थोर व्यक्ती खरोखरच किती थोर असू शकते, याचा अनुभव थोर वारली चित्रकार जिवा सोमा मशे यांच्या रूपाने तरुण वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांना आला. वाचू या, …त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत… संपादक
आपण कायमच अनेकांच्या तोंडून हे ऐकत असतो की, मला अमुक एका क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती किंवा माझा कला क्षेत्राकडे विशेष कल होता, पण संधी मिळाली नाही, आणि हे म्हणत असताना त्यांचा नाराजीचा सुर प्रकर्षाने जाणवतो. साहजिकच आहे, नावडतं काम करावं लागल्याचं दुःख असणारच.
मी मात्र स्वतःला नशीबवान समजते. माझ्या घरात उत्तम दर्जाची कला असल्यामुळे माझेही मन कायम कुंचल्यातच रमले आणि इतर कला प्रकारांपेक्षा मला भुरळ घातली ती साध्या सोप्या “वारली” चित्र शैलीने. विविध रंगांनी तर कोणीही मोहित होईल, परंतु माझ्या मनाला संमोहित केले ते त्या एकाच पांढरा शुभ्र रंगाने. कारण तो पांढरा रंग खुलवण्याचे सामर्थ्य होते, ते त्या मातीत. अर्थात शेणा मातीच्या लेपावर पांढऱ्या रंगाने केलेल्या रेखटनात.
जणू तो एकच पांढरा रंग मला सांगत होता की, जीवन रुपी पांढरी रांगोळी एकही रंग न भरता सुद्धा सुंदर दिसू शकते, जर तिला विचार रुपी आकारांची सुबकता दिली तर…
त्याच क्षणी ठरवलं, ही पारंपरिक कला आत्मसात करायची. झपाटल्यासारखी काम करू लागले. माहिती मिळवत गेले, वाचन, लेखन सुरू झालं. प्रश्न पडला, कोण असेल या कलेचा जन्मदाता ? त्यांचं कोणी वारसदार असेल का ? शोधायला सुरुवात केली.
नाव समोर आलं ते पद्मश्री जिव्या सोमा मशे, यांचं. ते डहाणू येथे वास्तव्यास होते इतकीच जुजबी माहिती हाती लागली. मग काय एक दिवस सरळ डहाणू गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार तिथे पोहचले. संपूर्ण प्रवासात असंख्य प्रश्न मनात येत होते. इतकी मोठी जागतिक कीर्तीची व्यक्ती कशी असेल ? ते आपल्याशी बोलतील का ? त्यांची चित्र पाहायला मिळतील का ? ते मला शिकवतील का ? वेळ देतील का ? असे हजारो प्रश्न घेऊन मी गाडीतून उतरले.
पत्ता विचारत विचारत त्यांच्या घराजवळ पोहचले. साधारण दोन एकराच्या परिसरात मधोमध सध्या बांधणीचे, बैठ, कौलारू घर बघून मला आश्चर्य वाटलं. घरात गेले तर तीन मोठ्या भिंतींवर मोठमोठी चित्रं टांगली होती. एका भिंतीवर “तरपा वाद्य” लावलेले होते. आत एक छोटी खोली होती, तिथे स्वयंपाकासाठी पारंपरिक जर्मनची भांडी होती. एका स्टोवर काही तरी शिजत होते. आणि बाजूला बघते तो काय, साधारण ५ फूट बाय ५ फूट अंथरलेल्या, शेणाने सारवलेल्या कापडावर चित्र काढण्याचे काम एक कृश देहयष्टी असलेली वृध्द व्यक्ती करत बसली होती. मी नीट पाहिलं तर तेच जिव्या मशे होते.
माझ्या आदर्शाचे पहिले दर्शन मला ते कलेची आराधना करत असतानाच झाले. अत्यंत साध्या कपड्यात, वयाच्या ७९ व्या वर्षी ते आपल्या कामात व्यग्र असलेले पाहून मी थक्क झाले. प्रवासात असताना मी विचार करत होते, त्यांच्याशी काय आणि कसं बोलावं, त्यांना काय म्हणावं, सर की अजून काही ! पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तिकडचं साधं, घरगुती वातावरण पाहून, मी कधी त्यांना आजोबा म्हणायला लागले ते कळलच नाही.
