जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यातुन उपसंचालक या पदावरून निवृत्त झालेले आदरणीय जेठालाल शाह, यांच्या ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणादायी आठवणी……
भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात क्रांतीदिनाच्या निमित्ताने भारताच्या महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांचा २ वर्षांपूर्वी सन्मान करण्यात आला. यात मुंबईतील एकमेव स्वातंत्र्य सैनिक श्री. जेठालाल अमृतलाल शाह यांचा प्रामुख्याने समावेश होता.
श्री जेठालाल शाह हे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या स्वातंत्र्य सैनिक गौरव समिती या सरकारच्याच समितीचे अध्यक्ष असून ते 1989 साली महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क संचालनालयातून उपसंचालक या पदावरुन सेवानिवृत्त झालेे.
श्री जेठालाल शाह यांच्याशी संवाद साधताना अनेक प्रेरणादायी अनुभव ऐकायला मिळाले. “स्वराज्य हा माझा जन्म सिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच !” असे ब्रिटीशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अहमदनगर येथील इमारत कंपनीच्या गल्लीसमोर असलेल्या मैदानावर राष्ट्र सेवा दलाची शाखा भरत असे आणि विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांचे हे ऐतिहासिक उद्गार याच मैदानावर झालेल्या सभेतले असल्याची महत्त्वपूर्ण आठवण जेठालाल शाह यांनी सांगितली.
जेठालालजींनी शिक्षण सोसायटी हायस्कुल, अहमदनगर येथेच घेतले. या शाळेचे नाव आता भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल असल्याचेही जेठालाल भाईंनी सांगितले.
ते पुढे सांगू लागले, घराच्या समोर इमारत कंपनीची गल्ली आणि त्या जवळच्या मैदानात राष्ट्र सेवा दलाची शाखा भरत असल्याने मी तिथे ओढला गेलो. रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन हे माझे प्रेरणास्थान. 1942 चा लढा जोरात होता आणि भारताला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्याची ऊर्मी होती, त्यामुळे मी राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात काम करु लागलो. लोकमान्यांची सिंहगर्जना ज्या मातीत झाली त्या मातीचाच गुण आणि तीच प्रेरणा होती. शाखा नायक शिबिर, दस्ता नायक शिबीरातून धडे घेत घेत पुढे झेपावत होतो. स्वातंत्र्य मिळण्याच्या टप्प्यात होते. रावसाहेब पटवर्धन नगर सोडून पुण्याकडे निघाले होते. आम्ही नियमित बैठकांमध्ये त्यांचे मार्गदर्शन घेतच होतो. रावसाहेबांना पुढच्या रणनीतिबद्दल विचारलं तेव्हा ते आम्हाला म्हणाले, `अरे मुलांनो, शाळेच्या परिक्षेत सर्व विषयात कोण आणि किती जण उत्तीर्ण झालात ! रावसाहेबांच्या या प्रश्नावर फक्त मी आणि कांतीलाल मेहेर असे दोघेच विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण झाल्याचे उत्तर आम्ही दिले.
रावसाहेब म्हणाले, मुलांनो स्वराज्य मिळणारच आहे, आता त्याचे सुराज्यात परिवर्तन करण्यासाठी तुम्हास नेतृत्व करायचे आहे. त्यांनी त्यांच्याकडची 15 पुस्तके दिली. आणखी लागतील तर मी देतो असं रावसाहेब म्हणाले. नगर सोडतांना रावसाहेबांनी त्यांच्या घरातले ग्रंथालय अहमदनगर महाविद्यालयाला देऊन टाकले.
