भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात १९८६ ते १९९१ या काळात मी कार्यरत असतानाच्या काही आठवणी माझ्या कायम स्मरणात राहिल्या आहेत.त्यातील एक आठवण म्हणजे,मला आमच्या ज्येष्ठ,श्रेष्ठ, लोकप्रिय निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांनी दिलेला सल्ला आणि त्या कॅन्सर ने गंभीर आजारी असताना सुध्दा त्यांनी दाखविलेला धीरोदात्तपणा. आता प्रमाणे त्याकाळी कॅन्सर वर फार उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे कॅन्सर झाला म्हणजे मरण निश्चित अशीच सर्व साधारण धारणा असे. त्यामुळे साहजिकच रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय सर्व आशा सोडून बसत. त्यामुळेच त्यावेळी त्यांनी दाखविलेला धीरोदात्तपणा माझ्या कायमच्या स्मरणात राहिला आहे.
खरं म्हणजे मला त्यांच्या हाताखाली थेट काम करण्याची कधी संधी मिळाली नाही. पण काही प्रासंगिक कामांमुळे त्यांच्याशी संपर्क येत असे. त्या प्रत्येक वेळी त्या एक गोष्ट मला आवर्जून सांगत. त्या अतिशय प्रेमाने म्हणत, “अहो देवेंद्र, तुम्ही एक तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीताने आपल्या जीवनात मधुरपणा येतो”.
त्यांचे म्हणणे असायचे की, संगीताने माणसाचे जीवन सुंदर होते म्हणून आपण संगीताच्या क्षेत्रातील एक तरी कला आत्मसात केली पाहिजे. पण दुर्दैवाने त्या काळीच काय, त्या नंतर ही कोणतीही कला मला आजतागायत आत्मसात करता आली नाही आणि आपण सुहासिनी मॅडम नी दिलेला सल्ला पाळू शकलो नाही, याची खंत वाटत आली आहे.
दूरदर्शन च्या सेवेत असतानाच त्यांना कॅन्सर ने गाठले.त्यांचे एक मोठे ऑपरेशन झाले. ब्रीच कँडी येथील त्यांच्या घरी
आम्ही काही सहकारी त्यांना भेटायला गेलो होतो. अतिशय सुंदर, शालीन सौंदर्य लाभलेल्या, सतत प्रसन्न राहणाऱ्या सुहासिनी मॅडम यांना त्यांच्या आजारी अवस्थेत बघून फार फार वाईट वाटले. नियती किती क्रूर असू शकते, हे त्यांच्या कडे बघून लक्षात येत होते. तशाही परिस्थितीत त्या काही वेळ आमच्याशी बोलत होत्या. निघताना एका सहकाऱ्याने त्यांच्या सोबत ग्रुप फोटो काढण्याची त्यांना विनंती केली. पण त्या निग्रहाने म्हणाल्या, लोकांच्या मनात माझी जी प्रतिमा आहे, ती तशीच राहिली पाहिजे. त्यामुळे मी आता काही फोटो काढू इच्छित नाही. त्यावेळचा त्यांचा धीरोदात्तपणा, निग्रह माझ्या मनात कायमचा घर करून राहिला आहे. असो..
अल्प परिचय : या निमित्ताने आजच्या पिढीला सुहासिनीबाईंची ओळख व्हावी म्हणून त्यांचा अल्प परिचय पुढे देत आहे. सुहासिनी मुळगावकर म्हणजे मराठी संगीत, रंगभूमी आणि दूरदर्शनला लाभलेलं वरदान होतं. त्यांचा जन्म २७ जून १९३५ रोजी झाला. शालेय, महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर साहित्य, संस्कृती, कला अशा अभिजात बाबींचे संस्कार झाले. यात त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता.
त्या कॉलेजला असताना त्यांचे वडील रोज गीतेतील श्लोक बेस्ट बसच्या तिकिटाच्या मागे लिहून द्यायचे. बस येई पर्यंत त्या तो पाठ करत. यातून कॉलेज संपेपर्यत त्यांची भगवतगीता पाठ झाली होती.
सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण प्रख्यात गायिका किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. दाजी भाटवडेकर यांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली होती. “सौभद्र” व “मानापमान” या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा त्यांनी सुरू केली. या प्रयोगात त्यांचा सर्व भर संवाद आणि अभिनयावरच असे. याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.
मुंबई ‘दूरदर्शन’ वरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या रविवारी सकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निर्मात्या म्हणून त्यांनी आपली एक वेगळीच छाप पाडली होती. साहित्य-संगीत-नाटय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या एक तासाच्या मुलाखती हा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात बरेच कलाकार, लेखक, मान्यवर लोक सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची उंची वाढवत असत. असे बरेच मोठे लोक या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना पाहण्यास मिळाले.
एखाद्या कार्यक्रमात गायक कलाकार असला तर त्या कलाकाराला सुहासिनीबाई गाणं सादर करण्याचा आग्रह करत. त्यांची त्या कलाकाराला आग्रह करायची पद्धत काही और असे. जरा लाडात आणि कलाकाराचे नाव घेऊन त्या आग्रह करीत असत. उदाहरण द्यायचं झालं तर, “गाणार ना गंधर्वजी ?” असे म्हणत त्यांनी कुमार गंधर्व ना गाण्याचा आग्रह केला होता.
एकदा त्यांच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार पाहुणे म्हणून आले होते. नेहमी प्रमाणे मुलाखतीनंतर सुहासिनी बाई नी आपल्या नेहमीच्या पद्धतीने, गाण्याची फ़र्माईश करत त्या प्रभुदेव सरदार ना म्हणाल्या, ‘गाणार ना सरदारजी ?’.
‘रत्नपारखी योजना’ नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर तेव्हा चालवत असत. या मध्ये सध्याच्या ‘सारेगमा’ची स्पर्धा असते, तसा कार्यक्रम त्या सादर करत असत. सुहासिनी मुळगावकर यांनी शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबे यांच्या वरील कार्यक्रम सादर केले.
सुहासिनी मुळगावकर यांनी शतरंग, सदाफुली, सफारी, मनमोकळं ही पुस्तके लिहिली आहेत.
अशा या अमीट ठसा उमटवून गेलेल्या सुहासिनी मुळगावकर यांचे निधन १३ जून १९८९ रोजी झाले.
त्यांना विनम्र अभिवादन.
(काही संदर्भ व छायाचित्रं: गुगल)
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800