Sunday, March 16, 2025
Homeलेखआठवणीतील कोत्तापल्ले सर

आठवणीतील कोत्तापल्ले सर

मी औरंगाबाद येथे दै लोकमत मध्ये असताना अनेक विषयांवर लिहिण्याची कोत्तापल्ले सरांना विनंती केली असता त्यांनी वेंळोवेळी लेखन केलं. तसेच मार्गदर्शक म्हणूनही विविध प्रसंगी मायेचा सल्ला दिला होता. कुलगुरू असतानाही त्यांनी मार्गदर्शन तर केलंच प्रसंगी संधी देऊन उभारी दिली होती. त्यांच्या खूप आठवणी आज जाग्या झाल्या आहेत …सांगताहेत .. सरांचे विद्यार्थी राहिलेले, पूर्वाश्रमीचे पत्रकार, माहिती खात्यातील निवृत्त अधिकारी श्री यशवंत भंडारे.
– संपादक

मराठी साहित्य नि सारस्वतात 1960 नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्‍या प्रा डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दुपारी निधन झाल्याची बातमी मी काल बिलोली येथे असताना समाज माध्यमातून कळली, त्या क्षणीच ही बातमी खरी नसावी, असं मनोमन वाटत असल्यानं पुण्यातील साहित्यिक वर्तुळातील मित्रांना फोन करून कन्फर्म केलं असता ही बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालं.
तसं तर काल त्यांच्या मुलाने सरांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं होतं. पण सर खूप लढवय्या असल्यानं बाहेर येतील असंही वाटतं होतं. पण ही आशा फोल ठरली. आणि सरांचा जीवन पट
डोळ्या समोर येऊ लागला.

सरांचं महाविद्यालयीन शिक्षण नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे झालं होतं. तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथील पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ नि आताचं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं होतं. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत ते विद्यापीठात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते. त्यामुळं त्यांना अनुक्रमे डॉ.नांदापूरकर आणि कविवर्य मायदेव हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाले होते. एम ए मराठीत विद्यापीठात प्रथम आल्यामुळं त्यांना कुलपतींच्या सुवर्णपदकानं ते सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी 1980 मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली होती ..

बीड येथील एका महाविद्यालयात 1971 ते 1977 या काळात त्यांनी मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केलं. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रथम अधिव्याख्याता आणि नंतर प्रपाठक या पदांवर 1977 ते 1996 या काळात काम केलं. 1996 ते 2005 या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केलं. पुढे सर 2005 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि या विद्यापीठाने वेगळी उंची गाठली.

व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील, कुशल प्रशासक, व्याख्याते, संघटक, विचारशील, संयमी पण तितकेच निग्रही, परिवर्तनवादी, समाजवादी विचारांशी बांधिलकी असणारे, मराठी साहित्याबरोबरच ग्रामीण नि दलित साहित्याच्या चळवळीचा आधारवड असणारे, नवोदित साहित्यिक, लेखकांचे हक्काचे मार्गदर्शक नि पाठीराखे आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळं अनेक वंचित मुलांचं शिक्षण सुखकरपणे पूर्ण झालं. औरंगाबाद येथे ते विद्यार्थी संचालक असताना कमवा नि शिका योजनेला उभारी देऊन गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार त्यांनी दिला होता. त्यापैकी मीही एक आहे.

पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय तर आहेच त्याशिवाय कायम समरणात राहणारं आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), साहित्य अकादमी (दिल्ली) ह्या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून 1988- 1989 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून 1995- 1997 या कालावधीत त्यांनी काम केलं होतं.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, धारवाड, बनारस हिंदू विद्यापीठ, म.स.वि. वडोदरा इत्यादी विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्यही होते.

सर औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेचे 1988 ते 1995 या कालावधीत कार्याध्यक्ष होते.💐 पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचे 2001 पासून उपाध्यक्ष, महाराष्ट्रातील अनेक नामांकित साहित्यिक आणि शैक्षणिक संस्थांचे सदस्य, पदाधिकारी, अध्यक्ष या नात्यानं त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं .

श्रीगोंदा येथे 1999 मध्ये झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 मध्ये जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

‘मूड्स’ हा कवितासंग्रह; ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ हे कथासंग्रह; ‘राजधानी’ हा दीर्घकथांचा संग्रह; ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबर्‍या; ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी), ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’
(ललित गद्य), ‘जोतीपर्व’ आणि काही अनुवादित पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केलं आहे.

सरांच्या पाच पुस्तकांना पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनानं त्यांना सन्मानित केलं आहे .
त्यांच्या साहित्यातून त्यांचं संवेदनशील, चिंतनशील, सामाजिक बांधीलकी मानणारं व्यक्तिमत्त्व प्रकट झालं आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील मूल्य र्‍हासाच्या जाणिवेनं व्यथित होणाऱ्या सरांनी मूल्याधिष्ठित असं पुरोगामी, परिवर्तनवादी सामाजिक जाणीव प्रकट करणारं लेखन जसं केलं आहे तसेच व्यक्तिमनात निर्माण होणार्‍या सुख – दु:खात्मक भावतरंगांचं उत्कट नि हळुवार चित्रण करणारं लेखनही केलं आहे. सामाजिक, जातिनिष्ठ, वर्गवाद, राजकीय, आर्थिक स्थित्यंतरांतून निर्माण झालेले प्रश्न आणि त्यांतून निर्माण होणार्‍या कधी सफल तर बहुतेक वेळा विफल ठरणार्‍या संघर्षांचं समर्थपणे केलेले वास्तवदर्शी चित्रण हाही त्यांच्या कथात्मक लेखनाचा उल्लेखनीय विशेष समजला जातो.

वर्तमानातील सामाजिक वास्तवाचं सजग भान असणाऱ्या मोजक्या लेखक विचारवंतात सरांचा उल्लेख करावा लागेलकारण त्यांनी समकालीन समाजजीवनाचं अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारं प्रत्ययकारी चित्रण यशस्वीपणे केलं आहे .त्यांच्या समीक्षा लेखनातही त्यांच्या अंगी असलेली सामाजिक जाणिव त्यांच्या विश्लेषणातून व्यक्त होतांना दिसते .साध्या नि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘त्यांनी कोणत्याही साहित्यकृतीचं कलात्मकतेचं भान ढळू न देता जीवनवादी भूमिकेतून समीक्षा केली आहे ‘ असं म्हणता येईल ….

निवडक बी. रघुनाथ’ आणि ‘स्त्रीपुरुष तुलना’ या ग्रंथांचं संपादनही त्यांनी केलं आहे…
या व्यतिरिक्त अनेक विषयांवरील त्यांचं लेखन सातत्यानं सुरू होतं.

प्रखर भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या लेखक – विचारवंतांत सरांनी मानाचं स्थान मिळवलं होतं. त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनेक वेळा योग आला होता, हे मी माझे सुदैव समजतो.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

यशवंत भंडारे

– लेखन : यशवंत भंडारे. औरंगाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments