भारतातील विख्यात हास्यव्यंग कवी आणि कुशल मंचसंचालक मधुप पांडेय यांचे निधन झाल्याची बातमी मी परवा दुपारी फेसबुकवर वाचून मला धक्काच बसला. कारण काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींच्या एका कार्यक्रमात मधुपजींची भेट झाली होती. त्यांच्या निधनाची अशी बातमी येईल ही कल्पनाही केली नव्हती.
मधुपजींच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या माझ्या स्नेह संबंधातल्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचा माझा परिचय साधारणतः १९७७-७८च्या काळातील .त्यावेळी मी नव्यानेच दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून सक्रिय झालो होतो. नागपूरच्या जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले मधुपजी त्या काळात हास्य व्यंग कवी म्हणून हळूहळू पुढे येत होते. विविध कार्यक्रमांमध्ये ते मंचसंचालन करताना दिसायचे. तिथेच त्यांचा माझा परिचय झाला.
मधुपजींचा माझा स्नेह जुळला तो १९८५ च्या दरम्यान. माझे मित्र डॉ. विनय उपाख्य राजाभाऊ वाईकर यांनी उर्दू गझलच्या संदर्भात जे काही काम केले त्याबद्दल राज्य उर्दू अकादमीने त्यांना सन्मानित केले होते. त्यानिमित्त डॉक्टर वाईकरांचा नागरी सत्कार सर्व भाषिकांच्या वतीने करावा असा आमचा प्रयत्न होता. त्यात त्यावेळी हिंदी भाषिकांच्या हिंदी साहित्य संमेलन या संघटनेत सक्रिय असलेल्या मधुपजींचे माझे जवळचे संबंध आले. त्यांच्या मदतीने नागपुरातील हिंदी आणि उर्दू भाषिकांना सोबत घेत आम्ही डॉ. विनय म्हणजेच राजाभाऊ वाईकरांच्या सत्काराचे यशस्वी आयोजन केले होते. तेव्हापासून माझे आणि मधुपजींचे स्नेहबंध अधिकच दृढ झाले. नियमित भेटी सुरू झाल्यात. अनेक प्रकल्पही आम्ही ठरवले. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अपूर्णच राहिले. मात्र आमचा स्नेह कायम राहिला.
त्या काळात मधुपजी दिवाळीचे भेट कार्ड म्हणून पोस्टाच्या इन लँड लेटर वर आपली एक व्यंग कविता छापायचे आणि त्या माध्यमातून सर्व स्नेहीजनांना दीपावलीच्या शुभेच्छ पाठवायचे. मला आठवते १९८८-८९ च्या दरम्यान आता एकविसाव्या शतकात जायचे आहे ही हवा देशभर सुरू झाली होती. त्यानिमित्ताने मधुपजींनी एक हिंदी व्यंग कविता केली होती. तिच्या पहिल्या दोन ओळी अशा लक्ष्मीवाहक उल्लूराम औंधे मुह खडे थे. उसके सारे चमचे मुह लटका के खडे थे.
या चार-पाच कडव्यांच्या कवितेत मधुपजींनी दिवाळी आली असताना लक्ष्मीचे वाहन असलेले घुबड म्हणजेच उल्लू हे का वापरत नाही असा लक्ष्मीला सवाल केला. त्यावेळी लक्ष्मीने उत्तर दिले की इक्कीसवी सदी मे जाना है ,तेज गती का जमाना है, इसलिये मैने उल्लू राम को कंपल्सरी रिटायर कर दिया है, और उसकी जगह एक रॉकेट हायर कर लिया है. इस रॉकेट मे बेठ कर मै घर घर जाऊंगी, और दीपावली की शुभकामनाये दुंगी, अशा आशयाचे लक्ष्मीने उत्तर दिले होते. शेवटी मधुपजींनी आपल्याही घरी लक्ष्मी येणार आणि आपली भरभराट करणार अशा शुभेच्छा व्यंग कवितेच्या माध्यमातून दिल्या होत्या.
त्या काळात व्यंग कवितांचे अनेक कार्यक्रम नागपुरात व्हायचे. मधुपजींच्या मैत्रीमुळे मलाही अनेकदा अशा कार्यक्रमात जायची संधी मिळायची. तिथे हा कलाकार माणूस किती गुणी आहे हे जाणवायचे.
मधुपजी जितके चांगले कवी होते तितकेच चांगले मित्र देखील होते. ते माझ्यापेक्षा सुमारे १५ ते २० वर्षांनी मोठे तसेच सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिले होते. तरीही त्यांनी मैत्री जपली. अधून मधून ते भेटायचे तेव्हा आपुलकीने सर्वांची चौकशी करायचे.
गेल्या काही वर्षात भेटी कमी झाल्या होत्या. मात्र कधीतरी फोनवर बोलणं व्हायचं आणि एकदा निवांत बसूया असे एकमेकांना आश्वासन दिले जायचे.
मात्र आता तो योग कधीच येणार नाही…
मधुपजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..
— लेखन : अविनाश पाठक. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800