अहिल्यानगर शहरातील परदेशी गल्लीत रविवार 28 डिसेंबर 2025 हा दिवस अविस्मरणीय ठरला. परदेशी गल्ली म्हणजे जुने चर्च ते नवा कापड बाजार बोळ …. आर आर भिंगारवाला ची मागची बाजू, जैन मंदिर परदेशी गल्लीत आहे. वय विसरणे म्हणजे काय याचा अनुभव आम्ही सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये घेतला.
निमित्त होतं परदेशी गल्लीमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांचा स्नेह मेळावा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य, प्रेम, आदरभाव, मैत्री, आनंद हे सर्व काही दिसत होते. एकमेकांना मिठ्या मारून भेटण्याचा कार्यक्रम सतत चालू होता. उत्साह अमाप होता. पन्नास वर्षांपूर्वीचे मित्र आज कसे दिसत आहेत हे बघण्याचा एक वेगळा अनुभव आम्ही अनुभवत होतो. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणात होता.

परदेशी गल्ली सोडून आता ५० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. पूर्वी ही गल्ली एक कुटुंब होते. या गल्लीतील प्रत्येक वाडा जिवंत होता. या वाड्यात प्रेम होते, जिव्हाळा होता. सगळ्याचे प्रश्न सारखेच होते. आयुष्यात सर्वांना उभे रहायचे होते. गल्लीतील प्रत्येक जण कष्ट करीत होता. मागील ५० वर्षातील या कष्टातून परदेशी गल्लीतील प्रत्येक कुटुंब उभे राहिले आहे. त्यांना एकत्र भेटण्याचा नगरमधील हा पहिलाच असा आगळा कार्यक्रम ठरला.
५० वर्षांपूर्वी परदेशी गल्लीत सोहोनी वाडा, बाबू शेठ वाडा, मुनोत वाडा खिस्ती वाडा, तांबोळी वाडा (लुणिया भवन) जामगावकर वाडा, नहारवाडा धाडीवाल वाडा, रेख़ी वाडा, देवी वाडा असे अनेक लहान मोठे वाडे प्रसिद्ध होते. यामध्ये राहणारे लोक सुद्धा खूप कष्टाळू होते. त्यामुळे परदेशी गल्ली ही एका कुटुंबासारखी राहत होती.
कामधंद्याच्या निमित्ताने ही मंडळी विविध ठिकाणी स्थलांतरीत झाली परंतु परदेशी गल्लीचे प्रेम कोणीही विसरले नाही. आपले बालपण विसरले नाही. परदेशी गल्लीतील एकेक आठवणी सारख्या मनामध्ये येत होत्या.
सध्या परदेशी गल्लीत राहणाऱ्या लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपवर सर्वांनी परत एकदा गल्लीमध्येच भेटावे असे नियोजन तयार करण्यात आले. 28 डिसेंबर 2025 ला हा योग जुळून आला. परदेशी गल्लीचे दैवत म्हणजे मारुतीचे मंदिर याच मंदिर शेजारी शहा यांचे घर आहे या घराच्या पार्किंग मधे भेटण्याचे ठरले.
पन्नास वर्षांपूर्वीची परदेशी गल्ली आता वयस्कर झाली आहे परंतु 28 डिसेंबरच्या स्नेहसंमेलनामुळे सर्व गल्ली परत एकदा तरुण झाली.

तीन पिढ्यांची लोक या स्नेहसंमेलनात एकत्र भेटली याचा खूप आनंद झाला. सर्वजण एकमेकांची प्रेमाने चौकशी करत होते. मारुतीची आरती, हनुमान चालीसा, नगर ढोल ताशा वरचा डान्स या मुळे मारुती मंदीरासमोर उत्साह भरला होता.
स्वरा संचेती, अंजू भाभी संचेती यांच्या स्वागत गीतामुळे हा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. मी स्वतः (विश्वास सोहोनी) सर्वांना बोलतं करीत होतो. मागील पाच वर्षात गल्लीतील ज्या मंडळींचे निधन झाले होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात गणेश संचेती, हरीश तलरेजा (कुकूसेठ), लालूसेठ तलरेजा, अशोक शिंगवी, पांडुरंग जाधव, रामचंद्र जाधव अशोक मुथा, विजय सोहोनी होते. या सर्व मंडळींनी आपले जीवन अतिशय कष्टाने उभे केले होते याचा सर्वांना अभिमान आहे.
