आज, २७ एप्रिल २०२२ रोजी आमदार पी जी दस्तूरकर यांचा १२ वा स्मृतीदिन आहे.
त्या निमित्ताने त्यांचे स्नेही, सहकारी, चाहते यांनी सांगितलेल्या आठवणी…
पी जी दस्तुरकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
१) मनस्वी पी. जी. दस्तूरकर
प्रभाकर दस्तूरकर नावाचं वादळ जीवनाच्या रंगभूमीवरून १२ वर्षांपूर्वी अचानक लुप्त झालं. एक निधड्या छातीचा लढवय्या आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाने अन्यायग्रस्त शिक्षक समुदायाच्या अंगावर रोमांच उभे करणारा नेता अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेला, तेव्हा या बातमीवर बराच वेळ माझा विश्वासच बसला नाही. परंतु कधी कधी अविश्वसनीय कटुसत्याला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नसते.
पी.जी. घरचे गरीब. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील खडकी हे त्यांचे मूळ गाव. कुटुंब व्यवसायाने कासार. जत्रेत भांड्याचे दुकान टाकून व्यवसाय करायचा. १९६५ साली ते शिक्षणासाठी नांदेडला आले. प्रतिभा निकेतनच्या विद्यार्थीप्रिय सर्जे गुरूजींनी छात्रनिवासमध्ये प्रभाकरची व्यवस्था केली, म्हणून शिक्षण पूर्ण झाले. बारावी पास झाल्यावर येलदरी कँपवर अकाउंटंट म्हणून पहिल्यांदा नोकरी केली. पुढे एमएससी, बीएड् झाल्यावर केशवराव धोंडगे यांच्या शिवाजी हायस्कूलमध्ये ‘गुरुजी’ म्हणून रुजू झाले.
‘गुरुजी’ म्हणून रुजू झाल्यावर काम करताना सद्विवेकबुद्धीला रजा दिली नाही. विद्यार्थ्याच्या प्रश्नांशी एकरूप झाल्यामुळे अल्पावधीतच दस्तूरकरांचे नाव सर्वांच्या तोंडी झाले.
मी १९६७ साली प्राध्यापक म्हणून धर्माबादला लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात रूजू झालो. त्या काळात दस्तूरकर चळवळे म्हणून आम्हाला माहिती झाले. नांदेडच्या मिट्टीका शेर गल्लीत मोईन भाई यांच्या घरात ते किरायाने राहत होते. देवधर्म न मानणाऱ्या गुरूजींना पाठक गल्लीतील ब्राह्मणांनी घर दिले नाही. आम्हाला त्या निमित्ताने अस्सल ‘मातीतला शेर’ पाहायला मिळाला. पी.जी. ला भेटायला गेलं की जाणवायचं, या माणसाच्या विचारांचा आवाका फार मोठा आहे. सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे जग न्याहाळणारा हा माणूस. पाठक गल्ली म्हणजे सनातन्यांचे माहेरघर. दस्तुरकरांच्या अंगात मार्क्सवाद भिनला होता. त्यांचे मार्क्सवादावर केवळ बोलणे नव्हते तर घुमणे होते. त्यांनी आपल्या मुलांची नावे ठेवताना कार्लमार्क्स डोळ्यांसमोर ठेवला होता. एका मुलीचे नाव ‘लेना’ ठेवले होते. रशियातील ‘लेना’ या नदीवरून हे नाव त्यांना सुचले. दुसऱ्या मुलीचे नाव ‘जेनी’. हे नाव मार्क्सच्या बायकोच्या नावावरून सुचले. सारे काही जगावेगळे. कट्टर डाव्या विचारांचे दस्तूरकर मनाने उमदे आणि उजवे होते.
