Friday, November 22, 2024
Homeलेखआठवणीतील ज्यो

आठवणीतील ज्यो

एखादी गोष्ट करायचं आपण ठरवतो पण ते राहून जातं. त्याचा पश्चाताप नंतर आयुष्यभर होत राहतो. नंतर हळहळ वाटत राहते, पण त्याचा काही उपयोग नसतो.

हा अनुभव माझ्या शहात्तर वर्षाच्या आयुष्यात दोन चार वेळा आला आहे. तशीच वेळ आज पुन्हा आली आहे. यावेळी मात्र मी स्वतःला माफ करू शकणार नाही. माझा पत्रकार मित्र आणि सहकारी जोसेफ एम पिंटो आमचा सगळ्यांचा “ज्यो” २९ जुलै ला पहाटे खूपच अनपेक्षितपणे देवाघरी गेला. खूप प्रेमळ, सहृदय, कोणालाही कधीही, कोणत्याही कारणाने त्याने दुखावले, कोणावर तो रागावला असे आमच्या कोणाच्या अनुभवविश्वात घडलेले आठवत नाही.

अगदी अलीकडे तो आणि त्याची पत्नी डॉ कल्पना जोशी पत्रकारनगर मधील आमच्या इंद्रायणी बिल्डिंगमध्ये डोकावून गेले. कुणाचं तरी आजारपण होतं, कोणाची नात आजारी होती, दुसरं कोणीतरी चांगल्या मार्कांनी पास झालेलं होतं तिचं कौतुक करायला दोघं सहज म्हणून, फोन करून येऊन गेले होते.

अशाच एका त्यांच्या विजिटमध्ये त्यांनी ज्योचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं पुस्तक “लेसन्स ऑफ माय मम्मी लर्नड मी” (“Lessons My Mummy Learned Me”) देऊन गेला होता. त्याच्या आईवर लिहिलेलं हे पुस्तक खूप हृदयस्पर्शी आहे असे आमच्यातला एकाने अगत्याने मला सांगितलं देखील होतं. “किरण, नक्की वाच आणि कसं वाटलं ते लिहून पाठव” असं त्यानं मला आग्रहानं सांगितलं होतं. मी “नक्की वाचतो” असं मनापासून त्याला सांगितलं होतं.

पण माझे वाचायचे राहून गेले होते हे खरं. दुसरं काहीतरी वाचत होतो, थोडं बहुत लिहित होतो. त्यामुळे नाही जमलं. पण वाचायचं मात्र माझं ठरलं होतं. ते झालं की पुस्तक परिचय किंवा परीक्षण लवकरच लिहायला सुरुवात करणार होतो.

पण निरोप आला आणि ज्यो गेल्याचे कळलं. आता लिहायला घेतले ते पुस्तकाचा परिचय किंवा परीक्षण असे नाही तर या मित्राला श्रद्धांजली देण्यासाठी.
सकाळपासून जेवढे फोन झाले ते अशीच सुरुवात करीत. स्वर गदगद झालेला. अनेकांनी माझ्यासारखंच त्याचे हे पुस्तक वाचलेले नव्हते. परंतु ज्यो किती सज्जन होता, “जंटल”मन होता असाच सूर सगळ्यांचा. अशाच साऱ्या आठवणी.

ज्यो ची माझी ओळख झाली तेव्हा तो त्यावेळच्या पुणे हेरॉल्ड या दैनिकात उपसंपादक म्हणून काम करू लागला होता. युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचा मी बातमीदार आणि मॅनेजर म्हणून काम करीत असे. माझ्या कामाचा एक भाग म्हणून मी अधून मधून त्यांच्या कार्यालयात चक्कर मारीत असे. आमच्या प्रतिस्पर्धी वृत्तसंस्थेच्या पी टी आय च्या बातम्यापेक्षा आमच्या बातम्या सोप्या भाषेत लिहिलेल्या असायच्या. माझ्या स्वतःच्या बातम्या देखील चांगल्या लिहिलेल्या असतात हे तो आवर्जून सांगायचा.
पुण्याच्या कॅन्टोन्मेंट च्या बातम्या मी कव्हर कराव्या अशा आहेत असं त्याला वाटलं तर अजून मधून फोन करून सांगायचा. त्याचे उपसंपादनाचे कौशल्य, त्त्याने दिलेल्या हेडलाईन्स चे मी कौतुक करत असे. त्याच्या लेखांमध्ये मला काही इंटरेस्टिंग वाटले तर मी फोनवर सांगत असे. थोडक्यात, “अहो रुपम अहो ध्वनी असा प्रकार” होता.

काही दिवसानंतर मला खरंच अनुभवायला यायला लागलं की त्याची इंग्रजी भाषा आणि व्याकरण खूप छान होतं. तो संपादन देखील नीटकेपणाने करत असे. म्हणून मी त्याला आग्रह धरला की रानडे इन्स्टिट्यूट मध्ये आमच्या पत्रकारितेच्या कोर्स ला एडिटिंग हा विषय शिकवायला ये.
आपल्याला शिकवण्याचा काही अनुभव नाही हे त्याने खूप सांगितलं, पण मी मागेच लागलो. तसं त्याने माझं म्हणणं मान्य केलं. काही महिन्यातच तो विद्यार्थ्यांचा अतिशय लाडका शिक्षक बनला. महाराष्ट्र हेराल्ड मधील नोकरी सांभाळत त्याने रानडेच्या विद्यार्थ्यांना खूप आपलंसं करून टाकलं.

मी रानडे चा विभाग प्रमुख असताना माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक मेळावा घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याची विद्यार्थीप्रियता लक्षात यायला लागली.
“आपल्याला टिचिंग प्रोफेशन मध्ये किरण ने आणलं” हे तो अनेकदा म्हणत असे. अर्थात हा त्याचा मोठेपणा होता. इंग्रजी भाषा विषय आणि संपादनाचे कौशल्य हे त्याचे स्वतःचे होते. त्याचे क्रेडिट मला देण्याचे आणि मी ते घेण्याचे काही कारण नव्हते, ही वस्तुस्थिती आहे.

आपल्या पूर्व आयुष्याविषयी आम्ही दोघेही फारसे कधी बोललो नाही. तशी वेळ आली नाही.
केव्हा तरी खूप तरुणपणी आपण खेड्यातील आणि झोपडपट्यांमधील सेवाभावी सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते असे त्याने सांगितले होते. पण त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता हे मला आठवतं.

आपल्या सेवानिवृत्तीनंतर त्याने पुण्यातील मराठी पत्रकारांना देखील शिकवायचा उत्साह दाखवला. स्वतःचे सिलॅबस तयार केले. मराठी पत्रकारांना इंग्रजी लिहायला प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनातील भीती घालवून त्याने अनेक जण त्यात तयार केले. त्यांची तयारी पाहायला तो माझ्यासारख्याला आग्रहाने बोलवायचा. खूप आनंद वाटायचा.
या काळात त्याने इंग्रजी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. किती विषय त्याने हाताळले असतील याला गणतीच नाही. यातूनच त्याने आपली आई अमी पिंटो हिने आपल्याला कसं घडवलं या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक तयार झालं. ते वाचायला त्याने अलीकडेच माझ्यासारख्यांना दिलं. ते वाचायचं राहून गेलं.

त्याची प्राध्यापक पत्नी डॉ कल्पना आणि मी वेगवेगळ्या वर्षी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात होतो. त्यांनी फिजिक्स विषय लहान मुलांना शाळकरी मुलांना प्रयोगाच्या माध्यमातून शिकवण्याचा वसा घेतला होता. त्या उपक्रमात माझा मोठा मुलगा नचिकेत होता. ज्यो चे आणि डॉ कल्पना यांचे नाते हे मला खूप नंतर कळले. त्यांची मुलगी पल्लवी आणि जावई तेजस आणि नातू आर्यन यांचा देखील परिचय नंतर झाला.

आजोबा, ज्यो आणि नातू आर्यन यांचे मधुर संबंध फोनवरच्या संभाषणातून खूप हृद्य वाटत असत. पत्रकार नगरच्या शेजारी आपण राहायला येण्याचा प्रयत्न करत आहोत हे देखील त्याने मला सांगितले होते. पण आमचा हा मित्र आणि स्नेही आता खूप लांब निघून गेला आहे. परत न भेटण्यासाठी.

प्रा. डॉ. किरण ठाकूर
  • — लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
  • — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. जोसेफ पिंटो ,पारदर्शक व्यक्तिमत्त्वाच्या या हरहुन्नरी माणसाला विनम्र अभिवादन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments