परवा रात्री समाज माध्यमावर बातम्या सर्फिंग करत असतांना अचानक सुधाकर धारव सहेनी वारल्याची बातमी वाचण्यात आली. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायकच होती बातमी वाचता क्षणी मी एक दोन कॉमन मित्रांना फोन केला. त्यांनी बातमी खरी असल्याचे सांगितले.
धारव साहेबांचा आणि माझा पहिला संबंध १९७८ साली आला. त्यावेळी ते अकोला येथे राज्य शासनाचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात कार्यरत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. अकोल्याला मोरणा नदीला पूर आल्याने गावात हाहाकार माजल्याची बातमी होती. मला मुंबईहून दूरदर्शनचे वृत्त संपादक डॉ. गोविंद गुंठे यांचा फोन आला. रातोरात अकोल्याला जाऊन उद्या मला पुराची बातमी सविस्तर हवी असा त्यांचा आदेश होता. मी लगेच रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने अकोल्याला पोहोचलो. तिथे जवळच राहत असलेल्या माझ्या चुलत भावाकडे पहाटे पोहोचलो. सकाळी तयार होऊन तिथे जवळच राहणारे तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी शांताराम सरदेशपांडे यांच्याकडे गेलो ते काही माहिती घेण्यासाठी. तिथेच कळले की आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार येत आहेत. मी लगेच कॅमेराची बॅग उचलून मुख्यमंत्री येणार असलेल्या भागात धावलो. तिथे पूर्ण सरकारी ताफा आलेला होताच. तिथे मला पाहून एक गृहस्थ माझ्याजवळ आले, आणि तुम्हीच अविनाश पाठक का ? म्हणून विचारू लागले. आपण कोण म्हणून मी चौकशी केली असता मी सुधाकर धारव, जिल्हा माहिती अधिकारी अशी त्यांनी ओळख करून दिली. तुम्ही येणार असल्याची माहिती मला विभागीय कार्यालयाकडून मिळाली असेही त्यांनी सांगितले. आदल्या रात्रीच मी नागपुरमधून निघण्यापूर्वी विभागीय माहिती उपसंचालक राम पाथरकरांशी बोललो होतो. त्यांनीच धारवांना मी येणार असल्याची माहिती दिली होती.
मग लगेचच धारवांनी माझा ताबा घेतला. मला आपल्या जीपमध्ये बसवून घेतले आणि पूरग्रस्त भागात नुकसान कुठे कुठे झाले आहे ते दाखवत ते माझ्याबरोबर फिरले. सोबत मुख्यमंत्र्यांचा दौराही आम्ही कव्हर केला. मुख्यमंत्र्यांनी नुकसान आढावा बैठक घेणे सुरू केले तसे धारवांनी मला जीप देऊन उर्वरित पूरग्रस्त भागात चित्रीकरण करण्यासाठी रवाना केले. सोबत त्यांचा सहाय्यक देखील होता. कसंही करून पाठकांना साडेदहा वाजता विमान सुटेपर्यंत विमानतळावर घेऊन ये असे त्यांनी ड्रायव्हरला ठणकावले. आदल्याच दिवशी झालेल्या पुरामुळे गावातली वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आम्हाला विमानतळावर पोहोचायला वेळ लागला. धारवांची योजना होती की मुख्यमंत्र्यांच्याच विमानातून माझी फिल्म पाठवायची म्हणजे ती पहिल्या बातमीपत्रात वापरता येईल.त्यामुळे मला उशीर होतो आहे असे बघून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून मुख्यमंत्र्यांना थोडे बोलण्यात गुंतवले. तोवर मी विमानतळावर पोहोचलोच. फक्त दहा मिनिटे उशीर झाला होता. मी पोहोचताच लगेच माझा ताबा घेतला आणि मला मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्काधिकारी वसंत खेर यांच्याकडे घेऊन गेले. त्यांचे हवाली फिल्म केली .आणि मगच आम्ही मोकळे झालो. त्या दिवशी सुधाकर धारव या अधिकाऱ्याची नियोजन क्षमता काय आहे याचा अंदाज मी घेऊ शकलो.
त्यानंतर अकोल्याला मला वारंवार जावे लागले .दरवेळी सुधाकर धारव इथे मदतीला असायचे. अडचणीच्या वेळी बरोबर सांभाळून कसे घ्यायचे याची त्यांना उत्तम जाण होती. त्याचा अनुभव मला अनेकदा आला.
