून ओढ लागल्यागत झालं.. नंतर याच लेखिकेची आणखी काही पुस्तकं हातात पडली.. अक्षरशः नादावलो…
कोण असेल ही ? कुमारी विद्या ?
नावाप्रमाणं लहानच असणार वयानं…
किती समज.. कसं मनातलं, मनाजोगं बोलतीय..
माझ्यासमोर सदानकदा तीच उभी.. समंजस.. खानदानी…
नंतर मालेतली डॉ. सरोजिनी बाबर यांची काही पुस्तकं वाचली… भाषा तीच.. वळण तेच.. आदब तीच… पिकल्या सिताफळागत गोड….
म्हटलं असं कसं ?.. पण तसंच….
कळलं.. विद्या देसाई म्हणजेच सरोजिनी बाबर.. महाराष्ट्राची आक्का…
जमेल तसं वाचत गेलो..
ठरवलं.. आक्कांना भेटायला हवंच..
एक दोनदा आकाशवाणीत आलेल्या.. आल्या तशा लहान पोरांच्या डोक्यात टपला मारल्यागत, सगळ्यांचा आलामला घेत, पायात भिंगरी लावल्यागत, खट्याळ पोरीवानी स्टुडिओभर बागडलेल्या…
मुलाखत कसली ? आख्ख गाणं, खुर्चीत बसून बोलतेलं.. झुलतेलं…
स्टुडिओत कणीदार सूर घुमायला लागलेला.. पंचमीच्या फेराचा धुरळा उठल्यागत झालेलं.. टाळीच्या रापरिपीनं, घुमारा धरल्यावानी माहौल..
आक्का एकट्याच ..पण जात्याच्या मुखातनं भुरुभुरू पीठ सांडल्यावानी अखंड वाणी…
दुरूनच दर्शन झालं.. आक्कांशी बोलणं झालं नाही.. मात्र भेटावं वाटायचं.. कातर ओढ लागलेली..
एकदा बोलता बोलता बायको म्हणाली..
“कधी गेलात पुण्याला तर जाऊन या.. आक्कांच्या बहीण आहेत कुमुदिनी पवार.. त्यांची सून म्हणजे संकपाळकाकींची मुलगी.. पप्पीताई ..”
म्हटलं..”तुझी ओळख ?”
“चांगलीच.. नावान ओळखतात…”
सांधा गवसला…
लवकरच योगायोग आला ..पुणे आकाशवाणीत ‘आवाज जोपासना’या विषयावर एक कार्यशाळा आयोजलेली.. बरेच जण होतो.. दोन-चार दिवस.. त्यात आमचा ग्रुप जमला… कोल्हापूरहून सुजाता कहाळेकर, सातारावरून प्रकाश गडदे, सुनील व मी सांगली, सोलापूर वरून सराफ आणि सुनीता तारापुरे वगैरे…कोणकोण….
संध्याकाळी एकत्र असायचो….
सरोजिनी आक्का यांना भेटायचं या ध्यासानं मी लँडलाईन वर रोज फोन करायचो.. प्रत्येक वेळी पलीकडं नवं कुणीतरी.. “आक्कांची तब्येत ठीक नाही.. भेटायचं की नाही ते नंतर सांगू.. परत थोड्यावेळाने फोन करा..” हेच सतत….
वेळ मिळेल तसा तासा दोन तासाला फोन लावायचो.. पलीकडून निराशा…
एकदा फोन उचलला गेला असाच…
पलीकडून काहीसा वयोवृद्ध स्त्रीचा आवाज..
म्हटलं ..” अक्कांना भेटावसं वाटतं,”
विचारलं..” का ? ”
म्हटलं..” त्यांचं लेखन आवडतं. माझंच काहीसं हरवलेलं घावल्यागत वाटतंय..”
त्यांना हे वाक्य आवडलं असावं..
“कुठून बोलताय ? ”
सांगितलं..”आकाशवाणी पुण्यातनं.. सांगलीतनं आलोय..”
सांगली म्हटल्यावर त्यांचा आवाज तव्यात लाह्या फुलल्यागत फुलारला.
“मुळगाव ?”
“तासगाव..”
“अरे मग घरच्या माणसानी घरात यायला परवानगी काढायचा रिवाज आहे का आपल्यात ?… मी कुमुताई.. अक्कांची धाकली बहीण.. चटकशिरी या बरं.. मी वाट बघत बसलीय..”
अगदी अदघरातन मदघरात आईनं हाळी द्यावी असा सहज ओलेता स्वर…
मी खुळावलोच..
निघायचं म्हणालो.. तर बरोबरचे सगळे म्हणाले,.. ” आम्हालाही भेटायचंय आक्कांना..”
