भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी सुरबानाना टिपणीस यांचे चिरंजीव तथा महाड येथील निवृत्त मुख्याध्यापक, सतीशचंद्र टिपणीस यांनी जागविलेल्या हृद आठवणी…
माझी आणि बोधिसत्वांची (भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर) लक्षात राहिलेली पहिली गाठभेट, मी सात-आठ वर्षांचा असताना, त्यांच्या “राजगृह” या सदनांत झाली .
आम्ही म्हणजे माझे वडील व इतर भावंडे त्यावेळेस मुंबईतील व्हिंन्सेटरोडवर (नवा आंबेडकर रोड) अग्रवाल नगर, ईमारत नं.३ मध्ये रहात असू. हे दोन खोल्यांचे स्वतंत्र घर बोधिसत्वांमुळे वडिलांना मुंबई नगरपालिकेमार्फत मिळाले होते. त्याचे असे झाले की,
दुस-या महायुद्धाच्यावेळी जपान हे राष्ट्र हिंदूस्थानवर हल्ला करेल असा होरा ब्रिटिश राजसत्तेने बांधला होता आणि तो खरा ठरला. हिन्दूस्थानच्या पूर्व किनारपट्टीवर विशाखापट्टणमवर काही बॅाम्बहल्ले जपान्यांनी केले. जपान्यांचे पुढील लक्ष्य मुंबई बंदर असणार हे हेरून त्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी केली. विमानहल्ला झाल्यावर होणारी नासधूस दूर करण्यासाठी कोकणातून शेकडो कामगारांची कुटूंबे मुंबईत आणून अग्रवाल नगरमध्ये सहा ईमारतीत ठासून भरली होती.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मजूरमंत्री होते. त्यांनी अ.भा.आकाशवाणीवर उद्घोषक(अनाऊन्सर)
म्हणून माझ्या वडीलांची नेमणूक करण्याची व्यवस्था केली व मुंबईत रहाण्यासाठी वर उल्लेखिलेला ब्लॅाक मिळवून दिला. हिंदू कॅालनी हा विभाग अग्रवाल नगर पासून म्हणजे आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासून काही मिनीटांच्या अंतरावर आहे की ज्या हिंदू कॅालनीच्या ५ नंबरच्या गल्लीत डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे “राजगृह” हे वसतीस्थान आहे.

मी वडीलांबरोबर “राजगृहावर” गेलो ती वेळ सकाळची होती. राजगृहाच्या पुर्वेकडे असणा-या गवाक्षातून येणा-या उन्हामुळे संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली होती. दिवाणखान्यात बोधीसत्व डॅा. बाबासाहेब शांतपणे वर्तमानपत्रातील बातम्यांचे चिंतन करीत होते.
शंकर नावाच्या त्यांच्या घरातील सहाय्यकाने आम्ही आल्याची वर्दी त्यांना करून दिली. त्यांनी आमचे अगत्याने स्वागत केले. मला जवळ बोलावून नाव वगैरे विचारले. दरम्यान शंकरने आणलेला चहा मी व माझ्या वडिलांनी घेतला. नंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. ते करत असलेल्या चर्चेतील मला फारसे काही कळत नव्हते. परंतु ज्यावेळेस काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख होई त्यावेळी थोडा बोध होई.
माझे लक्ष त्यांच्या पुस्तकांच्या कपाटांनी वेधून घेतले होते. कपाटाजवळ जाऊन मी ते ग्रंथ न्याहाळू लागलो. जमिनीपासून बहुदा छतापर्यंत उंच असलेल्या काचेच्या कपाटात शेकडो पुस्तके हारीने मांडून ठेवण्यात आली होती. संपूर्ण एक भिंतच त्या कपाटांनी व्यापली होती. ती पुस्तके कोणत्या विषयांवरची होती ? त्या वयात मला इंग्रजीचा गंधही नव्हता पण त्या पुस्तकांची भुरळ मला पडली होती. आपणही डॅा. आंबेडकरांसारखी खूप पुस्तकं जमा करायची असे मी तेव्हा म्हणजे वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी ठरविले.
