सोलापूर जिल्ह्याचेच नव्हे तर मराठी साहित्य विश्वाचे भूषण असलेले आदरणीय निर्मलकुमार फडकुले सरांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दरूप आदरांजली….
मराठी भाषेत काही रत्ने जन्मली त्यात सोलापूरचे भूषण असलेले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. निर्मलकुमार जिनदास फडकुले यांचा समावेश होतो. अतिशय विव्दान तरीही नम्र असे व्याख्याते असा त्यांचा लौकिक होता. जैन धर्मातील तत्त्वज्ञानाबरोबरच संत तुकारामांचा आणि इतर संतांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात ते मराठी शिकवीत.
निर्मलकुमारांचे प्राथमिक शिक्षण सोलापुरातील जैन पाठशाळेत झाले. मॉडेल हायस्कूल इंग्लिश स्कूल व हरिभाई देवरपण हायस्कूलला झाले. वडील जिनदास फडकुले हे संस्कृतचे निष्णात अभ्यासक होते. शालेय वयातच त्यांचे संस्कृत पक्के झाले होते. वक्तृत्व कलेत पारंगत ते बालवयातच झाले.
वडील जिनदास यांनी त्यांच्यातील वक्तृत्वगुण ओळखून त्यांना घडविले. वडिलांनी त्यांच्यातील साहित्यिक व संस्कृतचा विद्यार्थी तयार केला. त्यांनी विपुल ललित लेखनही केले आहे. पुण्याला फर्गसन महाविद्यालयातून ते बी. ए. व सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातून ते एम. ए. उत्तीर्ण झाले. १९७० मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून ते मराठीचे पी. एच.डी झाले. त्यावेळी गुरुवर्य वि. म. कुलकर्णी त्यांचे मार्गदर्शक होते. “लोकहितवाद – काल आणि आज ” हा त्यांच्या पी. एचडीचा विषय.
पुण्यात शिकत असतानाच अनेक थोरामोठ्यांची व्याख्याने त्यांना ऐकायला मिळाली. नाथ पै, स्वातंत्र्यवीर सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, गं. बा. सरदार, रा. श्री. जोग, पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांचे बंधू समाजशास्त्राचे प्राध्यापक विलास संगवे होत. ते तुकारामाच्या अभंगावर निरुपण इतके उत्तम करीत की स्वतः तुकारामच आपल्याला ते समाजवून सांगत आहे, असा भास होत असे.
सोलापुरातील भारतीय निवासातील छोट्या घरात ते राहत. माझे त्यांच्या घरी जाणे येणे असे. ते तसे माझे शिक्षक नव्हते परंतु त्यांच्या वक्तृत्वशैलीचा मी श्रोता होतो. पुणे आकाशवाणीवरून त्यांची काही व्याख्याने प्रसारित झाली. मी ती महाविद्यालयीन वयातच ऐकून त्यांना पत्र लिहिले. ती व्याख्याने खुप प्रभावित करणारी होती हे त्यांना कळवले. कुणीतरी एक श्रोता पत्र लिहितो याचे त्यांना विलक्षण कौतुक होते.
गोव्यात ते अनेकदा व्याख्यानासाठी आले होते. परंतु मला त्यांना भेटणे जमलेच नाही.
भावगर्भ आणि विचारप्रवण असे त्यांचे व्याख्यान असायचे. विविध उदाहरणे देत ते आपले विचार पटवून देत. आवाजात मधुर संगीत असायचे. त्यांची छबी पाहताच धारवाडचे जी. ए. कुलकर्णी यांची आठवण व्हायची त्यांच्या चेहऱ्यात इतके साम्य होते. आपण ज्या विषयावर बोलतो ते व्यक्तिमत्त्व नजरेसमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते.
ज्ञानोबा तुकोबापासून ते स्वामी विवेकानंद, आगरकरांपासून सावकरांपर्यंत विविध विषय त्यांच्या व्याख्यानात यायचे. अभ्यासपूर्ण विवेचन आणि श्रोत्यांचे मानसशास्त्र ओळखणारे ते वक्ते होते.
त्यांनी विपुल लेखन केले. ललित लेखन ते समीक्षा अशी विविधांगी पुस्तके त्यांनी लिहिली. २८ स्वतंत्र व ११ संपादित पुस्तके लिहिली. उपहासगर्भ, मिश्किल तरीही मन आणि बुध्दिला चालना देणारे आवाहनात्मक लेखन हे त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य.
त्यांच्या १९८८ साली प्रसिध्द झालेल्या हिरव्या वाटा या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला. त्यांची काही पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत. १९८६ मध्ये प्रसिद्ध झालेले काही रंग काही रेषा, १९८८ मध्ये आनंदाची डहाळी, रंग एकेकाचे हा संग्रह १९९३ मध्ये प्रसिद्ध झाला. तसेच अमृतकण कोवळे, प्रिय आणि अप्रिय ही त्यांची पुस्तके १९९० च्या दशकात आली. नव्या सहस्रकात म्हणजे २००० मध्ये चिंतनाच्या वाटा आल्या. तर मन पाखरू पाखरू हे पुस्तक २००१ मध्ये प्रसिद्ध झाले. दीपमाळ हे पुस्तक तसेच अजून जग जिवंत आहे ही पुस्तके २००५ मध्ये आली. काटे आणि फुले हे ललित लेखसंग्रह २००७ मध्ये प्रसिद्ध झाला. समाजप्रबोधनात्मक ललित लेखन त्यांनी सातत्याने केले.
त्यांना विविध पुरस्कारही मिळाले. महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार, आचार्य नरहर कुरुंदकर पुरस्कार, आचार्य विद्यानंद साहित्य पुरस्कार, भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार (हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, प्रज्ञावंत पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला. राष्ट्रीय बंधुता समाज, परिवर्तन साहित्य संमेलन, मराठी जैन साहित्य संमेलन आदी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे ते संचालक होते. शालेय अभ्यासक्रमात त्यांची पुस्तके आहेत.
— लेखन : प्रकाश क्षीरसागर. गोवा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800