नमस्कार वाचक हो 🙏🏻
आम्ही मैत्रिणी
नशिबाने सजलेले
एक नितांत रम्य गाव
शब्दातीत अनुभूती
मैत्री हे तयाचे नाव..
वाचक हो..
आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल.. हो ! हो !
आजचा आपला विषय मैत्रीच आहे. आमच्या मैत्रीचा.. मैत्र बंधाचा.
आजच्या तंत्रज्ञान युगात काही जण भ्रमणध्वनीचे तोटे सांगत असतात.. तर काहीजण फायदे. थोडक्यात.. जो जसा वापर करतो त्याला तसा अनुभव येतो. जशी दृष्टी तशी सृष्टी.
आमच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या भ्रमणध्वनीचा आम्हाला फार मोठा फायदा झाला आहे. आम्ही मैत्रिणी दहावी झाल्यानंतर बरीच वर्षे भेटलो नव्हतो. दूरध्वनी होते पण भेटच होत नव्हती त्यामुळे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होण्याची शक्यता शून्यच.
साधारण ७ – ८ वर्षांपूर्वी अचानक आमच्या दहावीच्या वर्गाचे स्नेहसंमेलन ठरले. ते आमच्यासाठी एक सुंदर वळण होते. बालपणीच्या रम्य काळाचा तो अनमोल खजिना नव्याने गवसला होता.
आमचे काही वर्ग मित्र एकमेकांच्या संपर्कात होते त्यामुळे काही मैत्रिणींचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळविण्यासाठी त्यांची छान मदत झाली. आमच्या दहावीच्या वर्गाचा एक समूह तयार झाला. तरीही काही मुली संपर्कात नव्हत्या. त्यांचीही लवकरच भेट होईल ही आशा होती.
लवकरच २०१७ मध्ये डिसेंबरच्या २८ तारखेला आमच्या एका वर्गमित्राच्या स्मृती दिनानिमित्त म्हासुर्णे येथे श्रीराम विद्यालयाच्या आवारात पहिले स्नेह संमेलन उत्तमरित्या पार पडले.
आमच्यावेळचे सर्व आदरणीय गुरुवर्य, इतर सहकारी वर्ग, मित्र मैत्रिणी या सर्वांना पुन्हा भेटल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील आनंद शब्दातीत होता. प्रफुल्लित करणारा होता.सोनचाफ्याची दरवळ वातावरण प्रसन्न करून ठेवते.. चैतन्याची पखरण करत असते. तोच सुवर्णचंपक सुकला तरी अलवार गंध पेरत राहतो.. मनात भरून उरतो. अशीच काहीशी प्रचिती त्यावेळी आम्ही घेत होतो.
अगदी भारावून गेलो होतो.
पहिली पासूनच्या आम्ही मैत्रिणी जवळजवळ २० वर्षानी भेटलो पण तो वीस वर्षाचा काळ मध्ये आलाच नव्हता असे वाटत होते. ओढ, बंध, जिव्हाळा तसाच होता.
वाढले होते ते फक्त वय नि वयासोबत प्रेम.
त्यानंतर पुन्हा आम्ही मैत्रिणी भेटलो नंतर मात्र कोरोनाच्या काळात खंड पडला.
अचानक काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका मैत्रिणीने इच्छा व्यक्त केली की बरेच दिवस आपण भेटलो नाही तर आता भेटायचे ठरवूया.. स्नेह मेळावा करूया.
हा विचार इतर मैत्रिणींमोर मांडला न मांडला तोच समुहात प्रसन्नतेचे वारे वाहू लागले.
भेटीच्या ओढीने मैत्रिणी आतुर झाल्या, हरखून गेल्या.
कुठे भेटायचे, कधी भेटायचे हे ठरवले गेले. कुणाची नोकरी, कुणाचा व्यवसाय तर कुणाची शेतीची काही कामे यातून सांगड घालत सगळ्याजणी तयार झाल्या.
आणि शेवटी १९ तारखेला गुरुवारी कराड जवळील आपला गाव या कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्या भेटलो. दोन दिवस आम्ही तिथे थांबलो होतो. तिथे पोहचल्यापासून ते परत निघे पर्यंत फक्त गप्पा टप्पा, दंगा मस्तीच चालू होती.
गोरठवणारा गारठाही आम्हाला अडवू शकला नव्हता. दुपारचे कार्यक्रम पार पडल्यावर संध्याकाळी संगीत खुर्ची खेळून सांजवेळ साजरी केली तर रात्री जेवण झाल्यावर बाहेर शेकोटी पेटवून गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो.
त्यानंतरही अर्धरात्र उलटली तरी गप्पा संपल्या नव्हत्या.
कितीतरी आठवांची चित्रफीत आम्ही पाहत होतो. तसे आमचे नेहमीच एकमेकींशी बोलणे होत असते पण तिथे भेटल्यावरही गप्पांना ऊत आला होता, मैफिल रंगली होती.
जुन्या आठवणींना उजाळा देत म्हासुर्णे गावातील आमच्या शाळेतून फिरून येत होतो.
याच विश्वाचा एक सुंदर अनुभव तिथून निघाल्यावर लगेचच आला.
