जेष्ठ लेखिका, मार्गदर्शिका माधवी कुंटे यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने जागवलेल्या ह्या त्यांच्या काही आठवणी. माधवीताईना विनम्र अभिवादन.
– संपादक
“मनाचा पदर अश्रूंनी भिजतो
लिहिताना हात किंचित थरथरतो
ती ‘कथा’ सांजेला कानी पडते अन
सस्मित एक चेहरा तरळून जातो “……
या ओळी जितक्या सहज उमटल्या तितक्या ‘त्यांच्या’ म्हणजे ‘माधवीताई कुंटे’ न माझ्या गप्पा आणि चर्चा सहज रंगायच्या. वयाचे आणि मनामनांचे अंतर पार करणारे ते लोभस व्यक्तिमत्त्व. बोलण्यात आणि वागण्यात कुठेही ‘मी पण नाही. तरीही योग्य ठिकाणी योग्य त्या सूचना त्या देणार हे ठरलेले होते. माझ्या ‘पैंजण’ आणि ‘दिवा लावताना’ या कथासंग्रहाच्या प्रस्तावना लिहिताना त्यांनी उत्स्फूर्त आणि योग्य ठिकाणी मार्गदर्शन केले. खरं तर, कथा तयार होत्या. बऱ्याच कथा प्रकाशित पण झाल्या होत्या. पण ताई कडून कथालेखन संदर्भात काही मुद्दे ऐकायला आवडले. त्या बद्दल विचार करून मी पुढे ते अमलात सुद्धा आणले. कधी कळत तर कधी नकळत.
या साहित्यिक वाटेवर माधवी ताईंच्या सहवासात चालताना, सुरुवातीला माझ्यात असलेला किंचित बुजरेपणा कसा आणि कधी बाजूला पडला मला कळलेच नाही. मग आमच्या दोघींच्या, कथा संदर्भात कधी मुद्देसूद तर कधी अघळ पघळ गप्पा चालू झाल्या. त्यातून त्यांचे वरवर मृदू वाटणारे पण आतून स्थिर, भक्कम, दूरदृष्टी असणारे आणि वास्तवाची स्पष्ट कल्पना असणारे व्यक्तिमत्त्व उलगडू लागले. कथा, कादंबरी लेखन त्यांना आतून स्फूरत होते. त्यात त्यांचा अनुभव जबरदस्त होता. त्यांच्या कथा भावनिक, सामाजिक, तसेच इतिहास, पुराण आणि काहीशा spiritual अद्भुत , गूढ वातावरणात फिरवून आणणाऱ्या असतात. ‘लोकसंवाद’ या दिवाळी अंकात त्यांनी लिहिलेल्या कथा माझ्यावर जबरदस्त मोहिनी घालतात. त्या कथेतील पात्रं , कथानक आणि मांडणी मला अतिशय रम्य वाटते. त्यासाठी त्यांनी किती रिसर्च केला असेल या माझ्या प्रश्नावर त्या फक्त गोड हसल्या आणि म्हणाल्या ‘अगं, वर्षानुवर्ष लायब्ररीत काम करण्याची सवय आणि आवड. शेकडो पुस्तकं पालथी घातली.’ त्यांना ते सहज वाटले तरी त्या मागची मेहनत आणि चिकाटी आपण फक्त कल्पनेने जाणू शकतो. ‘खलाशी’ ही त्यांची पहिली कादंबरी मला काही वाचायला मिळाली नाही याची खंत राहिली. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांची आवडती पुस्तकं त्यांनी मला भेट दिली. एका ज्येष्ठ, अभ्यासू, विद्वान साहित्यिकेने दिलेला प्रसाद समजून मी ती पुस्तकं घरी घेऊन आले. ती पुस्तकं सिंगापूरला माझ्या स्टडी टेबलासमोर मी आदराने आणि श्रद्धेने ठेवली आहेत. इच्छा असून त्या इथे स्वतः येऊ शकल्या नाहीत. तो योगच नव्हता. पण त्यांची पुस्तकं मात्र सिंगापूरला पोहोचली. काही पुस्तकं मुंबईच्या घरात आहेत.
