Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याआणि त्यांची दिवाळी "गोड" झाली !

आणि त्यांची दिवाळी “गोड” झाली !

घरातील लहानग्यांना सगळ्यात जास्त आवडणारा सण म्हणजे दिवाळी. हमखास नवीन कपडे मिळणार या आशेने बच्चे कंपनी आनंदात असतात.

परंतु आजही अशी काही घरे आहेत जेथील लहान मुलांना दिवाळीच्या दिवशी सुद्धा जुने, फाटके कपडेच घालावे लागतात. अशाच वस्तीचा शोध घेत यावर्षी आम्ही त्या लहानग्यांची आणि मोठ्यांचीसुद्धा दिवाळी त्यांना कपडे देऊन ‘नवीन व आनंदी’ करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक जवळील विंचूरगवळी गावात प्रवेश करण्यापूर्वीच आमच्या मदतीला धावून आलेत श्री.रमेश रिकामे. मी कारची काच खाली करून रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या रमेशभाऊ यांना माझी ओळख सांगून विचारले की, दिवाळीनिमित्त
गरीब मुलांना नवीन कपडे भेट द्यायचे आहेत तर तुम्ही त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता सांगता का ? रमेशभाऊ म्हणाले, दोन मिनिटे गाडी बंद करा, मी गाय बांधून येतोच.

थोड्या वेळात रमेशभाऊ आले. त्यांची मोटरसायकल घेऊन ते पुढे निघाले आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे. सुरुवातीला गावाला लागून असलेल्या वस्तीत आम्ही गेलो. घरांच्या बाह्यरूपांवरून घरातील गरिबी जाणवत होती. रमेशभाऊंनी सगळ्यांना आवाज देऊन बोलावले, काही गल्लींमध्ये ते स्वतः जाऊन मुला मुलींना घेऊन आले.

लहान मुलींना रंगीबेरंगी वेगवेगळ्या डिझाईन्सचे फ्रॉक दाखवल्यावर त्या अक्षरशः तुटून पडल्या. काहींनी तर लागलीच घालून बघितले आणि ऐन दिवाळीत नवीन कपडे मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मुलांना जीन्स, शर्ट, स्वेटर तर मोठ्यांना शर्ट, पॅन्ट दिल्यानंतर त्यांना झालेला आनंद हेच खरे सर्व सेवेकऱ्यांचे समाधान होय.

पहिल्या वस्तीवर लहानमोठ्यांना टाटा बाय बाय करून रमेशभाऊंनी आम्हाला गावाबाहेर असलेल्या दुसऱ्या वस्तीवर नेले. दुपार झाल्यामुळे बरीचशी मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेलेली होती. एका ठिकाणी घरी असलेल्या महिला आपल्या मुलांसोबत बाहेर बसलेल्या दिसल्या. तेथेच आम्ही गाडी थांबवली. त्यांना सांगितले की आम्ही लहान मुलांना दिवाळीनिमित्त कपडे देण्यासाठी आलो आहोत.

आमच्या सोबत रमेशभाऊ असल्याने त्यांना ओळख पटली, नाहीतर आजकाल लहान मुलांचे नाव सांगून गावात कोणी परके आले म्हटल्यावर गावातील मंडळी सरळ हल्ला करतात. परंतु तसे घडले नाही, बच्चेमंडळी धावत जवळ आली. मापाचा ड्रेस अंगावर लावून बघू लागली. आवडला की हसू लागली. सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या आयांना झालेला दिसत होता. आता येऊ घातलेल्या थंडीसाठी आणलेले लहान मुलांचे स्वेटर्स त्यांना दिल्यावर सगळे खूप खुश झाले. प्रत्येकाचा आनंदी चेहरा आमच्यासाठी जणू टॉनिक होते.

आम्हाला सगळ्यात जास्त मदत झाली ती भारतीताई रायबागकर यांची. सध्या चेन्नईत वास्तव्यास असलेल्या मूळ नाशिकच्या रहिवासी भारतीताई रायबागकर ह्या स्वतः उत्तम साहित्यिक असून संगीताबरोबरच इतर अनेक कलांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी स्वतः लहान मुलींसाठी जवळपास २०० नवे कोरे फ्रॉक्स, ड्रेस घरीच शिलाई मशीनवर शिवून आम्हास त्या चिमुकल्यांची दिवाळी आनंदी करण्यासाठी दिलेत. त्यासोबतच त्यांच्या आई ज्यांचं वय नव्वदीजवळ आहे, त्यांनी स्वतः लोकरीचे विणकाम करून लहान मुलांसाठी स्वेटर्स बनविले ते देखील आम्हाला दिले. त्यांच्या भगिनी उज्वला जैन ताई आणि बंधू रविंद्र महाजन यांनीही मोठ्यांसाठी योगदान दिले.

या सर्व कपड्यांमध्ये अजून भर पाडली ती सरोदे मॅडम, जोगळेकर मॅडम, संदीप बडगुजर आणि मी स्वतः, डॉ.चिदानंद फाळके यांनी. हे असे सेवाकार्य नियमित आमच्या हातून घडत राहो हीच त्या निसर्गाकडे मागणी.

डॉ. चिदानंद फाळके

– लेखन : डॉ.चिदानंद फाळके. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 1)आणि त्या ची दिवाली गोड झा ली
    2) भुकेचा सोहला
    दोनों लेख भा गए.

    डा सुधीर तारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४