आमची दुसरी एक मैत्रीण कराडमध्ये एका शाळेच्या संस्थेत नोकरीला आहे. तिने आम्हाला तिथे नेले. तिथल्या एका वर्गातील बाकावर बसलो तेव्हा आमच्या शाळेतच असल्यासारखे वाटत होते.
तिथल्या मान्यवर शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आमची ओळख करून दिली. तिच्या एका विद्यार्थीनीने आमच्या मैत्रीसाठी सुंदर गाणे गाऊन दाखवले तो क्षण तर काळजात घर करून राहिला.
शाळेतून सर्वांचा निरोप घेऊन आम्ही वंदनीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी प्रीतिसंगमावरती गेलो. तिथे काही काळ व्यतीत करून मग आपापल्या घरी जायला निघालो तेही पुढील वर्षी नक्की भेटायचे हे ठरवूनच.
प्रत्येकीचा स्वभाव वेगळा, विचार वेगळे, वागणे वेगळे, बोलणे वेगळे, परिस्थिती वेगळी, अनुभव वेगळे, जीवनाविषयीचे तत्व वेगळे, मूल्ये वेगळी .. तरीही अशा भिन्न भिन्न गोष्टींमधून एक सुरेख, मोहक, वेधक झालेला आत्मीयतेचा बंध म्हणजे मैत्रबंध. महत्वाचे म्हणजे मैत्री नशिबातही लिहिलेली असावी लागते हे मात्र अगदी खरे आहे.
भले एकमेकांच्या काही गोष्टी पटत नसतात तरीही जे एकमेकांसाठी असतात तिथे मैत्रबंध असतो. जो प्रेमापोटी, काळजीपोटी तोंडावर सांगत असतो हे तुझे चुकले / चुकते तेव्हा तो मैत्रबंध असतो. जेव्हा डोळे झाकून विश्वास ठेवता येतो तेव्हा तो मैत्रबंध. मनाचा निर्मळपणा, एकमेकांविषयी सौहार्दपूर्ण व्यवहार, आदर, माया, आस्था, स्नेह, काळजी, प्रामाणिकपणा .. अशा कितीतरी गोष्टी मैत्रीस परिपूर्ण बनवतात. एखाद्याच्या उणीवेला जाणीवपूर्वक टाळून त्याला आपलेसे करणे म्हणजे मैत्री. मैत्रीत कसलेच भेदभाव नसतात.. गरज असते ती मनापासून समरस होण्याची.
फक्त मैत्री आहे म्हणले की मैत्री होत नसते.. तर मैत्री जगावी लागते. ‘मी’ ला बाजूला सारून ‘आम्ही’ चा साकव बांधावा लागतो तेव्हा ती मैत्री परिपूर्ण होते.
ज्या प्रकारे तिखट, गोड, कडू, आंबट, खारट अशा विविध चवी रस वाढवतात. आस्वाद घ्यायला शिकवतात. तशाच आहेत या सगळ्या माझ्या मैत्रिणी.
जीवनाच्या पानावरचे एक सुंदर हवेहवेसे चित्र . थोड्या वेडसर थोड्या खोडकर, थोडया सुरेल थोडया नखरेल, जितक्या हळव्या तितक्याच खंबीर, खूप समंजस कधीतरी फटकळ, चेष्टा मस्करीत रमणाऱ्या पण खेचून गंमत करणाऱ्या, कधी मुग्ध खळखळणारा झरा तर कधी संयत मनाचा वारा, मनस्वी मानिनी प्रसंगी कडाडत्या चपला… अशाच आगळ्या वेगळ्या रंगीत संगीत मधु मोहक स्वभावांनी मैत्रीच्या एका दृढ रेशमी धाग्यांनी बांधलेल्या आहोत आम्ही मैत्रीणी !
— लेखन : सौ. मनीषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ए मनिषा..सहीच..आत्मियतेचा बंध म्हणजे मैत्रबंध..कस्सल्ल नि कित्ती भारी लिहिलंयस गं… आनंदाने डोळे भरून आले… सुरुवात तर अप्रतिम… 👌👌❤️❤️आणि तू दिलेल्या उपमा तर खूप, आवडल्या… ❤️❤️
खरतर तुझ्या प्रयत्नांमुळेच हा आनंदमेळा.. दोन्ही स्नेहमेळाव्याचं अगदी सुंदर शब्दांत अपूर्व वर्णन केलस…तुझ्या शब्दांत तर हे सारे क्षण पुन्हा पुन्हा वाचावस वाटतयं.. आपल्या सर्व वर्ग मैत्रिणींचा उत्साह, साथ आणि तुझी अनमोल पराकाष्ठा यामुळे हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय झाले… 💖💖
अन् त्यात तुझ्या लेखणीतून हा सुंदर क्षण तुझ्या सुवासिक शब्दसुमनांनी गुंफलास.. आणि आम्ही मैत्रिणी गंधाळून गेलो…
असच गोड गोड सुंदर लिहित रहा सखे…नि आम्ही मैत्रिणी न चुकता वाचत राहू गं…
तुझे खूप खूप कौतुक गं सखे .. ❣️💖🤝🤝❣️💖
शुभांगी राऊत
कल्याण