आजचा जमाना टीव्ही, मोबाईल, काँप्युटर, लॅपटॉप आणि काय काय अशा नाविन्यपुर्ण युगाचा, अशा युगात रेडिओला कोण बरं विचारणार ? परंतु एक काळ असा होता रेडिओ हे एकमेव करमणुकीचे, मनोरंजनाचे साधन होते, परंतु अडीच तीनशे रुपयांना मिळणारा रेडिओ घेणे ही बस की बात नव्हती.
मला आठवतंय मी बहुदा नववीत असताना वडिलांनी टेलिरॅड कंपनीचा रेडिओ घरी आणला होता अन याला हात लावायचा नाही अशी तंबी भरली होती. आज माझी नातवंडे महागडा मोबाईल वापरतात, किती फरक आहे न काल महिमेचा हा ! त्याकाळात आमच्या गावात तीन चार गाड्या होत्या तसेच पाच सहा रेडिओ होते. वडिल लावतील तो कार्यक्रम ऐकायचा हा पायंडा होता. सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावरून नंदकुमार कारखानीस आपल्याला बातम्या देत आहेत, भारदस्त दमदार विश्वासक आवाजात बातम्या सुरु व्हायच्या. कधी माधुरी लिमये बातम्या द्यायच्या. हिंदीमधे बहुदा देवकीनंदन पांडे समाचार सुनवायचे. अगदी सकाळी सकाळी एक विशिष्ठ धून वाजायची अन मग रेडिओवरील कार्यक्रमांना सुरवात व्हायची ( योगायोगे कालच ती धून व्हायोलिन या वाद्यावर ऐकली अगदी जशीच्या तशी ) प्रभात समयी, प्रभात वंदन हा कार्यक्रम असायचा …….. घनःशाम सुंदरा श्रीधरा ही भूपाळी आठवतेय मला. नाट्यसंगीत वा चित्रपट संगीत ऐकायला मला लहानपणापासून आवडायचे.
आमच्याकडे शिर्के कुटुंब होतं, अण्णांनी रेडिओ आणला व टेबलाच्या ड्रॉवरमधे ठेवून लावला अन अख्खी पेठ घरी जमा झाली, आवाज नक्की कुठून येतोय, कुणाचा आहे ? या घरात काहीतरी भुताटकी झाली आहे म्हणून बातमी गावभर पसरली, गंमतच !
त्या काळात “कामगार सभा” हा कार्यक्रम अकरा वाजता सुरु व्हायचा, ग्रामपंचायत कार्यालयात रेडिओ व कर्णा असायचा त्यावरून गावकर्यांना हा कार्यक्रम ऐकवला जायचा. माळ्याच्या मळ्यामधे कोण गं उभी हे गाणं ऐकायला मिळायचं, अजूनही कानांत गुणगुणतय ना! मधे मधे जाहिराती असायच्या त्यातली फिनोलेक्स कंपनीची जाहिरात पुसटशी आठवतेय बरंका.
आम्ही ज्यावेळी खेड – रत्नागिरी येथे वास्तव्याला होतो तेव्हा शेजारी पाजारी रेडिओ ऐकायला आमच्या घरी यायचे. जसे महाभारत पहायला लोकं जायची अगदी तस्सेच. रात्रीची जेवणं आटोपली की नाटिका हा रंगतदार कार्यक्रम असायचा, करमणूकच असायची ती. असाच एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे “आपली आवड” आठवतो, गंम्मत जंम्मत हा बाळ गोपाळांकरीता छान कार्यक्रम असायचा.
मला आठवतय ते कॉलेज जीवन, तेंव्हा हॉस्टेवर रहायला असायचो, भाईयों और बहेनो चलो देखते है इस हप्ते पायदान नंबर तीन पे कौनसा गाना है, मऊमुलायम मखमली आवाजाचे अमीन सयानी बिनाका गीतमाला हा सुंदर श्रवणीय हवाहवासा लाडका कार्यक्रम सादर करायचे. पुण्याला विद्या उत्तेजक ट्रस्टच्या हॉस्टेलमधे होतो,आम्ही मित्र मित्र जवळच्याच हॉटेल बाहेर तासभर चक्क उभे राहून या बिनाका गीतमालेचा रसस्वाद घ्यायचो अन पुढच्या बुधवारची आतुरतेने वाट पहायचो. झुमरीतलय्या हे गांव अनेकवेळा या कार्यक्रमात हमखास असायचेच अन प्रश्न पडायचा या पृथ्वीतलावर, झुमका गिरा रे असं हे झुमरीतलय्या गांव कुठे असेल बरं ?
बेला के फूल, हवामहल, टेकाडे भाऊ, आपली आवड असे कितीतरी कार्यक्रम ऐकल्याचे आठवते. तो वेगळाच काळ होता रेडिओशी नाळ जुळलेला, ऐकण्याचा चाळा लागलेला. माहित आहे का? एखाद्याच्या घरी रेडिओ असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं कारण घरी रेडिओ आणायचा असेल तर सरकारची परवानगी लागायची, लायसन्स काढायला लागायचे आणि सहा किंवा सात रुपये वर्षाची फी पोष्टात भरायाला लागायची. आज हे आठवलं की हसूच येतं.
आता रेडिओ राहिलाय कुठे ? केवळ उरल्या आठवणी, तरी काही जेष्ठ नागरिकांनी त्यांचे रेडिओ जतन करून ठेवले आहेत, माझ्याकडेही मर्फी कंपनीचा ट्रांझिंस्टर जपून ठेवला आहे त्या काळची एक सुखद आठवण म्हणून.

— लेखन : सुनील चिटणीस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800