Saturday, July 12, 2025
Homeलेखआठवणीतील डॉ. विश्वास मेहंदळे

आठवणीतील डॉ. विश्वास मेहंदळे

आज सकाळी वृत्तपत्रे चाळत असताना मोबाईल वाजला. उचलून बघितला तर माझा मित्र नितीन केळकरचा फोन होता. मी फोन उचलताच त्याने बातमी दिली अरे अविनाश, मेहंदळे गेले. माझ्याकरिता ही धक्कादायक बातमी होती.

नंतर चौकशी केली असता, पुण्यात स्थायिक झालेले डॉ. विश्वास मेहंदळे मुंबईतील मुलुंड येथे मुक्कामी असलेल्या मुलीकडे आले होते, तिथेच प्रकृती बिघडली म्हणून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते, उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे समजले.

डॉ. विश्वास मेहंदळे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. एक साहित्यिक, माध्यमतज्ञ, रंगकर्मी, निवेदक, वक्ते अश्या विविध कलागुणांनी संपन्न असलेल्या या व्यक्तिमत्वाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे आपली ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर त्यांनी जगभरात असंख्य मित्रही जोडले होते. त्या मित्रांमधलाच मीदेखील एक होतो.

तस्से बघता डॉ. विश्वास मेहंदळे हे माझ्यापेक्षा वयाने बरेच ज्येष्ठ होते. मात्र १९७६-७७ मध्ये मी दूरदर्शनला काम करू लागल्यावर त्यांचा माझा परिचय झाला. त्या परिचयाचे नंतर स्नेहात रूपांतर झाले आणि दीर्घकाळ माझे एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्येष्ठ हितचिंतक म्हणून त्यांनी अखेरपर्यंत संबंध जपले.

१९७६ मध्ये मी दूरदर्शनला कंत्राटी पद्धतीचा वृत्तछायाचित्रकार म्हणून काम सुरु केले, तेव्हा डॉ. मेहंदळे हे दूरदर्शनला वृत्तविभागात निर्माता म्हणून काम बघत होते. त्यांच्याच सोबत डॉ. गोविंद गुंठे हे देखील वृत्तनिर्माता म्हणून कार्यरत होते. त्यावेळी मी जॆमतेम २१ वर्षाचा होतो. त्या काळात दूरदर्शनसाठी बातमी कशी तयार करावी याचे अतिशय चांगले मार्गदर्शन ते करायचे. त्यांच्या मार्गदर्शनात मी विदर्भातील वेगवेगळी वृत्तचित्रणे केली होती.

१९७९ च्या दरम्यान डॉ. मेहंदळे यांची दूरदर्शनचे वृत्तसंपादक म्हणून पदोन्नती झाली. त्या दरम्यान काही कामाने मी मुंबईत होतो. एका वृत्तपत्रात मी त्यांचा परिचय वाचला तेव्हा दुरदर्शनमध्ये एक साधा माणूस म्हणून वावरणारे मेहंदळे हे किती आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे हे प्रथमच मला कळले.

ते फक्त वृत्तसंपादक नव्हते तर चांगले साहित्यिकही होते. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये ते काम करत होते. रंगमंचही त्यांनी गाजवला होता. दूरदर्शन सुरु होण्यापूर्वी ते मुंबई आकाशवाणीत वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी दूरदर्शन सुरु झाल्यावर आकाशवाणीतून अनेक चांगल्या व्यक्तींना दुरदर्शनमध्ये बोलावले गेले, त्यात विश्वास मेहंदळे होते.

२ ऑक्टोबर १९७२ ला मुंबई दूरदर्शन सुरु झाले. त्यादिवशीच्या प्रसारणात मराठी बातम्यांसाठी वेळ ठेवला होता, मात्र वृत्तनिवेदक कोण ? हे ठरलेच नव्हते. तेव्हा तत्कालीन केंद्र संचालकांना आठवले की विश्वास मेहंदळे आकाशवाणीत वृत्तनिवेदक होते, वेळेवर त्यांनाच बातम्या सादर करण्यासाठी बसवले गेले. नंतर नियमित वृत्तनिवेदक येईपर्यंत मेहंदळेंच दूरदर्शनवर मराठी बातम्या वाचायचे.

त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातले आकलन बघत १९८१ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक या पदावर नियुक्त केले. तिथेही डॉ. मेहंदळेंनी आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. मात्र सुमारे तीन वर्षे तिथे काम केल्यावर राज्य शासनातल्या चौकटबद्ध व्यवहाराशी न जमल्यामुळे मेहंदळे दुरदर्शनमध्ये पुन्हा परत आले.

१९८७ मध्ये मी दूरदर्शन सोडले. माझ्या आठवणीनुसार नंतर काहीच दिवसात मेहंदळेंनी दुरदर्शनला रामराम करून ते सिम्बॉयसिसच्या माध्यम विषयक अभ्यासक्रमाचे संचालक म्हणून गेले. तिथे काही वर्ष काम केल्यावर सातारला एका वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी सेवा दिल्या.

याच काळात दूरदर्शनवर वादसंवाद नावाच्या टॉक शो चे ते सूत्रसंचालन करायचे. हा कार्यक्रम प्रचंड गाजला आणि खूप वर्ष चालला.