माझ्या वडिलांचा आणि बोधिसत्व डॅा. आंबेडकर यांचा परिचय इतका दृढ होता की कामानिमित्त असो अथवा विश्रांती घेणे असो, कोणत्याही कारणाने का होईना बोधिसत्वांचे महाडास आगमन झाले की मुक्काम आमचे घरी असे. आमच्या कुटूंबाची एकूण परिस्थिती यथातथाच होती. वर्षभरात एकदाच पिकविला जाणारा तांदूळ व थोडीफार कडधान्य हीच आमची श्रीमंती. डोक्यावर छप्पर होते आणि दाराशी दूधदूभते.
वडिलांच्या यथातथा परिस्थितीची डॅा.आंबेडकरांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांचे आमच्या घरी येणे वडिलांना जाचक वाटले नाही. मुळात गरीब, दिन-दुबळ्या वर्गाचेच ते प्रतिनिधी असल्याने आपल्या सारख्याच इतरांच्या अडचणी काय असतील याची पूर्ण कल्पना त्यांना होती.
डॅा.बाबासाहेबांचे आमच्या घरी येणे म्हणजे आनंदीआनंद. आम्हा घरातील मुलांना ते दिवस सण अथवा उत्सव असल्या सारखे वाटत असे. घराचे एकदम रूपच बदलून जाई. पोटमाळयापासून अंगणापर्यंत संपूर्ण घर चकाचक होई.
डॅा. बाबासाहेब होता होईस्तो नोव्हेंबर -डिसेंबर मध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात महाडला येत असत. पाऊस नुकताच सरलेला असे. पावसाळ्यात खराब झालेले घराच्या मागीलदारचे अंगण चोपून सारवून सारखे केले जाई. हिरव्यागार शेणाने सारवल्यामुळे अंगणाला सौंदर्य प्राप्त होई. नुकत्याच सारवलेल्या ओलसर अंगणात माझी आई सफेद रांगोळीने चौपाट काढी. त्यामुळे अंगणाची शोभा आणखी वाढे.

ओटीपासून मागील पडवीपर्यंत सर्व घराला सफेद चुन्यात थोडी नीळ टाकून तयार होणा-या रंगाने रंग दिला जाई. दिवाळीच्या सणाला देखील एवढी रंगसफेदी होत नसे. महाडच्या गांधी टॅाकीजचे मालक कै. देवचंदभाई गांधी यांच्याकडे वाघाचे अथवा हत्तीच्या चित्रांचे गालीचे होते, ते आणले जात. कै. पितांबरभाई गांधी यांचे दुकानात गि-हाईकांसाठी भारतीय बैठक असे. सहाजीकच त्यांचेकडे तक्के बरेच असत. पांढरे स्वच्छ अभ्रे घालून ते तक्के कै. पितांबरभाई गांधी पाठवून देत. या साहित्यातून बाबासाहेबांची बैठक होई.
आमच्या मुळ जुन्या घराला माडी (दुसरा मजला) व पोटमाळा होता. माडीवर घराच्या दर्शनी भागात बावीस फूट लांब व पंधरा फूट रूंद अशी एक खोली होती. त्या खोलीला “हॅाल” असे भारदस्त इंग्रजी नाव होते. आज त्या गोष्टीचे हसू येतै. पण स्मृती जागवल्या जातात त्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या तेथील वास्तव्याच्या !
महाडला आल्यावर ते याच हॅालमध्ये असत. याच जागी वडिलांबरोबर आणि त्यांच्या इतर अनुयायां बरोबर चर्चा होई. गावातील व गावच्या पंचक्रोशीतील त्यांना मान देणा-या मंडळींबरोबर मोकळ्या गप्पा याच हॅालमध्ये रंगत. या बैठकी सर्वधर्मसमभाव, जातीबंधनातीत असत.