या स्नेह संमेलनात परदेशी गल्लीतील सर्व उपस्थित मंडळींचा भगवा शेला देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमामध्ये हे भगवी शेले खूप उठून दिसत होते.
धरमचंद शिंगवी, जयकुमार शिंगवी, अशोक भंडारी, सुभाष मुथा, विनोद मुथा, श्री व सौ विलास देवी, डॉ. पुरुषोत्तम गांधी, प्रकाश सोहोनी, श्रीमती चंपा भाभी संचेती या मान्यवरांनी ७५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सर्वांनी अतिशय कष्टाने आपले जीवन घडवले आहे त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
हा कार्यक्रम अतिशय रंगतदार होत चालला होता. मी परदेशी गल्लीतील पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच प्रत्येकाने आपली परत नव्याने ओळख करून दिली.
या कार्यक्रमात शरद मुथा याचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी वंदना सोहोनी यांनी वाढदिवसाचे गाणे अतिशय सुंदर गायले. तर मी,
“एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों !
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो!”
या सदाबहार गीताने या कार्यक्रमाची सांगता केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली. मी माझ्या परीने कार्यक्रमात रंगत भरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नंतर परदेशी गल्लीतील जैन मंदिरांच्या भोजनालयात दालबाटी जेवणाचा बेत होता. सर्वांनी एकत्र जेवण घेतले. छान वाटले.
काय दिले या परदेशी गल्लीतील स्नेहसंमेलनाने !
- आनंद
- नम्रता
- आत्मविश्वास
- बंधूभाव
- समाजसेवेची गोडी
- जिवाभावाचे मित्र
- कष्ट करण्यासाठी उर्मी
- स्वप्न बघायला शिकवणे
- जीवन जगण्याचा मार्ग
- घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर.
- त्यागाची भावना.
- आत्मिक सुख.
- निरपेक्ष भावना
- सकारात्मक दृष्टिकोन
परदेशी गल्लीतील ऐतिहासिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संजय संचेती, दिपक तलरेजा, जयकुमार शिंगवी, अमृत मुनोत, प्रवीण भंडारी, तेजमद बोरा, शरद मुथा यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विशेष म्हणजे गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते दिपक तलरेजा यांनी स्नेहसंमेलनासाठी बॅनर पासून तर जेवणापर्यंत अतिशय चोख व्यवस्था केली होती. तसेच परदेशी गल्लीवरील प्रेमामुळे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
गल्लीतील शहा कुटुंबाने आपली जागा दिल्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली.
धन्यवाद शहा कुटुंब !
गल्लीतील सर्व मंडळींनी या कार्यक्रमास आर्थिक व वस्तुरूपात अतिशय चांगल्या पद्धतीने हातभार लावला हे या कार्यक्रमाचे विशेष आहे.
या कार्यक्रमाची MK न्युजने अतिशय छान बातमी तयार केली. व्हिडिओ शूटिंग केले त्याबद्दल या न्यूज चैनल चे मनापासून आभार ! एक एक मात्र अगदी खरे आहे की 50 वर्षा नंतरही जमलेली मंडळी आपले वय विसरले होती. जी लोकं आज 75 वर्षाची आहेत त्यांचे आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने वाढले आहे. ही मंडळी जरा तरूण झाली असे मला ठामपणे वाटते.
शेवटी परदेशी गल्ली सोडताना ज्या ज्या ठिकाणी खेळलो ती ठिकाणे डोळ्यात साठवून घेतली. आता परदेशी गल्लीत एकदोन कुटुंबाशिवाय फारसे कोणी राहत नाही. संपूर्ण गल्ली आता कमर्शियल झाली आहे. वाड्याच्या ठिकाणी आता मोठी दुकाने झाली आहेत. हा काळाचा महिमा आहे. परंतु पन्नास वर्षांपूर्वीची परदेशी गल्ली आजही डोळ्यासमोर आहे.
जय हिंद !
— लेखन : विश्वास सोहोनी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800
