सख्यांनो,
गेल्या सोमवार पासून आपण अगदी श्रावणमय झालो आहोत. माहोल च इतका छान आहे ना. nostalgic क्षण आहेत हे सगळे. आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत आहोत. असाच एक हिंदोळा म्हणजे श्रावण सोमवार. खूप काही आठवणी मागे ठेवून गेलेला.
आई बाबांबरोबर आम्हीही हट्टाने उपास करायचो. त्याच्या मागचे खरे कारण लहानपणी उपासाच्या फराळाचे प्रचंड आकर्षण. खरे म्हणजे या दिवशी फार खात नाहीत. पण आम्ही करणार म्हटल्यावर आईला करायलाच लागायचे. पहाटे लवकर उठून सर्व आवरून आईबरोबर देवळात जायचे. संपूर्ण चातुर्मास आईचा देवळात जायचा नेम असायचा. पूजा करायची. दुधाचा अभिषेक व्हायचा. बेलपत्र फुल वाहणे सगळ अगदी मनोभावे. छान छान प्रसाद मिळायचा.
फळ, सुकामेवा, दूध, उपासाला चालणारे पदार्थ.. तिथेच पहिल्यांदा ओम जय जगदीश हरे ही आरती ऐकली. ती केंव्हाच पाठही झाली. देऊळ हिंदी भाषिक लोकांचं होत. पण छानच होत. मग शाळा डब्यातही उपवासाचा चिवडा, केळी, राजगिऱ्याचा लाडू, मज्जाच मजा. शाळाही एक दीड तास लवकर सुटायची. उपवास लवकर सोडायचा असायचा ना. घरी आलो की परत पूजा आरती शंकराचे स्तोत्र एखादे भजन असे सगळे अगदी साग्रसंगीत व्हायचे. मग उपास सोडायचा.
त्या दिवशी वदनी कवळ व शांताकारम शिवाय जेवायला मिळायच नाही. इतर दिवशी कधीतरी तरी सुट मिळायची. काहीतरी गोड असायचेच. नैवेद्याचे सर्व लवकर आटोपल्याने नंतर खूप वेळ खेळायला मिळायचा. खेळ म्हणजे काय तर झिम्मा, फुगड्या सर्व मंगळागौरीचे खेळ हो त्या दिवशी.
अभ्यासाला सुट्टी मिळायची म्हणजे काय तर आपणच सुट्टी घ्यायची. ☺️ ही सर्व दुसऱ्या दिवशीच्या मंगळागौरीची तयारी असायची. कुठे ना कुठे तरी बोलावणे असायचेच. नात्यात नाहीतर शेजारी पाजारी.
एकंदरीत काय दिवस खूपच हटके जायचा. आमच्या कडे श्रावण सोमवार, शनिवार उपास सोडताना ब्राह्मण बोलवायची पद्धत होती. आजूबाजूला नुकतीच मुंज झालेले बटू मिळायचे. त्यांनाही दक्षिणा मिळणार म्हणून खुश असायचे. परत ब्राह्मण म्हणून कौतुकही व्हायचे. आई तर त्यांना नमस्कार ही करायला लावायची.
ती मजा काही औरच होती. सगळेच लहान. कल्पना ही तशाच. आनंद ही छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा होता. निरागस, निष्पापच सगळे. निर्भेळ आनंद. आता आठवलं की हसायलाच येत. पण आताच्या दिखाऊ आणि कृत्रिम जगापेक्षा ते दिवस फार छान होते. माणसाला माणसाची किंमत होती. जाण होती. चांगले विचार होते. चांगलें वागणे होते. आता ते कुठेतरी हरवल्या सारखे वाटते. म्हणूनच मन जुन्या आठवणींचा सतत मागोवा घेत असते. रेंगाळते रहाते. पण ते रेंगाळन ही
खूप काही देऊन जात. नवी ऊर्जा नवा उत्साह. मनात येत…
आता तर फक्त
भूतकाळात रमायच
गालातल्या गालात
उगीचच हसायचं
जमलच तर
फुगड्या घालायची
नाहीतर झिम्म्याची
गाणी म्हणून हौस भागवायची
— लेखन : मीरा जोशी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मीराताई,श्रावणी सोमवारचा लेख वाचल्यावर खरंच बालपणीच्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या.खरंच ती मजा काही निराळीच होती.
मीराताई जोशी यांच्या श्रावणी सोमवारच्या आठवणी आणि शेवटच दिलेली कविता
वाचून (आता तर फक्त भूतकाळातच रमायचं) प्रत्येक वाचकाला आपल्या लहानपणीचा रम्य भूतकाळ आठवतो.