पी.जी. म्हणजे शिक्षक चळवळ आणि शिक्षक चळवळ म्हणजे पी.जी. असे अभेद्य नाते त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवले. कलेक्टर ऑफीसवर मोर्चा काढताना दस्तूरकरांना अक्षरक्ष: कशाचेही भान राहात नसे. ना.रा. जाधव आणि दस्तूरकर या जोडगोळीने शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. मुक्टाच्या मोर्चात ते अनेक वेळा आमच्याबरोबर सहभागी झाले. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवाणी असे. फटाक्यांचा आवाज आणि दस्तूरकरांचा आवाज यांच्यातील फरक श्रोत्यांना जाणवत नसे. अधूनमधून हास्याची कारंजी उडत आणि श्रोते विचार वर्षावाने ओलेचिंब होत असत. निष्कलंक चारित्र्य, स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती आकडेवारीसह मांडणी, चौफेर नजर, हजरजबाबीपणा यामुळे दस्तूरकर आम्हाला ‘आपले’ वाटत असत. त्यांनी मराठवाडा शिक्षक संघटना बांधली, वाढविली व टिकविली. वासुदेव वेबळकर या संघटनेचे पहिले अध्यक्ष. मराठवाड्याला शिक्षकांचा स्वतंत्र मतदारसंघ असावा, यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघाची मागणी पदरात पाडून घेतली. १९७४ साली मराठवाड्यातील शिक्षकांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. राजाभाऊ उदगीरकर, डी. के. देशमुख, प.म. पाटील या सारख्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.
दस्तूरकर सर १९९२ ते ९८ या काळात शिक्षकांचे आमदार होते. शिक्षकांबरोबर आमच्या संघटनेतील प्राध्यापकांनीही त्यांना भरभरून मते दिली. मजुरांचे किमान वेतन ५० रु. करावे, यासाठी त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. शिक्षकांना सेवाशाश्वती, बँकेतून पगार, शिक्षण कायदा, यासारखी शिक्षकांच्या जीवनात क्रांती करणारी विधेयके मांडली. गॅटवर एकदा नव्हे दोनदा आकाशपाताळ एक करून सभागृह बंद पाडले. विधान परिषदेत त्यांचे गुरू म्हणजे प्राध्यापकांचे नेते आमदार बी.टी. देशमुख यांनी नेट/सेट प्रश्नावर अनेक वेळा सरकारला कोंडीत पकडले. विधान परिषदेतील अनेक तांत्रिक बाबीची माहिती बी.टी. कडून त्यांनी घेतली. कायदेमंडळाच्या शस्त्राचा वापर त्यांनी फार खुबीने केला.
नांदेड येथील विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासंबंधीचा अशासकीय ठराव दस्तूरकांनी दि. २४/१२/१९९३ रोजी विधान परिषदेत मांडला. या ठरावाला आ.बी.टी देशमुख, आ. सुरेश पाटील, आ. डायगव्हाणे आ.टी.एफ. पवार यांनी पाठिंबा दिला. या ठरावावर आ. किशनराव राठोड, आ. बाजीराव शिंदे यांची भाषणे झाली. उच्चशिक्षणमंत्री ना. प्रभाकर धारकर यांनी या ठरावासंबंधी यू.जी.सी.शी संपर्क साधण्याचे सूचित केले. याच प्रश्नाबाबत दि. ३०/१२/ १९९३ रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्या पत्रात असे म्हटले आहे की, मराठवाड्यात कॉलेजेसची संख्या २५० च्यावर गेली आहे. नांदेड येथे १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र असून ५५० एकर जागा आहे. एकूण ६ पदव्युत्तर वर्ग तिथे चालू असून विद्यार्थीसंख्या भरपूर आहे. या भागातील जनतेच्या मागणीप्रमाणे नांदेड-परभणी-लातूर- उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या सोयीसाठी या उपकेंद्राचे रूपांतर स्वतंत्र विद्यापीठात करावे. आ. दस्तूरकरांनी या निवेदनावर ५० आमदार खासदारांच्या सह्या घेतल्या. त्यात खा. सूर्यकांता पाटील, आ. डी. आर. देशमुख, आ. भास्करराव पाटील खतगावकर, आ. कमलकिशोर कदम, आ. लक्ष्मण माने, आ. रा.सु. गवई, आ. निहाल अहमद, आ. रावसाहेब दानवे, आ. प्रभाकर संझगिरी आदींचा समावेश होता. डॉ. जनार्दन वाघमारे समितीने विद्यापीठविषयक अनुकूल अभिप्राय दिल्याचेही पी.जी. दस्तूरकर यांनी २८/७/ ९४ रोजी सभागृहात सांगितले. दि. १९/९/९४ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांची विविध विषयांवरील भाषणे अभ्यासपूर्ण असत. त्यामुळे शासनाने ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून त्यांचा गौरव केला होता.