नगरहून उच्च शिक्षणासाठी मी मुंबईत आलो. ते साल होतं 1951 !, 1953 ला मी पदवीपर्यंतच शिक्षण पुर्ण केलं, जेठालाल शाह सांगत होते. शिक्षण तर पुर्ण झालं पण नोकरीसाठी खस्ता खाव्या लागल्या. एका वृत्तपत्रात जाहिरात आली होती. दैनिकात संपादकीय विभागात नोकरीसाठी त्या जाहिरातप्रमाणे अर्ज केला. मुलाखत झाली `चित्रा’ नावाचं दैनिक होतं. पी. डिमेलो रोड, बोरीबंदर येथे कार्यालय. मालक होते चिमणलाल शेठ, संपादक होते वसंत प्रधान. मी, वसंतराव देशपांडे (आज त्यांना मुंबईत वृत्तपत्रसृष्टीत दादा देशपांडे म्हणून ओळखतात), प्रफुल्ल कुमार मोकाशी, अण्णा फणसे असे चित्रामध्ये काम करीत होतो. 80 रुपये पगार होता. दोन वर्ष रात्रपाळी केली आणि एक दिवस वसंतराव देशपांडे म्हणाले, `अरे जेठालाल भाई, महाराष्ट्र सरकारच्या माहिती खात्याची जाहिरात आलीय. आपण दोघेच पदवीधर आहोत. यात अर्ज करु यात !
मी मुलाखत दिली. 1956 साली माहिती खात्यात रिजनल लँग्वेज असिस्टंट म्हणून 120 रुपये पगारावर नोकरीला लागलो, अशी माहिती देऊन जेठालाल भाई शाह यांनी 1989 पर्यंत माहिती खात्यात काम केले. द. रा. सामंत, ईश्वरराज माथूर, देवव्रत मेहता या तीन महासंचालकांनी माझ्या गुप्त अहवालात (सीआर) आऊट ऑफ दी वे जाऊन प्रमोशन देण्याची गरज असल्याचा शेरा लिहिला असल्याचे कळले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
1956 साली माहिती खात्यात नोकरी लागण्यापूर्वी गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतल्याचे जेठालाल शाह यांनी नमुद केले. 1989 मध्ये माहिती खात्यातून उपसंचालक पदावरुन निवृत्त झालो. स्वातंत्र्य सैनिकाची प्रत्येक जिल्ह्यात एक गौरव समिती असते. जिल्हाधिकारी सर्व जिल्ह्यांची माहिती शासनाकडे पाठवतात. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर केंद्राकडे माहिती जाते. त्याप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हाधिकाऱयांनी केंद्राकडे माहिती पाठविली. मी मुंबई उपनगर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचा अध्यक्ष असल्याने जिल्हाधिकाऱयांनी माझेही नांव पाठवले आणि नवे राष्ट्रपती महामहिम रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातून आता सहा स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. माझे जीवन सार्थकी लागले, असे सांगून जेठालाल शाह यांनी अद्यापि स्वातंत्र्याचे सुराज्य झाले आहे असे वाटत नाही, अशी खंत बोलून दाखविली.
जेठालाल भाईंच्या सुविद्य पत्नी सौ. निर्मला जेठालाल शाह या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. काही काळापूर्वी त्यांचे देहावसान झाले. त्या घर संसार नीट नेटकेपणाने चालवित होत्या, असे कृतज्ञतेचे उद्गारही जेठालाल शाह यांनी काढले.
विजय शाह हा मुलगा उच्चविद्याविभुषित असुन मोठी मुलगी गीता ढोलकीया त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत. धाकटी मुलगी डॉ. वर्षा शाह या रिझवी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रिन्सीपॉल आहेत. नातवंडे ही आजोबांचे कौतुक करतांना थांबत नाहीत.
नव्या पिढीने भारतीय संस्कृती आणि आचार विचार रुजविणे आवश्यक असल्याचे जेठालाल अमृतलाल शाह यांनी आवर्जुन सांगितले. त्यांना शतकमहोत्सव साजरा करण्यासाठी ठणठणीत आरोग्य लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा !

– लेखन : योगेश वसंत त्रिवेदी, जेष्ठ पत्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खरं आहे. त्यांची अंगगभूत विनयशीलता तर खूपच महत्वाची आहे.
अतिशय स्फुर्तीदायक कारकिर्द…
माहिती व जनसंपर्क कार्यालयासाठी अभिमानास्पद की असे अधिकारी महासंचालनाललयात सेवेत होते.
त्यांचा आम्हाला अभिमान आहे.