महाड जवळच्या बहूर गावचे पैग. अब्दुल वहाब फजदार, गोरेगावचे कै. चंद्रकांत अधिकारी, खेडचे कै. जगन्नाथराव पाटणे, चिपळूणचे भास्करराव कोहळे, वडगावचे पांडोबा साळवी, दासगावचे आर. बी. मोरे,
कै. पितांबरभाई गांधी, कै.अण्णासाहेब भिलारे, कै. दगडोबा साळुंखे, कै. भिकोबा मालुसरे, कै. सुभेदार सवादकर, हे सर्व बैठकीत सामील होत. या सर्वधर्मससमावेशक बैठकीस कारणीभूत होते डॅा. बाबासाहेबांचे ज्ञानी, प्रभावी, भारदस्त व्यक्तीमत्व .
ज्युलियस सिझर अथवा अलेक्झांडर कोणातरी एकाबाबत असे बोलले जाते की, तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले. डॅा.बाबासाहेबांच्या बाबतीत असेच घडले.
प्रारंभी सनातन्यांकडून होणारा विरोध आता मावळू लागला होता. धार्मिक दहशतवाद पसरविणारे “अंगुलीमाल” तथागतांचे अनुयायी होऊ लागले होते.
डॅा. बाबासाहेबांबरोबर होणा-या कार्यकर्त्यांच्या राजकारणावरील चर्चा आणि एरव्ही मित्रपरिवाराशी आमच्या घराच्या माडीवरील हॅालमघ्ये रंगणा-या गप्पा यात माझी भूमिका हरकाम्याची म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून ठेवणे, बैठक तयार करण्यास मदत करणे, बैठकीत चहा लागल्यास तो निरोप आईला जाऊन सांगणे, जेवणाची पाने वाढली की वडिलांना माडीवर जाऊन सांगणे, डॅा.बाबासाहेबांना जेवण झाल्यावर हात पुसण्यासाठी टॅावेल पुढे करणे ही असत.
डॅा. बाबासाहेबांसाठी गादीभोवती पांढरी स्वच्छ चादर गुंडाळून टेकून बसण्यासाठी लोड तयार करणे हे काम मला आवडे, अर्थात मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे चालत. पुढे सार्वजनिक जीवनात पडणारी कामे उत्साहाने करण्याचे बाळकडू या हरकाम्याच्या भूमिकेत मिळाले होते. ही कामे करताना कधीही कमीपणा वाटला नाही.
डॅा. बाबासाहेबांमुळे अनेक मोठ्या माणसांचा सहवास लाभला. रावापासून रंकापर्यंत सर्व प्रकारची माणसे भेटली. असे म्हणतात की, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, संतांच्या आणि उच्च विचारसरणीच्या मानवांच्या सहवासात माणसाचे मी, माझे, माझ्यावाचून, माझ्यामुळे ही अहंकाराची सर्व रूपे गळून पडतात. माणसाचे मन चौपदरी वस्त्राने गाळलेल्या पाण्याप्रमाणे निर्मळ होते.
माझ्यासाठी बोधिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे महाभारतात श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जूनाला जे मायावी रूप दाखविले त्या स्वरुपात होते. कदाचित “माम अनुस्मर” हा संदेश ते “तू बुध्दीप्रामाण्यांवादी हो” असा देत असावेत.
इति आत्मय.

– लेखन : सतीशचंद्र टिपणीस
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी खूप छान सांगितल्या आहेत.. वाचताना मन हेलावून गेले… मा.सतीशचंद्र टिपणीस सर आपण भाग्यवान आहात… खूप खूप अभिनंदन आणि आभार सर….
मा.भुजबळ साहेब आपले ही हार्दिक हार्दिक धन्यवाद….!!!!
धन्यवाद साहेब,
आठवणीतील बाबासाहेब आपण
आपल्या बालपणीच्या आठवणी अतिशय हृद्य आहेत.
धन्यवाद साहेब.