पी.जी. दस्तूरकरांनी दुसऱ्यांदा शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविली त्यावेळी शिक्षक संघटनेत फूट पडली होती. अनेकांना ते रूचले नाही. परिणामी पी.जी. दस्तूरकरांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचे विश्लेषण वेगळे होते: ‘मतदारांना पी.जी. दस्तूरकर ब्राह्मण वाटले आणि प. म. पाटील मराठा वाटले. यामुळे माझा पराभव झाला.’ ते काहीही असो, तेव्हापासून पी.जी. खचले. ‘मी शिक्षकांची आयुष्यभर कामे केली, पण त्यांनी मात्र माझी किंमत केली नाही,’ ही बोचणी त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यातच त्यांना दोन वर्षापूर्वी अधांगवायूचा झटका आला. आपण परावलंबी झालो. आता यापुढे परावलंबी आयुष्य जगायचे नाही, हे त्यांच्या मनाने पक्के केले. एकेकाळी गर्दीचा चाहता असलेला शिक्षकनेता आता गर्दीपासून दूर राहू लागला.
आमदार असताना मुंगळ्यासारखे लोक चिकटायचे, पण आता बदललेल्या परिस्थितीत वर्दळ कमी झाली. ते एकांतात हरवून बसले. कम्युनिस्ट पार्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठवाडा जनता विकास परिषद, मराठवाडा शिक्षक संघटना, महसूल कर्मचारी संघटना यांनी वेळोवेळी जी आंदोलने उभी केली, त्यात दस्तूरकर प्रकृती सांभाळून सहभागी होत असत. दस्तूरकरांच्यामध्ये पूर्वीसारखा जोश उरला नव्हता. ते दैनंदिन काम पुढे रेटत होते. मला म्हातारा व्हायचं नाही, आपल्या देशात इच्छामरणाचा कायदा पाहिजे, असे त्यांनी एका पत्रात लिहून ठेवले होते.
पी.जी. गेंड्याची कातडी असलेले राजकारणी नव्हते. धूर्त नव्हते. समाजातील दु:ख, दैन्य, दारिद्र्य, विषमता, अन्याय पाहिला की ते गलबलत,सैरभैर होत असत. नांदेडला गुरूता गद्दी मुळे आगळे वेगळे रूप प्राप्त झाले, पण नांदेडचे वैभव असलेली एन.टी.सी मिल बंद झाल्याचे दुःख त्यांना सतावत होते. कामगार चळवळीवर सावट आले. विनाअनुदान शिक्षणसंस्थेत शिक्षण सोडून बाकी सर्व काही आहे, असे ते म्हणत. मी, दस्तूरकर आणि इंजिनीअरिंग कॉलेज प्राध्यापक संघटनेचे नेते प्रा. एम. जी. लोमटे मिळून मुक्टाच्या वतीने इंजिनीअरिंग महाविद्यालयांना भेटी दिल्या. ९५% महाविद्यालयात पायाभूत सोयी नव्हत्या. पात्रताधारक प्राध्यापक नव्हते. वाचनालय वर्तमानपत्रापुरते मर्यादित होते. अशा महाविद्यालयांचा त्यांनी आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला.
