Saturday, December 20, 2025
Homeलेखआठवणी : पेठे विद्यालयाच्या

आठवणी : पेठे विद्यालयाच्या

नाशिक येथील पेठे विद्यालयाने नुकतीच १०० वर्षे पूर्ण केली आहेत.

श्री प्रमोद प्रभाकर रानडे यांनी त्यांचे पिताश्री
कै. प्रभाकर दामोदर रानडे, वकील (१९०७ – १९७४) यांनी १९७२ साली शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या आठवणीं येथे दिल्या आहेत.

त्यावेळची भाषा, परिस्थिती, वर्णनशैली यामुळे या आठवणी खूपच वाचनीय आहेत….
– संपादक.

मला प्रथम आठवतात ते मराठी पहिली यत्तेत मी शिकत असतानाचे सीताराम शालीग्राम कुलकर्णी मास्तर. त्यावेळी मराठी शाळा ही हल्ली पेठे विद्यालय आहे त्या जागेमध्ये होती. मोठ्या दरवाजाचे आत एक जुनी इमारत असुन त्या इमारतीचे दार पूर्वेकडे असे. त्या दारातुन आत गेल्यावर एक मोठा चौक होता. त्या चौकाच्या अवती भोवती वर्ग असत. गेल्याबरोबर डाव्या हाताला रावदे हे हेडमास्तर यांचे ऑफीस असे.

दुसरी यत्तेत असताना कोण मास्तर होते ते आठवत नाही. परंतु त्यावेळी असलेले भट, खेडलेकर, कसरेकर, मालपाठक हे मास्तर आठवतात.
मला चौथीला मालपाठक मास्तर होते. त्यावेळी चौथी यत्तेतील मुलांनी देता येणेसारखी स्कॉलरशीपची परीक्षा असे. तिला मिडलस्कूल स्कॉलरशीपची परिक्षा असे संबोधत. मी ती परीक्षा पास होऊन माझा जिल्ह्यात पहिला नंबर आला. त्यावेळी तीन रुपये महिना स्कॉलरशीप होती. दुसऱ्या नंबरची स्कॉलरशीप येवले येथील जी एच सबनीस या विद्यार्थ्यास मिळाली होती.

आमचे शाळेत पिराचे ठाणे होते. एका कोनाड्यात हिरवे फडके असे. भिंतींना रंग पांढरा होता. एक वरून दार बंद असलेला जीना होता. त्या जीन्यात वरचे तबकडीत एक दोर टांगलेला होता. शाळेत भूताचे वास्तव्य आहे असा ते वेळी सर्व विदयार्थ्यांचा समज होता. त्या पडिक जीन्यात कोणी जात नसे. मी त्यावेळी त्यातल्या त्यात धीट विद्यार्थि होतो. मी जाऊन तो दोर ओढला तर दारे फटाफट लागली. मग सगळे घाबरले व मला तो दोर नीट ठेवुन देण्यास सर्वांनी सांगितले. मी घाबरत घाबरतच जाऊन दोर नीट केला तर खाडकन दारे उघडली. ही आठवण आहे. यात अतिशयोक्ती नाही. हे कोडे शेवटपर्यंत उलगडले नाही.

तेव्हां आमचे वर्गात डास वकील, फकिरा शिवराम लभडे, नारायण रामजी मराठे, पंडित, लगड, त्रिंबक जेऊघाले, विठ्ठल श्रीराम काळे, चिं ब खाडिलकर, केतकर, सहस्रबुद्धे, हर्डीकर, शिवनारायण बद्रिनारायण मारवाडी, जुगराज ऊर्फ जुग्या मारवाडी, अनंत आत्माराम पुजारी, भिकू पानवलकर, हरी बाळकृष्ण कुलकर्णी ही मुले होती. तसेच वरचे वर्गांत वसंत बापूजी मणेरीकर, डॉ देवळालकर, रघु पटवर्धन, अंतू केळकर वगैरे विद्यार्थि होते.

आम्ही १९१८ साली भंडारदरा ट्रीपला गेलो होतो. तेव्हां घोटीपर्यंत अथवा अस्वली पर्यंत रेल्वेने जाऊन पुढे बैलगाडीने गेलो. तेव्हां वाटेवर शेंडी म्हणुन गाव लागले. तेथून सहयाद्रिचे सर्वात उंच शिखर कळसुबाईला जावयाचा रस्ता आहे. तेथे गाड्यांनी कांहीं वेळ मुक्काम केला व पुढे पहाटे गाड्या पुढे निघुन आम्ही भंडारदरा येथे पोहोचलो. ते वेळी आमची उतरण्याची सोय सरकारी बंगल्यात केली होती. बंधाऱ्याचे काम २०८ फूट उंच झाले होते व ७२ फूट व्हावयाचे होते. लढाईमुळे काम बंद पडले होते. आमचे बरोबर आचारी व गडी होता. गांगल व दामले मास्तर हे होते. बंधारा पाहुन आम्ही लाँचमध्ये बसुन रतनगड पहावयास गेलो. एवढा पाण्याचा साठा आम्ही तो पावेतो केव्हांही पाहीला नव्हता. बंधाऱ्याचे खाली एक छोटे पॉवरहाऊस होते. त्यातुन वीज निर्माण होत असे.

रतनगडावर आम्ही गेलो तो दिवस शिवरात्रीचा होता. छाती छाती इतके उंच गवत व झुडपे बाजूस सारून आम्ही चढत होतो. आमचे बरोबर विनायक केतकर व एक शिपाई होता. ते दोघे वाट चुकले व पुढे जातात तो कडा होता. त्यामुळे ते गोंधळले व केतकर हा रडावयास लागला. मग ते आम्हास येऊन मिळाले.
दुसरे दिवशी सकाळी भंडारदर्‍याहुन खाली तीन चार मैलावर रंधा फॉल्स पाहण्यास गेलो. तेथे प्रवरा नदीचे पाणी प्रथम ८०/९० फूट मग ६०/७० फूट असे खाली पडते. त्या पडत्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्माण करता येईल असे तेव्हां ऐकले. त्यानंतर नाशिकचे ओक रावसाहेब यांनी एक स्कीमही तयार केली. परंतू सर्व कागदावर व कल्पनेतच राहीले.
या बंधाऱ्याला तो पुरा झाला ते वेळी मुंबईचे गव्हर्नर असलेले विल्सन साहेब यांचे नाव मिळाले.

सन १९२० साली नाताळात आम्ही तळेगाव, पुणे, सातारा, औदुंबर व किर्लोस्कर वाडी अशी १० दिवसांची ट्रीप केली. आमचे बरोबर काणे मास्तर व कुलकर्णी मास्तर हे होते.
या सहलीत इतर अनेक ठिकाणांबरोबर किर्लोस्कर वाडीत आम्ही कारखाना पाहीला. नांगराचे फाळ व इतर भाग त्यावेळी तेथे बनवत असत. तेथे शंकरराव व लक्ष्मणराव किर्लोस्कर हेही आम्ही पाहीले. तेथे किर्लोस्कर प्रेसही होता. तेथील कामगारांना राहणेसाठी वसाहतही बांधली होती.

त्यावेळी शाळेला ५०० रुपये दरसाल Excursion ची ग्रँट मिळत असे. त्यामधुन खर्च होई व दहा दहा रुपये प्रत्येकी विद्यार्थ्यास भरावे लागत. रेल्वेचे कन्सेशनही असे. अशा प्रकारे माझे आयुष्यात शाळेमधील सर्वांत मोठी अशी ही सहल झाली.

त्या सहलीच्या जिवंत व सुखद स्मृति कित्येक वर्षे माझे चित्तात घोळत होत्या. त्या काळात पैशाला फार मोल होते व चैनीकडे फार कमी प्रवृती असे.
क्रमशः

स्व प्रभाकर रानडे

– लेखन : स्व प्रभाकर रानडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…