असे असले तरी वरिष्ठ अधिकारी असल्याचा अहंभाव त्यांच्यात कधीच नव्हता. कायम हास्यविनोद करत ते हाताखालच्या आणि वरच्या अधिकाऱ्यांनाही सांभाळून घ्यायचे. जिल्हा माहिती अधिकारी म्हणजे पत्रकार, वरिष्ठ अधिकारी, मंत्री, आणि राजकारणी, सगळ्यांशीच संबंध येतो. या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवून ते काम सांभाळायचे.
वर्षभरातच सुधाकर धारव यांची बदली अकोल्याहून वर्धेला झाली. वर्धा हे त्यावेळी विदर्भातले एक संवेदनशील केंद्र होते. तिथे जवळच असलेल्या पवनारला त्यावेळी आचार्य विनोबा भावे निवासाला होते. परिणामी तिथे सारखेच वृत्त संकलनाला जावे लागायचे. योगायोगाने १९८० साली वर्धेचेच खासदार असलेले वसंत साठे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री झाले. त्यामुळे तर वर्ध्याला दर आठवड्याला जावे लागायचे. तिथे मला सांभाळून घेण्याचे काम सुधाकर धारवच करायचे. त्यावेळी वर्ध्याला लागून असलेल्या सेवाग्राम मध्ये मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीत माझी थोरली बहीण नोकरीला होती. धारव नागपूरला आले की आवर्जून अलकासाठी काही न्यायचे आहे का म्हणून विचारायचे आणि काही किरकोळ सामान असेल तर घेऊन जायचे आणि तिला होस्टेलवर पोहोचवूनही द्यायचे.
योगायोगाने अलकाताईचे लग्न जमले. तिचे सासरही वर्धेतच धारवांच्या घराजवळच होते. त्यामुळे धारवांना मी अधून मधून त्रास देत होतो. तेही आनंदाने मला सहकार्य करायचे.
धारव वर्धेत असतानाच आचार्य विनोबा भावे खूप आजारी झाले. त्या आजारपणातच त्यांनी प्रायोपवेशण सुरू केले. त्यातच त्यांचे निधन झाले. ते दहा दिवस आमचे अत्यंत धावपळीचे होते. त्यावेळी देखील सुधाकर धारव हेच कायम मदतीला येत होते.
नंतर मी दूरदर्शन सोडून मुद्रित माध्यमात आलो. तोवर सुधाकर धारवांची पदोन्नती होऊन ते उपसंचालक झाले होते. मग काही काळ नागपूरला, काही काळ अमरावतीला, आणि काही काळ मुंबईला, अशी त्यांनी नोकरी केली. तेव्हाही त्यांच्या नियमित भेटी होत होत्या. निवृत्त झाल्यावर काही काळ ते नागपूरात राहिले. नंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या यवतमाळमध्ये ते स्थलांतरित झाले. तिथेच अखेरपर्यंत त्यांचा मुक्काम होता.
मला आठवते माहिती खात्यातूनच संचालक म्हणून निवृत्त झालेल्या देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या पोर्टलवर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर एक लेख टाकला होता. तो लेख सुधाकर धारव यांच्या वाचण्यात आला. त्यांनी लगेचच भुजबळ यांना फोन केला आणि अविनाश माझा चांगला मित्र आहे त्याचा नंबर मला पाठवा म्हणून त्यांच्याकडून माझा नंबर घेतला आणि लगेचच आमच्या फोनवर गप्पा झाल्या. तेव्हापासून आमचा पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला होता.
धारवसाहेब माझ्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी जेष्ठ मात्र अगदी बरोबरीच्याच नात्याने गप्पा करायचे. अधून मधून आमचे फोनवर बोलणे होत होते. नेमके या तीन-चार महिन्यात काही कारणाने आमचा फोनवर संपर्क झाला नव्हता. आणि नेमकी काल रात्री ते गेल्याची बातमी कळली.
सुधाकर धारव हे माझ्या अनेक चांगल्या मित्रांपैकी एक होते, आणि त्यांची उणीव मला कायम जाणवत राहणार आहे….
सुधाकर धारव यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…
— लेखन : अविनाश पाठक. ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
भावपूर्ण आदरांजली.
भावनेने ओथंबलेली शब्दसुमने धारवसाहेबांच्या चरणी.
खूपच हृदयस्पर्शी.
भावपूर्ण श्रद्धांजली