अचानक बातमी आली की, माझे मित्र झाकीर भाई यांचे दुःखद निधन झाले. हे कळल्यावर मन सुन्न झाले. अजूनही हा धक्का मी पचवू शकलो नाही. असो.
मी त्यांना प्रथम पूनम बिस्कीट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाहिले. नंतर माझ्या आयुष्यात कलाटणी मिळाली. मी मुंबईस हिंदी फिल्म इंडस्ट्रीत गायक म्हणून काम करत होतो तेंव्हा त्यांची भेट झाली. ते माझे अत्यंत जवळचे मित्र पंडित
भवानीशंकर यांचे मित्र होते. त्यांच्या सोबत अनेक वेळा झाकीर भाईंची भेट होत असे.
एकदा मी व भवानीजी वेस्टर्न आऊट डोअर स्टुडिओत एक रेकॉर्डिंग करत होतो. रेकॉर्डिंग संपल्यावर मी व भवानीजी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेंव्हा तेथे बराच वेळ गप्पा झाल्या. दुसरे दिवशी त्यांना एका प्रोग्रॅमसाठी पुण्याला जायचे होते, तेंव्हा झाकीर जी नी मलाही त्यांच्या सोबत ‘पुण्यास चल’ असे सांगितले. आम्ही पुण्यात पोहोचल्यावर डेक्कन येथील हॉटेल कोहिनूर मध्ये थांबलो. त्या वेळी मोबाईल नव्हते, तेंव्हा त्यांनी मला प्रोग्रॅमच्या ठिकाणी जाऊन डॉ.गोखले यांना भेटण्यासाठी सांगितले. तो पर्यंत मला माहीत नव्हते की मी सवाई गंधर्व महोत्सवाच्या ठिकाणी जात आहे म्हणून. त्यांनी गोखले यांना भेटून आपला ‘तालवाद्य कचेरी’ हा प्रोग्रॅम कधी आहे ते विचारण्यास सांगितले. मी गोखलेना भेटून झाकीरभाईनी पाठवले असे सांगितले, तेव्हा त्यांनी मला येण्याची वेळ सांगितली. तेथे मला परभणीचे नगर पालिकेतील देशपांडे व नलुताई भेटल्या. तेंव्हा त्यांनी विचारले ‘तुम्ही पण प्रोग्रॅमसाठी आलात का ?’ तेंव्हा मी झाकीर हुसेन यांच्या सोबत आलो असे सांगितले.
ते म्हणाले किती ‘पुड्या सोडता !’ मी त्यांना काहीच बोललो नाही व परत हॉटेल वर आलो. नंतर आम्ही सर्व जण प्रोग्रॅम साठी आलो व ग्रीन रूम मध्ये वाद्य लावण्यासाठी मला हार्मोनियमवर सुर धरण्यास सांगितले. तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
त्या ताल वाद्य कचेरीत तबला झाकीर भाई, पखवाज पंडित भवानी शंकर, घटम वर विक्कु विनायक व खंजिरी सिल्वा गणेश हे व हार्मोनियम वर मी, स्वतः होतो. त्यांनी मला पण त्यांच्या सोबत स्टेज वर बसण्यास सांगितले ते वर्ष होते 1994.
त्या सालच्या सवाई गंधर्व महोत्सवात माझी पात्रता नसताना देखील एवढ्या मोठ्या महोत्सवामध्ये झाकीर भाई व भवानीजी यांच्या मुळेच शक्य झाले. दुर्दैवाने आम्ही प्रोग्रॅम झाल्यावर लगेच निघाल्यामुळे याचे फोटो किंवा व्हिडिओ नाही ,याचे नेहमीच अतोनात वाईट वाटत आले आहे.
असाच दुसरा प्रोग्रॅम एका डिसेंबरमध्ये झाला. वर्ष आठवत नाही, पण कोरेगाव पार्क येथील आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हा ओशो रजनीश यांच्या आश्रमात दरवर्षी डिसेंबर महिन्यात वार्षिक महोत्सव होत असे, त्या मध्ये झाकीर भाई, पं .भवानी शंकर, विक्कू विनायक, एकाच वेळी 25 प्रकारची तालवाद्य वाजवणारे शिवा मनी व सारंगी वर एक कलाकार होते त्यांचे नाव आता आठवत नाही, या सर्वांबरोबर साथ संगत करता आली. ओशो आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी सगळ्याची एड्सची टेस्ट होत असे व नंतरच आश्रमात प्रवेश मिळत असे. आम्हा सर्वांची टेस्ट झाल्यावरच आम्हाला प्रवेश मिळाला.
प्रोग्रॅमच्या अगोदर तेथील ध्यान मंदिरात आम्ही हजेरी लावली. तेथे प्रत्येकाचे स्वतंत्र वादन झाले. मी एक भक्ती गीत सादर केले तेंव्हा तबल्यावर झाकीर भाई व पखवाज वर भवानीजी होते. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. त्याच्या आठवणीने आजही अंगावर शहारे येतात.
नंतर अधून मधून झाकीर भाई आणि माझी भेट होत असे. ते माझे बंधू तुल्य मित्र सुरेश वाडकर यांचे चांगले कौटुंबिक मित्र होते. सुरेशचे गुरुजी पं. जियालाल वसंत यांचे व उस्ताद अल्लारखा यांचे गाव एक होते, असे म्हणतात.
झाकीर भाई यांचा स्वभाव खूप मोकळा व मिश्किल होता. ते भवानीजीची व इतर कलाकार यांची फिरकी घेत असत. एवढे मोठे विश्व विख्यात कलाकार असून देखील ते माझ्या सारख्या सामान्य कलाकार यांना आदराची वागणूक देत असत.
तश्या त्यांच्या सहवासातील आठवणी खूप आहेत. त्या हृदयाच्या खास कप्प्यात साठवून ठेवणे व नंतर त्यांच्या आठवणीने मोहरुन येणे एवढेच आपल्या हातात आहे.
मी मागील वर्षी अमेरिकेत गेलो असताना त्यांना भेटणार होतो. पण ते प्रोग्रॅम साठी दौऱ्यावर होते. ते स्यानफ्रान्सिस्को इथे राहत होते व माझा मुलगा सौरभ सनहोजे इथे राहत आहे. पण त्यांची भेट अमेरिकेत झाली नाही.
मला वाटतं या वर्षी स्वर्गात सवाई गंधर्व महोत्सव आयोजित केला असेल, त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, पंडित जसराज, प्रभा अत्रे, पंडित भवानी शंकर व इतर अनेक कलाकार सहभागी होत असतील. त्यांच्या निधनाने माझे मोठे नुकसान झाले आहे. अश्या पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना विनम्र अभिवादन करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी हे सर्व एका वेगळ्याच दुःखात लिहीत आहे. त्यामुळे काही चुकले असल्यास माफ करणे.
— लेखन : सिने गायक उदय वाईकर. परभणी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800