दस्तूरकर भावनाशील होते. मनस्वी होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षक चळवळीत कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. आता ती कोण भरून काढणार ? दस्तूरकरांच्या आत्म्यास भावपूर्ण आदरांजली !

– लेखन : डॉ दिपक म्हैसेकर
मा. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, निवृत्त पुणे विभागीय आयुक्त, दस्तूरकरांचे कुटुंबमित्र.
२) मशाल
मराठवाडा शिक्षक संघ ही मराठवाड्यातील शिक्षकांची आद्य चळवळ. झुंजार लढवय्या शिक्षक नेत्यांनी या आद्य चळवळीचे नेतृत्व केले. शाळेत अभ्यासू, विद्यार्थी प्रिय असलेले हे शिक्षक “भयमुक्त शिक्षक, भ्रष्टाचार मुक्त गुणात्मक शिक्षण ! कर्तव्याचे अनुपालन आणि हक्कासाठी संघर्ष !! हे घोषवाक्य घेऊन ‘मराठवाडा शिक्षक संघाच्या’ बॅनरखाली संघटित झाले. शिक्षकांच्या गौरवशाली लढ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिक्षकांना सेवा शाश्वती पासून सेवानिवृत्ती पर्यंतचे लाभ मिळवून देण्यासाठी अनेकानेक आंदोलने करण्यात आली. शिक्षक असलेले कार्यकर्ते ‘शिक्षक आमदार’ म्हणून पाठवण्याची परंपरा राज्यातील शिक्षकांनी सुरू केली होती. शिक्षकांचा रस्त्यावरील संघर्ष जसाच्या तसा विधिमंडळात मांडला जात होता. म्हणून शिक्षक आणि शिक्षणाच्या हीताचे धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावे लागले. या संघर्षातील महत्वाचे नाव पी.जी.दस्तुरकर.
मराठवाडा शिक्षक संघाचे झुंजार, व्यासंगी, अभ्यासू, लढवय्ये नेते, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!!
मराठवाडा विभागातील शिक्षकांच्या चळवळीतील अग्रणी असा ज्यांचा नामोल्लेख करावा लागतो असे औरंगाबाद विभागाचे माजी शिक्षक आमदार पी.जी.दस्तुरकर होत. शिक्षक चळवळीत काम कसे करावे ? शिक्षकांचा आमदार कसा असावा ? याचे ते उत्तम उदाहरण होत.
दस्तुरकर सर, शिक्षक आमदार राजाभाऊ उदगीरकर, अनंतराव देशमुख यांच्या सोबत नेहमीच संपूर्ण मराठवाडाभर दौरे करत. संघटनेत काम करत असतानांच वाचन, प्रवास आणि धाडस ही त्यांची त्रिसुत्री होती. आम्ही सरांचा उत्तर कार्यकाळ पाहिला. 1970 ते 1990 हा सरांच्या उमेदीचा कालखंड होता.प्रचंड धाडसी वृत्ती आणि भरपूर काम करण्याच्या महत्वाकांक्षेच्या बळावर सर 1992 ला औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आले.
दस्तुरकर सरांनी विधान परिषदेच्या 1992 ते 1998 या सहा वर्षाच्या कालावधीत शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड लढा उभा केला. महाराष्ट्र सरकारला सभागृहात असंख्य वेळा धारेवर धरले व बघता बघता पी.जी.दस्तुरकर हे नावं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झाले.
वैधानिक विकास मंडळाची स्थापना असो, नांदेड येथे स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाची स्थापना असो की राज्यातील शिक्षकांना पाचवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या शिक्षकांप्रमाणे लागू करणे असो की, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न असो की असंघटीत कामगारांचे प्रश्न… विविध प्रकारच्या मागण्या सरांनी रेटा देऊन मान्य करून घेतल्या.
