नियतीचा घाला
नमस्कार, मंडळी .
मागच्या पहिल्या भागात माझी पार्श्वभूमी मी सांगितली. आता ट्रेनिंगला जाण्यापूर्वीच्या तयारी बाबत थोडे पाहू.
गावचे पोलिस पाटील यांच्याकडे माझ्या चारित्र्य पडताळणीबाबत शासनाकडून विचारणा झाली. ही बातमी गल्लीत पसरली. वडिलांना विचारणा होवु लागली, फौजदार होण्यासाठी म्हणे लाखांनी पैसे द्यावे लागतात ! वडिलांनी सांगितले हा चुकीचा समज आहे. माझ्या मुलीला तर काही पैसे द्यावे लागले नाहीत. मी व वडिलांनी ट्रेनिंगला जाण्यासाठी पत्रात लिहिलेले साहित्य म्हणजे बेडशीट, शाल, मच्छरदानी, पांढरे शूज, पांढरा सलवार कुरता इत्यादी व अन्य आवश्यक वस्तु खरेदी केल्या.
वडिलांनी आनंदाने गल्लीत, मित्रमंडळीना पेढे वाटले. सर्व तयारीनिशी स्वारी ५ जून १९८७ रोजी दुपारी सर्वांचा निरोप, विषेशतः वडिलांचा निरोप घेऊन निघाली.
कोल्हापूरहून एस.टी (सटाणा) पकडावयाची होती. का आठवत नाही पण फक्त आई सोबत मी कोल्हापूरला आले. प्लॅटफॉर्मला गाडी लागली. आम्ही कोल्हापुरात जिल्ह्यातील ५ मुलींसह गाडीत बसलो. माझ्या व आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी आई व मी स्वतः सुध्दा अत्यंत हळव्या स्वभावाच्या असल्याने घरच्यांच्या विशेषतः वडिलांचा विरहाने मन व्याकूळ झाले होते. गाडी हलली. पाणावल्या डोळ्यानेच आईचा निरोप घेतला.
आम्ही सर्वजणी पुढील मोठ्या सिटवर बसलो होतो. आमच्यासमोर असलेल्या वयस्क व्यक्तीने आम्ही कोठे चाललो आहोत ? याबाबत चौकशी केली. माझ्याकडे ते पाहून म्हणाले, ही मुलगी रडत होती ! मुलींनो जर तुम्हाला घरची आठवण आली तर मी ट्रेनिंग स्कूल जवळच रहातो, माझ्या घरी या. तेंव्हा आमच्यातील समंजस मुलगी म्हणाली, रडण्याची आठवण काढू नका, नाही तर ती परत रडेल ! असो…
आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकला पोहचलो. ट्रेनिंग काॅलेज मध्ये जावुन रिपोर्ट केला. सुंदर परिसर पाहून मन प्रसन्न झाले. राहण्यासाठी असलेल्या डाॅरमेटरी मध्ये सर्व साहित्य, कपाट आदी लावून स्थिर स्थावर झालो. आमच्या रेक्टर ईनामदार मॅडम, प्रथम दर्शनीच सह्रदयी वाटल्या. त्यांनी आम्हाला पोलिस दलाबाबत माहिती दिली. आम्हाला चायनीज ह्विसपर, या गेमचं नाव मला कालच सरांकडून कळलं, वस्तुस्थितीचा विपर्यास व अफवा कशा पसरतात याचं प्रात्यक्षिक घेतलं.
आम्हा सर्व ट्रेनी मुलींची ओळख झाली. सूचना मिळाली, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता मैदानावर जाण्यासाठी तयार रहा. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशिक्षक भांडवल सर आम्हांस घेवून मैदानावर गेले. प्राथमिक माहिती दिली. नंतर रूटीन सुरु झालं. सकाळी मैदान, नंतर नाष्टा, वर्ग, जेवण. थोडी विश्रांती. परत मैदानावर खेळ आदि.
धाऊन, कवायत करून पाय फार दुखायचे. मी थकून जायचे. घरच्या आठवणीनं मन व्याकूळ व्हायचं. मग समजलं आम्ही घरी पत्र लिहू शकतो ! पत्र लिहुन घरी खुशाली कळवली. रविवारी पालकांना भेटता येत असून आई व काका (माझ्यासह सर्व वडिलांना काका म्हणत) तुम्ही भेटण्यासाठी या असे मी लिहिले.
दुर्दैवाने तो दिवस जवळ येत होता. आम्हाला रविवारचा अर्धा दिवस सुट्टी असल्याने वामकुक्षी घेत असताना मला वाईट स्वप्न पडलं. मी रडू लागले. मैत्रिणी जवळ आल्या व काय झालं असं त्यांनी मला विचारलं असता, मला वडीलांची आठवण येत असून वाईट स्वप्न पडलं हे त्यांना सांगताच मैत्रिणीनी असं काही नाही नसतं, बघ छान आहेत म्हणून पत्र येते
असे सांगून माझी समजूत काढली.
११ जुलैला ईनामदार मॅडमनी मला बोलवलं व सांगितलं तुझे मेहुणे आले आहेत. मी पळतच गेले. पाहते तो मोठ्या बहिणींचे मिस्टर पाहून मला खूप आनंद झाला. पण जेंव्हा त्यांनी सांगीतले तू तयारी कर, काकांनी तुला बोलवले आहे. ते ऐकताच माझ्या छातीत धस्स झालं. मी त्यांच्यासोबत गावी आले. दरवाजावरील पांढरा कपडा बघून मी कोसळले. माझं दैवत, माझे वडिल १० जुलैला ह्रदय विकाराने निर्वतले होते. नियतीच्या घाल्याने मी उध्वस्त झाले होते.

– लेखन : सुनीता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800