बांगला देशच्या मुक्ती युद्धात अतुलनीय शौर्य गाजविलेले कै मेजर विनायक गुप्ते यांच्या पत्नी सुलभा गुप्ते यांनी या युद्धाच्या ५० व्या वर्षानिमित्त जागविलेल्या रोमहर्षक आठवणी…
गुप्ते मॅडम निवृत्त शिक्षिका असून त्यांनी कथा, कविता, संवाद, नाटुकली, लेख इ .व “ऐका माझी कहाणी, मी सैनिकाची अर्धांगिनी” हे पुस्तक लिहिले आहे.
त्यांच्या अनेक कथांना प्रथम पुरस्कार मिळाले आहेत.
सध्या त्यांचे वास्तव्य मुलाकडे, ऑस्ट्रेलियात, सिडनी येथे असून कायमस्वरूपी वास्तव्य पुणे येथे आहे…..
नमस्कार,
16 डिसेंबर हा भारतीय सैन्याच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेला एक दैदिप्यमान युद्ध दिवस.
हा दिवस अविस्मरणीय आहे कारण या दिवशी सध्याच्या बांगलादेशच्या भूमीवर झालेल्या भारत -पाक युद्धात भारताला अभूतपूर्व यश मिळाले.
जगाच्या इतिहासात सुद्धा अशा प्रकारची ही एकमेव घटना आहे, कारण या दिवशी 93,000 सैनिक भारताला हातातील शस्त्र सोडून शरण आले. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने ह्या युद्धाबद्दल काही आठवण सादर करत आहे.
मी सुलभा गुप्ते. माझे पती कैलासवासी मेजर विनायक गुप्ते ह्यांचा या मुक्ती युद्धातील सहभाग सांगत आहे..

भारत ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून १९४७ साली मुक्त झाला. पण स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी मोठ्या धूर्तपणे अखंड भारताची फाळणी केली. भारत – पाकिस्तान अशी दोन शकले केली. इतके करून ते थांबले नाहीत तर पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान असे दोन भाग केले. म्हणजे हजारो मैलांच्या सरहद्दीवर भारताच्या डोक्यावर दोन बाजूला शत्रुराष्ट्र निर्माण करून कायमची डोकेदुखी तयार करून ठेवली.
पश्चिम पाकिस्तानात प्रामुख्याने पंजाबी मुस्लिम राहत तर पूर्व पाकिस्तानात मुख्यतः बंगाली मुस्लिम राहत. धर्म जरी एक असला तरी पंजाबी व बंगाली असे जातीय वैमनस्य त्यांच्यात कायमच होते.
त्यामुळे एक ना एक दिवस पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानावर चढाई करून त्यांना कायमचे नामशेष करणार व आपले वर्चस्व प्रस्थापित करणार हे भारत ओळखून होता. असे होणे भारताला खूप डोईजड होणार होते.
ज्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण झाली. ह्या युद्धात पाकिस्तानचा दणदणीत पराभव झाला. 93,000
सैनिक शस्त्र खाली ठेवून शरण आले व भारताच्या मदतीने स्वतंत्र “बांगला” देशाचा जन्म झाला. म्हणून
ह्या युद्धाला “मुक्ती युद्ध” असे म्हणतात.
कशी केली होती आपण ह्या युद्धाची तयारी ? तेच मी आता माझ्या अल्प माहितीनुसार सांगणार आहे…
राजकीय दृष्ट्या आपण स्वतः युद्धात उडी घेऊ शकत नव्हतो. स्वतः बांगला देशीयांनी लढायला हवे होते.
हे युद्ध बांगला देशाच्या वतीने लढायचे म्हणजे त्यांचे सैनिक हवे. त्यांना युद्धाचे ट्रेनिंग देऊन तयार करणे जरूरीचे होते. ह्या कामावर मेजर गुप्ते ह्यांची नेमणूक करण्यात आली होती.

कसे दिले ट्रेनिंग पाहू याः
तेथील बहुतांश लोक शेतकरी किंवा सामान्य नागारिक होते. बरेचसे अशिक्षित होते. त्यांना फक्त बंगाली भाषा येत होती. युद्ध जरी ४ डिसेंबरला घोषित झाले तरी मेजर गुप्ते हया लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या बटालियन सह मार्च १९७१ मध्ये बांगला देशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) दाखल झाले. अर्थात वेषांतर करून, तेथील नागरिकांमध्ये बेमालूम मिसळता यावे म्हणून त्यांनी सर्वांनी…
१) बंगाली लोकांप्रमाणे लुंगी नेसायला सुरूवात केली.
२) बंगाली भाषेतच बोलण्याचा नियम केला. (खूप भराभर भाषा आत्मसात करावी लागली.)
३) तोंडात सतत पान ठेवणे व मधून मधून थुंकणे अशा सवयी अंगी बाणवल्या.
४) जेवणात भात व मासे खावयास सुरुवात केली.
ही झाली प्राथमिक सुरुवात.
आता कुठे तिथल्या लोकांना “हे आपलेच लोक आहेत” ह्या वर विश्वास बसला. एकदा विश्वास जिंकल्यावर अर्धी लढाई जिंकली व ट्रेनिंगची सुरवात झाली. सैन्याला चार वर्षात जे ट्रेनिंग देतात ते ६ महिन्यात दिले गेले.
आणि तो दिवस उजाडला. अपेक्षित होतेच त्याप्रमाणे प. पाकिस्तानने, पू. पाकिस्तान वर लढाईचा जोरदार हल्ला केला. आपण तयारीत होतोच. दोन्ही पक्षी संपूर्ण ताकदीनिशी म्हणजे इंन्फन्ट्री, आर्टिलरी, रणगाडे व विमाने अशी घमासान लढाई सुरु झाली.
“आखिर पाकिस्तानने हमपर हमला बोल ही दिया!” तत्कालीन प्रधानमंत्री मा. (दिवंगत ) इंदिरा गांधींनी घोषणा केली. [त्यांचे ते शब्द आजही माझ्या कानात स्पष्ट पणे गुंजतात.] १६ डिसेंबर १९७१ पर्यंत रणतुंबळ युद्ध झाले. भारताने शत्रूला जेरीस आणले.
अखेर 93,000 सैनिक व शस्त्रांचा विपुल साठा पाकिस्तानने भारताच्या चरणांवर अर्पण केला.
शरणागती करारावर स्वाक्षऱ्या झाल्या व युद्ध संपुष्टात आले.
तो हा ऐतिहासिक महत्त्वाचा सुवर्ण दिन.
आज ही १६ डिसें. “विजय दिवस” म्हणून उत्साहात साजरा केला जातो .
जयहिंद ! जय भारत की सेना !

– लेखिका : सुलभा गुप्ते .
(कै. मेजर विनायक गुप्ते ह्यांची पत्नी)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अतिशय रोमहर्षक वर्णन..सुलभाताई युद्धाच्या कथा रम्य असतात,मात्र तुमच्यासारख्या आयुष्य पणाला लावणार्या व्यक्तींच्या जीवनात किती ऊलथापालथ होत असेल हे समजून ऊर अभिमानाने भरुन येते…