“विनानुदानित धोरण” ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे, असे ते म्हणत. शिक्षणाचा दर्जा सुधारावयाचा असेल तर शिक्षकांचा दर्जा आधी सुधारला पाहिजे म्हणून शिक्षकांचे वेतन व भत्ते जर्मनी, अमेरिकेतल्या शिक्षकांप्रमाणे असले पाहिजे असे ते भाषणातून सांगत.
दस्तुरकर सरांचा चळवळीतल्या प्रत्येक शिक्षक कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रभाव होता. अनंतराव देशमुख सर, यु.आर.थोंबाळ सर, जी.एस.बुरांडे, द.बा.घुंबरे, हिंगोलीचे राखे सर, मुंडे सर, आनंद भंडारे, आर. जी. जाधव, शिंदे सर, इ.ना.जाधव, बी.टी.सांगळे, रामदास चिंचोळे, सुभाष पाटील, ताकभाते सर, आनेराव सर, साबने सर, सय्यद सर आणि माझ्याशी घंटो घंटे सर गप्पा मारत आणि शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे असे म्हणत.
दस्तुरकर सरांचा अभ्यास दांडगा होता. विधान भवनातील वाचनालयात तास न तास ते भूतपूर्व आमदारांनी केलेले कार्य, सभागृहात झालेला निर्णय, भाषणं वाचत असत आणि मराठवाड्यात कोणत्याही जिल्ह्यात कार्यक्रम ठेवला की अभ्यासपूर्ण मांडणी करत.आज जसे आमचे लाडके शिक्षक नेते शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागोजी गाणार अभ्यासपूर्ण विवेचन करतात तसे अत्यंत मिश्किलपणे ते बोलतांना विनोद करत. कोल्हाट्याला जसे तारावर नृत्य करावे लागते तशी कसरत शिक्षक आमदाराला करावी लागते कारण शिक्षक, विद्यार्थी, शाळा व समाज या सर्वांचे हित साधावे लागते असे ते म्हणत.
शिक्षक चळवळीतल्या या महान विभूतीने आपल्या स्वकर्तृत्वावर राज्यातील असंख्य शिक्षकांच्या मनावर ठसा उमटवला अशा महान नेतृत्वाला विनम्र अभिवादन….!!! पी. जी दस्तुरकर नावाची मशाल अखंड तेवत राहो हीच मनिषा……!!!
– लेखन : डी.सी.डुकरे. जिल्हा अध्यक्ष
राज्य शिक्षक परिषद, परभणी जिल्हा
३) अमीट ठसा
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात , मंत्रालय, मुंबई येथे मी आधी 1993 ते 1998 या कालावधीत वरिष्ठ सहाय्यक संचालक वर्ग 1 आणि नंतर 2003 ते 2008 या कालावधीत उपसंचालक, वृत्तविभाग म्हणून कार्यरत होतो. तेव्हा दस्तुरकर सर जेव्हा जेव्हा मुंबईत असत आणि काही कामानिमित्ताने मंत्रालयात आले की हमखास न चुकता मला भेटायला येत .ही त्यांची भेट म्हणजे बौद्धिक मेजवानी असे. अतिशय सहजपणाने ते विविध गोष्टींवर प्रकाश टाकत. या त्यांच्या भेटीत त्यांनी मला कधीही कुठल्याही प्रकारचे काम सांगितले नाही. अतिशय निर्मळ मनाने ते भेटत असत. आपण आमदार आहोत, विधान परिषदेचे सभागृह गाजवणारे शिक्षकांचे नेते आहोत असा जरासाही आविर्भाव त्यांच्या वागण्याबोलण्यात नसे. त्यामुळे त्यांच्या लोभस, अभ्यासू, तळमळीच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर कायमस्वरूपी ठसा उमटलेला आहे. सरांना मी आजन्म विसरू शकत नाही. त्यांना माझे व माझ्या कुटुंबियांचे विनम्र अभिवादन.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक तथा संपादक
तत्वनिष्ठ, लढवैय्ये दस्तुरकरसरांच्या खूप छान आठवणी जागवल्या आहेत.