दोन तास त्यांच्या सोबत निवांत गप्पा झाल्या. त्यांचे सगळे फोटो बघितले, विविध देशात कशी हजेरी लावली, कसे पुरस्कार मिळाले हे त्यांनी सांगितलं. अगदी सहज स्वतःचा जीवनपट त्यांनी माझ्यापुढे उलगडून ठेवला. कोणतीही भाषा अडसर न ठरता, शालेय शिक्षण न घेता जगप्रसिद्ध कलावंत होता येते. फक्त तुमच्या कलेवर तुमची श्रद्धा असणे आणि सातत्य पूर्ण प्रयत्न गरजेचे असतात हे मी त्यांच्याकडून शिकले.
या कला प्रकारातले बारकावे त्यांनी मला सांगितले. इतका आत्मिक आनंद आणि समाधान या आधी मी कधीच अनुभवले नाही. धीर करून मी हळूच विचारले, “आजोबा, आज पर्यंत मला जे वारली समजलं त्यावरून मी काही चित्र काढली आहेत. आणि त्याचे प्रदर्शन भरवते आहे, त्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तुम्ही याल का ? आणि तुमचं मानधन …?” थोडा वेळ शांतता होती, नंतर ते म्हणाले, “माझी तब्बेत ठीक असेल तर मी नक्की येईन.” पण मानधन …..
मला वाटल, इतके दहा देश फिरलेला माणूस, काय सांगतात आणि काय नाही, बरं त्यांनी सांगितलेली रक्कम आपल्याला परवडेल का ? असा विचार करत असतानाच ते म्हणाले, “चिंधी कापायचे काय पैसे घेणार ?” माझे डोळे विस्फारले, ऐकलेल्या शब्दावर विश्वासच बसेना. जागतिक कीर्तीचा कलावंत इतका साधा असू शकतो ? फित कापणे आणि त्याचे पैसे घेणे याचं त्यांना आकर्षण वाटू नये ? किती मनाचा मोठेपणा हा !
माझ्या बालहट्टाला हो म्हणत, ते आले. प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, प्रत्यक्ष त्यांनी माझी चित्र पाहिली, कौतुक केलं, आशिर्वाद दिला. आज ते आपल्यात नाहीत पण ह्या त्यांच्या नुसत्या आवठणी सुध्दा मनाला उभारी देतात.

– लेखन : श्रद्धा कराळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या प्रतिसादामुळे श्रध्दा व आम्हाला ही निश्चितच अधिक प्रेरणा मिळेल.
खूपच छान व्यक्तिमत्व आणि व्यक्तीचित्रण
श्रद्धा तू खूप भाग्यवान आहेस.अशा थोर कलावंताचा सहवास तुला लाभला. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहूदे, तुझी कला बहरूदे आणि आम्हाला छान छान वाचायला मिळूदे.
खरंच खूप छान लेख लिहला आहे! एका कलाकाराने आपल्या शब्दातून दिलेली भावपूर्ण आदरांजली दिसून येते .श्रद्धाने ही कला जोपासून त्याला पुढे घेऊन आणण्यासाठी जी जिद्ध आणि आवड दाखवली आहे ते तिच्या कलेतून सतत दिसून येते! तिच्या माध्यमातून ह्या कलेला जोपासणारे बरेच कलाकार यशस्वी रित्या पुढे येतील हा तिचा प्रयत्न नक्की यशस्वी ठरेल ही आशा!!
श्रद्धा , खूप भाग्यवान आहेस तू., अशा थोर कलावंताचा सहवास तुला लाभला. तुझी कला अशीच बहरत राहो , आम्हाला छान छान लेख वाचायला मिळो.
अशी थोर व्यक्तिमत्त्व हीच खरी आपली सामाजिक संपत्ती आहे. अशा व्यक्तींची थोरवी या लेखामुळे पुन्हा एकदा जगापुढे आणली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या थोर व्यक्तिमत्त्वाला अभिवादन.. त्यांच्या कलेचे जतन करणे हीच खरी आदरांजली ठरेल.