परत फोन केला.. पाच सहा जण आहोत म्हणालो..
तर तिकडून…” पन्नास का असेनात.. या… कुठ परमुलखात नाही.. बाबराच्या घरातच येतायसा ..”
तीन रिक्षा करून आम्ही सदाशिव पेठेतल्या त्यांच्या दारात उतरलो.. समोर कुमुदिनी पवार गेटवर वाट पहात उभ्या.. रुक्मिणीच… प्रसन्न …
खूप वर्षाच्या ओळखीच्या वाटतेल्या.. किती आपरूबाई… चेहरा तर फुलबाजा फुलल्यागत….
आक्का विकलांग झालेल्या.. बोलणं थबकलेलं.. खिडकीशी बसून त्या चौकोनातून बाहेरच झाड आणि पानांच्या सांद्रीतून दिसणार ट्रॅफिक पाहत बसलेल्या.. आम्हाला पाहताच त्यांना गहिवरून आलं.. पाण्यान डोळे भरलं .. त्यांना खूप काही बोलायचं असावं पण फक्त भिजले डोळे.. संवादी..
उतूउतू आलेले..
पूर्वी पाहिलेलं.. त्या वेळेचा आवेश.. लडीवर लडी उघडल्यागत घडघडा बोलणं… लय धरून…
दूरदर्शनवर रानजाईत शांताबाई आणि अक्का.. म्हणजे टिपरीवर टिपरीच.. मुखानं झिम्मा खेळतेल्या…
आणि आता गप्प गप्प..
वाटायचं कोणत्याही क्षणी त्या तोंड उघडतील आणि आयामायांच्या मुखातली गाणी घुमवायला लागतील.. एकेकीला बखोट्याला धरून उभ्या करतील आणि भुईवर पायाच्या भिंगऱ्या करून नाचवून दमवतील….
आमच्यामध्ये कुमुताई होत्या… त्याच बोलायच्या.. आक्काशी आणि आमच्याशी… आक्कांचे भाव जाणून आम्हाला सांगायच्या… आक्काचं काळीजच जणू..
अण्णांनी म्हणजे कृ. भा. बाबरानी 1950 साली समाजशिक्षण मालेचा पण सोडला.. वडिलांचा शब्द झेलत सरोजिनी, कुमुदिनी आणि शरदिनी, तिघींनी निगुतीनं मराठी सारस्वतात लोकसाहित्याची रेखीव रांगोळी घातली…. सोन्यानं तोलावं असा साडेपाचशे पुस्तकांचा ऐवज सरस्वतीच्या दरबारात हारीनं मांडला. खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यातनं हिंडूनफिरून खोपटाखोपटातल्या चुलीजवळ मांडी घालून मायमावल्यांच्या तोंडातला एकएक शब्द अलगद टिपला.
स्त्री मनाची निवळशंख काळीज लय कागदावर सांडली… सरोजिनी आक्कांच्या पाठीशी कुमुताई होत्या म्हणूनच हा एवढा पसारा जास्तानी लागला..
आक्कांच्या पायाला वणवण.. दांडगा झपाटा… भरारा गोळा व्हायचं… पण त्याला शिस्त लावायचं काम त्यांच्या या लाडक्या भनीचं..
पुण्यातलं बाबरांच घर म्हणजे बागणीच…
येणाऱ्या जाणाऱ्याला वस्तीला हक्काच घर..
आण्णाचं अगत्य आणि आईची पोटभर दहीभाकर.. मराठीतले सगळे दिग्गज लेखक, महाराष्ट्र घडवणारं आख्खं राजकीय नेतृत्व नेहमी या घरात ऐसपैस वावरतेलं.. किती किती नावं…
आक्कांच्या शेवटचा काळात तर कुमुदिनी पवारांनी त्यांना खूप जपलं… तोंडात सदा, आक्का आणि आक्का.. माळ ओढल्यागत..
इतक्यांदा बोललो पण त्यांच्या तोंडी एकच विषय.. आमची आक्का अशी आणि आमची आक्का तशी.. दोघी बहिणींचा जीव एकच असल्यागत…
कुमुताईंनी मालेसाठी खूप लिहिलं..
सरीन, सोन्याचे मुंगूस, लहानपण देगा देवा, धरित्रीच्या लेकी, इवाई पावना, सोयरीक, कर्मयोगिनी, सोबत, जीवनातील ऐश्वर्य.. अशी कितीतरी पुस्तकं…
लोकसाहित्य समितीवरही त्यांनी काम केलं.. आण्णांच्या या मुली.. अफाटच….