माझ्या हातून आजपर्यंत जे काही लेखन झाले त्याला अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा आशीर्वाद लाभला आहे. त्यातील माधवी ताई कुंटे हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे हे मी पुन्हा पुन्हा आदराने म्हणेन. त्या हाडाच्या शिक्षिका होत्या. काही आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होते आणि त्यानुसार त्यांचे वर्तन होते. त्यांचे टापटीप राहणे लक्षात राहायचे. साडी, ब्लाऊज आणि एकंदर केशभूषा आणि वेशभूषा याचे भान ठेवून त्या निवड करायच्या. चांगल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला त्यांना आवडायचा. . अमेरिकेसारख्या देशात फिरायची त्यांना आवड होती आणि तशा त्या फिरून आल्या होत्या. फोटोग्राफी आणि त्यावर कविता करायला त्यांना आवडायचे. प्रसंगाचे तारतम्य ओळखून त्यांचे भाष्य असायचे. तरीही मधूनच एखादी विनोदाची झालर त्या जोडायचा.
एकदा आम्ही लता गुठे च्या मुलाच्या लग्ना वरून परत येताना खूपच ट्रॅफिक मध्ये अडकलो. “चला आता टाळ कुटत बसुया. तेव्हढीच संधी मिळालीय. त्याचा फायदा घेऊया.” असं काहीतरी सहज बोलत त्यांनी हसवलं.

त्यांच्या पतीचे लवकर निधन झाल्यानंतर एकटीने मार्ग चालताना, त्या शिकत राहिल्या, अनेक पुस्तकं लिहीत राहिल्या, मुलांना कसली ददात पडू दिली नाही. आज त्यांचे कुटुंब त्यांच्या जवळ आहे. मुलं, सुना, नातवंडं असा सगळा जोडलेला परिवार आहे.
आता पार्ल्याच्या त्या त्यांच्या घरावरून जाताना मागचं सगळं सगळं आठवणार. गेली काही वर्ष आजाराने त्यांना गाठलं होतं. किती त्रास होत असेल. औषधं, गोळ्या, हॉस्पिटलच्या खेपा. माझ्या पुस्तक प्रकाशनाला त्या कांदिवलीपर्यंत येऊ शकल्या नाहीत, वाईट वाटलं पण मनाला समजावं लागलं . वाढती वर्षं काही ना काही घेऊन येतात. खूप काही गौरवास्पद कार्य आणि… कधी आजारपण सुद्धा. नंतर पण त्यांची हिम्मत, आजारपणाला न कंटाळता त्याही वेळात सतत काहीतरी लिहिण्याची त्यांची आस्था आणि सातत्य खूप काही शिकवून गेलं. हो आता सगळं भूतकाळात लिहायला कठीण जात आहे. त्यांचा मधूनच येणारा फोन, पुस्तक प्रकाशनासाठी येणारे खास आग्रहाचे प्रेमळ आमंत्रण. त्यांच्यासाठी आम्ही दोघे खास सिंगापूरहून मुंबईला गेलो होतो, भेट झाली आणि भरून पावलो.
जानेवाला जाता है ।
अपनी यादें पीछे छोडकर ।
रहनेवाले दोस्त यादों से दोस्ती करते हैं जिंदगीभर ।
आठवणींचा हा झंजावात असाच येत जात राहणार कारण साहित्याच्या या बहरलेल्या वृक्षाच्या सहवासात मिळालेली शांत सावली होतीच तशी. शांत वाटणारी पण आतून साहित्याच्या नवीन कथेला जन्म देताना वावटळ उठवणारी. त्या कथांचे वेगळे आकाश होते. काहीतरी नव्याचा शोध घ्यायला उद्दीपित करणारे. आता नवीन कथा पुस्तकाच्या प्रस्तावनेत हे आकाश व्यापून राहणार कायमचं !

— लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
