ग्वाल्हेरला त्या काळात एक मोठे “केंद्रिय पुस्तकालय” होते. भल्या मोठ्या उंच उंच पायऱ्या चढून जावे लागे. तेथे माझे वडील, मोठे भाऊ, बहीण जात असत.
त्या पायऱ्या इतक्या मोठ्या होत्या की त्याखाली पण पुस्तकालय होते, ते आमच्यासाठी म्हणजेच बालकांसाठी. त्याचे नावच होते “बाल पुस्तकालय एवं कौतुकालय.”
तेथे आम्ही धाकटी भावंडे जात असू. तेथे पुस्तके तर होतीच पण अनेक ,विविध प्रकारची खेळणी पण असत. तेथे एक गुरुजी होते. आम्ही त्यांना मास्तर म्हणत असू. ते आम्हाला सर्व खेळ समजावीत, पुस्तके देत.
चाचा नेहरूंचा वाढदिवस.. बालदिन … म्हणून जोशात साजरा होई. एका वर्षी आमचे मास्तर वडिलांना म्हणाले, या वर्षी आम्ही एक चमू दिल्लीला नेणार आहोत. विभावरी (माझे माहेरचे नाव) ला नेऊ का ? ती चित्र छान रेखाटते. तिला सांगा, चाचा नेहरूंचे चित्र काढ. आपण १४ नोव्हेंबर ला दिल्लीला जाऊ, वडिलांनी लगेच होकार दिला.
मला काही चित्र जमेना. थोडी रडारड. मग मामेभावाचे समजावणे व चित्रात दुरुस्ती सांगणे/करणे. एकदाचे जाड पुठयावर चिकटवून वगैरे माझे चित्र तयार झाले.
आम्ही १०, १२ मुले, एक शिक्षिका, आमचे मास्तर, काही सरकारी सेवक असे दिल्लीला पोचलो. थंडी खूप. मोकळे मैदान. पण त्यावर छान हिरवळ. जाडजूड स्वेटर, कोट घालून मुले चाचाजी येण्याची वाट बघत बसली होती. आणखी ही शाळेची मुले आली होती. तेथले स्वयंसेवक सर्वांना शिस्तीत बसवत होते. आम्ही बसलो त्याच्या उजव्या बाजूच्या दाराने, “चाचाजी” येणार होते. आमच्या आधी आणखी ४ शाळांची मुले गटागटा ने बसली होती. मास्तरांच्या धाकात सारे शांतशांत बसले होते.
थोड्याच वेळात गडबड ऐकू आली..आ, गये ..आ गये..! मुले ओरडू लागली…” चाचा नेहरू..जिंदाबाद…,
कोणी इंग्रजी शाळेतील…हॅपी बर्थडे ..पण म्हणत होती. तर कोणी …जन्मदिन मुबारक हो गाऊ लागली. साऱ्यांना पुनः शिस्तीत बसविले गेले.
मी अवाक होऊन बघत होते. एक गोरापान, देखणा गृहस्थ आमच्या बाजूला हसत हसत येत होता. पांढरी सुरवार, काळी अचकन, त्याच्या खिशावर लाल चुटुक गुलाबाचे फूल. तो राजबिंडा या वयात देखील किती गोड हसतोय सर्व मुलांकडे बघून ! मुलांजवळ जात हस्तांदोलन करतोय. अनिमिष नेत्रांनी मी आपले हे पंतप्रधान आहेत, इतक्या जवळ…असे आ वासून बघत होते.
तेवढ्यात ते आमच्या चमू जवळ पोचले देखील. आम्ही शिकविल्याप्रमाणे अभिवादन केले. दोन चार मिनिटे इकडचे तिकडचे बोलून ते पुढे जाऊ लागले. तरीही मी स्तब्धच. मास्तर म्हणाले, “विभा, दे ते चित्र तुझे त्यांना” मग मी एकदम गोंधळून पुढे गेले. त्यांना चित्र दिले. मी असेन ९,१० वर्षांची ..(आजकालची ९ ,१० वर्षांची मुले किती हुशार असतात) आम्ही नव्हतो. त्यात माझी चण लहान. अगदी बारकुडी दिसायचे. चाचा अगदी चक्क माझ्याशी बोलायला खाली जमिनीवर (म्हणजे तेथे छान गालिचा अंथरलेला, त्यांच्या चालण्यासाठी) गुढगे मुडपून बोलू लागले…
“ये क्या ?”
आपके लिये जन्मदिन का उपहार.
अरे, वा..लेकिन ये तो मेरा ही चित्र बना है,
हां
अगर इसे मैने रख लिया, तो आपके पास ? …
मेरी याद करने के लिये, आप ही रख लो ना !
मी जी दोन तीन वाक्य बोलले तीच खूप होती. या पुढे मी काय म्हणणार ?
मी परत आले.
मास्तर उत्सुकतेने विचारू लागले …काय ? काय म्हणाले ते तुला ?
आणि हे काय …तू चित्र नाही दिले त्यांना ?
मी सर्व सांगितल्यावर ते पुनः म्हणालेत …अगं, मग जा पटकन. ते बघ. अजून जवळच आहेत.
त्यांना सांग …अच्छा ठीक है, किंतु इसपर आप अपने हस्ताक्षर तो कर दीजिये.
मी पुनः घाबरत त्यांच्या जवळ पळत गेले.
या वेळी अगदी हसत, पाठीवर हात ठेवून त्यांनी विचारले, क्या हुआ ?
मी ऑटोग्राफ चाहिये आपका …म्हणताच त्यांनी पेन काढले आणि माझ्या चित्रावर अगदी लांबलचक लफ्फेदार सही केली…
“जवाहरलाल नेहरू”
आमचे मास्तर अगदी धन्य धन्य झालेत. त्यांनी माझे खूप लाड केलेत. वडिलांना विचारून ते चित्र “बाल पुस्तकालय एवं कौतुकालय” च्या भिंतीवर विराजमान झाले. कितीतरी वर्षे ते तेथेच बघितल्याचे आठवते.
कालौघात ते मोठे केंद्रिय पुस्तकालय ही गेले. ते कौतुकालय ही हरपले. पण अत्तराच्या कुपीत ठेवलेली ही सुगंधी आठवण अजून ही माझ्या मनात दरवळत आहे.

– लेखन : सौ.स्वाती वर्तक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
