पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. लातूर येथील जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी जागविलेल्या त्यांच्या या भावपूर्ण आठवणी…..
माईंचे व्यक्तिशः माझ्यावर फार प्रेम होते. त्यामुळेच माझ्या कन्येच्या विवाहासाठी त्या भर उन्हाळ्यात 45 डिग्रीच्या अंगजाळ तापमानात 550 किमी चा प्रवास जीपमध्ये करुन घामाने थबथबत नागपूरहून लातूरला आल्या होत्या. वधु-वरांना आशिर्वाद देताना त्या म्हणाल्या,
‘ज्या जयप्रकाशच्या एका लेखामुळे (पाचोळ्यात वाजणारी पावलं) या सिंधुताई सपकाळला महाराष्ट्रात ओळख मिळाली, त्याच्या मुलीच्या लग्नात आले नसते, तर आयुष्यभर रुखरुख राहिली असती…’
मराठवाड्यात त्यांचं पहिलंच जाहीर व्याख्यान आमच्या ‘माध्यम’ संस्थेनं शाहू काॅलेजच्या कॅम्पसमध्ये काही वर्षांपूर्वी आयोजित केलं होतं. त्याच दिवशी सन्माननीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मांजरा साखर कारखान्याच्या कर्तृत्ववान कामगिरीबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचं 5 हजारांचं रोख पारितोषिक मिळालं होतं. ते सायंकाळी माध्यमच्या कार्यक्रमाला चक्क श्रोत्यांत येऊन बसले.
माध्यमतर्फे माईंची प्रकट मुलाखत प्रख्यात पत्रकार अरुण खोरे घेत होते. माईंच्या दाहक अनुभवांतून उमटलेल्या शब्दांमुळं आख्खं सभागृह गद्गगद् झालेलं. सगळ्यांचे डोळे पाणावलेले. दिलीपरावजींनी बॅगेतून सकाळीच बक्षिसादाखल मिळालेलं पाच हजारांचं पाकिट काढलं. माईंना त्यांच्या अनाथालयासाठी द्या, असं ते मला म्हणाले. पण माईंनी ते घेण्यास नकार दिला. साहेबांनी स्वतः स्टेजवर येऊन पाकिट द्यावं, असं त्या म्हणाल्या. दिलीपराव उठले नि स्टेजवर गेले. माईंनी अक्षरशः आपला फाटका पदर पसरला आणि त्यात पैसे टाका असं त्या म्हणाल्या… सभागृहाला गहिवरुन आलं !
त्याच कार्यक्रमात माईंना त्यांच्या ममता बाल सदन साठी फूल ना फुलाची पाकळी देण्यासाठी अक्षरशः रांग लागलेली…महात्मा बसवेश्वर काॅलेजच्या एक प्राध्यापक पर्स घरीच विसरुन आल्या होत्या. माईंना देण्यासाठी आपल्याकडं काहीच नाही, म्हणून त्या कासावीस झाल्या होत्या. पण एका निर्धाराने त्या रांगेतच उभ्या होत्या. माईंच्या जवळ येताच त्यांनी चक्क बोटातून अंगठी काढली नि माई नी पसरलेल्या पदरात टाकली. माईंनी मायेनं त्यांच्या चेहर्यावरून हळुवार हात फिरवत आशिर्वाद दिला.
लातूरला त्यानंतर सिद्धेश्वर यात्रेत झालेल्या महिला मेळाव्यासाठी आल्यानंतर माझ्या घरीही अल्पोपहारासाठी आल्या होत्या. निघताना माझी पत्नी, स्मिताच्या चेहर्यावरुन हात फिरवीत त्यांनी आशिर्वाद दिला, तोही माझ्यासाठी. म्हणाल्या, सांभाळ बाई या वादळाला…
त्याआधी लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमासाठीही त्या आलेल्या असताना मला उद्देशून उपस्थित हजारो महिलांना त्या म्हणाल्या होत्या… या पत्रकाराच्या पाठीशी तुमचा आशिर्वाद असू द्या…
एवढं भरभरुन प्रेम त्यांनी मला दिलं.
दोन वर्षांपूर्वी तर माझ्या वाढदिवसानिमित्त माध्यम तर्फे आयोजित कार्यक्रमाला त्या दयानंद सभागृहात उपस्थित होत्या. दोनेक हजार स्त्री- पुरुषांनी माईंना ऐकण्यासाठी खचाखच गर्दी केलेली. दयानंद च्या इतिहासात पूर्वी कधीही एवढी गर्दी उसळली नसेल. चक्क व्यासपीठावरही महिला दाटीवाटीने बसल्या होत्या. कानांत प्राण आणून त्या माईंचे मायेनं ओथंबलेले शब्द ऐकत होत्या. मधूनच नकळत डोळे पुसत होत्या. माईंच्या बोलण्यात एवढी ताकद होती !
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे सत्शील चेअरमन वसंतराव नागदे यांची खूप इच्छा होती, की सिंधुताईंनी उस्मानाबादला एखादे अनाथालय सुरु करावे. माईंना उस्मानाबादला घेऊन येण्याची, जबाबदारी नागदेसाहेबांनी माझ्यावर सोपविली होती. मी, माईंना घेऊन तिथं गेलो. पण दुर्दैवानं तो विचार अंमलात येऊ शकला नाही.
डाॅ. हंसराज बाहेतींनी तर एकदा माईंना आपल्या घरी जेवणासाठी येण्याचं साकडं घातलं होतं. माईंना खरं तर वेळ नव्हता. पण डाॅक्टरसाहेबांचा आर्जवी आग्रहही त्यांना मोडवेना. बरं बाबा…चल , असं त्या म्हणाल्या नि गाडीत बसल्या. ‘लगेच निघणार हां बाबा दहा मिनिटांत’ असं म्हणालेल्या माई चक्क तासभर तिथं रमल्या. माईंकडं वेळच नसल्यानं (स्व.) मल्लिकार्जुन जवळेअप्पा तर वायुवेगानं स्कूटरवर आपल्या घरी गेले व लगेच हातात 11 हजारांचं पाकीट घेऊन घाईत परतलेही. चालत्या गाडीतच अप्पांनी माईंच्या हातात पाकीट सोपवलं नि गाडीच्या बाॅनेटवरच डोके टेकवून दर्शन घेत माईंच्या सूर्यकामाला नमस्कार केला.
महाराष्ट्राने सिंधुताई सपकाळ नावाच्या या वात्सल्यमूर्तीला असं ओंजळीत जपलं….
अशा कितीतरी घटना…. वैविध्यपूर्ण नि माईंच्या काळजाची हाक ऐकणार्या…
लातूरकरांच्या ह्रदयाच्या कप्प्यात साठलेल्या….

– लेखन : जयप्रकाश दगडे
ज्येष्ठ पत्रकार, लातूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ऋणानुबंध हा एकमेकांप्रती असलेल्या भावनेतून, पाहण्याच्या दृष्टिकोणातून निर्माण होत जातो. हा लेख नसून मुलाने आईची महती सांगणार एक स्वानुभवाचं चित्र वाचकांच्या मनावर कोरलं आहे. माईंना विनम्र अभिवादन व श्री दगडे साहेबांच्या लेखन विचारांस सलाम…..
सुंदर आठवणी. सशक्त शब्दांकन.
अतिशय सुंदर लेख..भावपूर्ण .आठवणी जागवणारा.
अंत:करणातून ऊतरलेला…