आक्कांनी माझा हात धरलेला.. नि:शब्द…
बाहेर पडताना तो घट्ट झाल्याचं मला जाणवलेलं…

कुमुताईंचा माझा पत्रव्यवहार सुरू राहिला.. आक्कामय झालेल्या कुमुताईंची टपोऱ्या हस्ताक्षरातली पत्र…ठेवा…
आम्ही त्यांना माई म्हणायचो.. त्या म्हणायच्या सगळे ताई म्हणतात रे…
एकदा मध्यरात्री त्यांचा फोन..
हुंदक्यांमुळं बोलता येत नव्हतं.. कसंबसं म्हणाल्या..
“आक्का गेली माझी.. मी चितळीहुन पुण्याला निघतीय.. तेवढं सकाळच्या प्रादेशिक बातम्यात सांगा..” पुढे फक्त हुंदके…….
मी कहाळेकरांना रात्रीच फोन केला.. त्यांनी पुण्याला वृत्त विभागाला सांगितलं..सकाळच्या बातम्यातून ते महाराष्ट्राला कळलं….
आक्का प्रत्यक्ष फारशा वाट्याला आल्या नाहीतच..
आल्या त्या लेखणीतून…
कुमुदिनी पवारांनाच आम्ही आक्कांच्या जागी पाहत आलो..
प्रत्येक सणाला शुभेच्छांचे फोन..
कसे आहात ? घरची मंडळी कशी आहेत ? हे विचारणं आणि पुन्हा आक्कांच्या आठवणी…
“सोपं लिहा.. साध्या घरातल्या, घराभोवतींच्या माणसांना कळेल असं साधंच लिहा…” हा उपदेश..
आक्कांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तान सगळ्या कार्यक्रमांना त्यांनी मला बोलावलं.. बऱ्याच कार्यक्रमात त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं मनोगत मला सादर करायला लावलं.. पुण्यापासून ते शिवाजी विद्यापीठापर्यंत..
कुणीही आक्कां विषयी काही विचारलं तर माझा नंबर द्यायच्या आणि म्हणायच्या, त्याच्याशी बोला तो जे म्हणेल ते बाबरांचं असं समजा…
एवढा विश्वास दिला….
चितळीत या हो म्हणायच्या निवांत…
मध्यंतरी आकाशवाणीत आलेल्या.. सुजाता कहाळेकर यांनी मुलाखतीला तयार केलं. सुनील आणि मी बोललो त्यांच्याशी…
सरोजिनी आक्कांची पुस्तकं आता मिळत नाहीत.. अलीकडे शासनाने री प्रिंट केली नाहीत .. मालेतील जवळजवळ चारशे पुस्तकं परत प्रकाशित करण्या इतकी ताजी आहेत.. हे सगळं व्हायला हवं.. यासाठी त्या अलीकडे खूप धडपडत होत्या.. या वयातही….
आक्कांची शासनानं काढलेली संकलनाची वीस ते चाळीस रुपये किमतीची पुस्तक काही लोक आता त्याच्या झेरॉक्स काढून अठरा अठराशे रुपयांना विकू लागलेत असं कळतं..
पायाच्या चिंध्या करून हे सुवर्णकण जमवणारे कसबी पारखी आता असे कुठं मिळायचे ??
विद्यापीठ लेव्हलला हिच पुस्तके खालीवर करून लोक विद्यावाचस्पती होत आहेत.. यातल्याच ओव्यांच्या मध्ये काही निवेदनं घालून लेख लिहिले जाताहेत, अभ्यासक म्हणवताहेत..
फक्त टेबल वर्क..
वाड्यावस्त्यांच्या वाटा तुडवण्याची आता कुणाची तयारी नाही..
निदान लोकांना हे ग्रंथ तरी उपलब्ध व्हायला हवेत.. काही वर्षांनी हे लोकधनही जुन्या पिढींबरोबर मातीआड होईल….
कुमुताई यासाठी खूप तळमळत होत्या.. शेवटपर्यंत..
अगदी दीड दोन महिन्यापूर्वीचा त्यांचा फोनही या विषयासाठीचाच….
आता त्या नाहीत..
अवघड आलं…
अशा व्यक्ती जातात तेव्हा ती एक छोटी बातमी होते फक्त….
त्याच्या मागचं त्यांचं आभाळाएवढं संचित…
त्याचं कसं होणार..????

– लेखन : संजय जगन्नाथ पाटील
– समन्वय : मीना गोखले. निवृत्त दूरदर्शन निर्माती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ताईंच्या गोड आठवणींना उजळवणारा भावस्पर्शी लेख !👌👍🙏