मी दूरदर्शन सोडल्यावर नंतरच्या काळात मेहंदळे सरांचा माझा संपर्क कमी झाला होता. नंतर मीही मुद्रित माध्यमात आलो. त्यानंतर २००२ पासून मी एक दिवाळी अंक प्रकाशित करत असे, २००६ च्या दिवाळी अंकासाठी मला माध्यम विषयावर लेख हवा होता. मी मेहंदळे सरांचा फोन नंबर मिळवून त्यांना फोन केला. बरीच वर्ष गेल्यामुळे ते ओळखतील किंवा नाही अशी मला शंका होती, मात्र मी अविनाश पाठक नागपूर असे सांगताच त्यांनी मला ओळखले आणि त्या दिवशी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. तेव्हापासून आमचे संबंध नव्याने प्रस्थापित झाले. अधूनमधून त्यांचा फोन येऊ लागला.

डॉ. मेहंदळे वक्ते म्हणून पण गाजले होते. विविध विषयांवर ते व्याख्याने द्यायचे. २००७ मध्ये एका व्याख्यानासाठी नागपुरात त्यांना बोलावले, मी फोनवर निमंत्रण देताच त्यांनी तत्काळ स्वीकारले आणि ते नागपुरात आले, साइन्टिफिक सभागृहात त्यांचे दणदणीत व्याख्यान झाले.

त्यानंतरही एकदा माझ्या वडिलांच्या स्मृतिदिनीच मी त्यांचे व्याख्यान ठेवले होते. त्या वर्षी माझ्या आठवणीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या कैदेतून सुटण्यासाठी बोटीतून समुद्रात उडी मारली त्या घटनेला बहुतेक ५० किंवा ७५ वर्ष झाली होती. त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर: प्रतिमा आणि वास्तव” या विषयावर मी व्याख्यान आयोजित केले होते, त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला.

डॉ. विश्वास मेहंदळेंना माणसे जोडण्याचा जबरदस्त छंद होता, जोडलेल्या व्यक्तीला कोणतीही मदत करायला ते तयार असायचे. आणि त्या व्यक्तीशीच नाही तर पूर्ण कुटुंबाशी ते स्नेहबंध जोडायचे. सर्वप्रथम मी त्यांना व्याख्यानाला बोलावले ते नागपुरातल्या वैद्य परिवाराने आयोजित केलेले व्याख्यान होते. व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी ते माझ्या घरी स्नेहभोजनाला आले होते. व्याख्यानाचे वेळी वैद्य परिवाराने त्यांचा शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि शिवाय मानधनही दिले. माझ्या घरी आल्यावर त्यांनी शाल श्रीफळ आणि भेटवस्तू माझ्या पत्नीच्या हातात दिली. त्याचा त्यांनी खुलासाही केला. मी कोणत्याही गावात व्याख्यानाला गेलो, की तिथले आयोजक शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देतात, ते मी पुण्याला सोबत नेत नाही, ज्यांनी माझे व्याख्यान आयोजित केले असेल त्यांच्य्याच घरी आठवण म्हणून मी ते ठेऊन देतो. त्या दिवशी त्यांनी दिलेली गणपतीची मूर्ती अजूनही आमच्या शो केसमध्ये विराजमान आहे. तर त्यांनी दिलेली शाल अजूनही आम्ही वापरतो.

“लोकमान्य टिळकांचे अग्रलेख” हा डॉ. मेहंदळेंच्या पीएचडी चा विषय होता. नंतर त्यांचा हा प्रबंध पुस्तक रूपातही प्रसिद्ध झाला. २००८ मध्ये टिळक पुण्यतिथीच्या आधी मला दैनिक केसरीने त्यांच्या विशेषांकासाठी लेख मागितला. विषय दिला होता “लोकमान्य टिळक आणि शेतकरी आत्महत्या”. हा विषय पाहून मी विचारात पडलो. सहजच मेहंदळे सरांना फोन केला लगेचच त्यांनी खूप सारे संदर्भ दिले. त्या पाठोपाठ त्यांचे पुस्तक त्यांनी मला कुरियरने नागपूरला पाठवून दिले. पुस्तक वेळेत हातात पडल्यामुळे त्यांतील संदर्भ घेऊन मी एक चांगला लेख लिहू शकलो.तो लेख प्रचंड गाजलाही.

मेहंदळे सरांनी लेखन भरपूर केले. लेखन करतांना त्यांनी विविध विषय हाताळले. मला आठवते त्यांनी महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री आणि देशाचे सर्व पंतप्रधान यांच्या कार्याचा आढावा घेऊन दोन पुस्तके लिहिली होती. ती दोनही पुस्तके आजही संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत उपयोगाची आहेत.

नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीची फारशी कदर झाली नाही. अर्थात कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदार्यांमुळे ते नाटकाला पूर्णवेळ देऊही शकले नाहीत. माझ्या आठवणीनुसार २००८ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती, हे कळल्यावर मी विदर्भात त्यांचा प्रचारही केला होता. मात्र या लढतीत नशिबाने त्यांना हुलकावणी दिली.

असा हा ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार, साहित्यिक आणि माध्यमतज्ज्ञ ८३ वर्षांचे संपन्न आयुष्य जागून आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी मराठी माणसाला जे जे काही देणे शक्य होते, ते सर्वच देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. अखेरच्या क्षणापर्यंत ते कार्यरत राहिले. आणि जे जे आपणास ठावे ते ते दुसर्यास द्यावे, शहाणं करून सोडावे सकलजन या न्यायाने सर्वांना शहाणे करत त्यांनी आपल्या जीवनाची इतिश्री केली.

डॉ. विश्वास मेहंदळे यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

अविनाश पाठक

– लेखन : अविनाश पाठक. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments