नमस्कार, मंडळी.
7 वर्षे ब्युरो ऑफ इमिग्रेशन मध्ये नोकरी केल्यानंतर पोलीस कामाचा माझा अनुभव तुटला होता. पोलीस स्टेशनला काम करण्याबाबत थोडी साशंकता वाटत होती.
मी बीओआय मधून बाहेर पडले. माझी अंधेरी ठाण्यात ठाणे पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. अंधेरी पोलिस ठाणे घराजवळ असल्याने चांगले वाटत होते. मला प्रशासन निरीक्षक पद मिळाले.
अंधेरीत असताना तत्कालिन पोलिस उपायुक्त नाईकनवरे सरांनी मला सर्व रेकाॅर्ड, आरमरी (पोलिस ठाणेतील शस्त्रे) केस पेपर्स, मुद्देमाल आदी सुव्यवस्थित लावणे बाबत सांगितले.
तेव्हाचे माझे पोलिस ठाणेतील मला भावासारखे पाठिराखे असणारे पोलिस निरीक्षक नंदकुमार म्हेत्तर साहेब यांचे मदतीने मी ते काम करत होते. सर्व रेकाॅर्ड पुठ्ठ्याचे बाॅक्समध्ये सुव्यवस्थित ठेवून वर्षानुसार अनुक्रमे स्टाफचे मदतीने करून, शस्त्रास्त्रांचे ऑईल पाणी करून, मुद्देमाल वर्ष प्रमाणे पॅकिंग करून स्टाफचे मदतीने अतिशय अपडेट केले होते.
त्यावेळचे मुंबई सह.पो.आयुक्त आदरणीय अरूप पटनाईक साहेब (प्रशासन) बृहन्मुबंई यांनी अंधेरी पोलिस ठाणे येथे भेट दिली व सर्व वरील काम पाहून त्यांनी मला व स्टाफला लगेचच रिवाॅर्ड रू. 3000/_ दिले व शाब्बासकी दिली. हे माझ्यासाठी अतिशय आनंदाचे होते. अर्थात त्याचे श्रेय आदरणीय पो.उपायुक्त नाईकनवरे साहेब व सहकारी पोनि म्हेत्तर साहेबांना सुध्दा जाते. असो….
तसेच आदरणीय सहाय्यक पो.आयुक्त गाजुळ साहेब सुध्दा तसेच वपोनि महाबदी साहेब हे सुध्दा चांगले वरिष्ठ होते. पण काही कारणाने मी वर्ष होताच तेथून बदली घेतली व एक महीना दक्षिण नियंत्रण कक्ष नोकरी करून मला लांब पडत असलेने सहार पो.ठाणे येथे नेमणूक झाली.
सहार पो ठाणे येथे एक जबरदस्त वरिष्ठ पो.नि दिलीप पाटील गुन्हे शाखा गाजवलेले व जनमानसात देखिल प्रिय असलेले साहेब मला गुरू म्हणून भेटले.
सहार ला असताना एका फाईव्हस्टार हॉटेलच्या मॅनेजमेंट व कामगार यांच्यात संघर्ष सुरु होता. काही कामगारांना मॅनेजमेंटने नोकरीवरून कमी केले होते. मॅनेजमेंटने ताठर भूमिका घेतली होती.
एका राजकीय पक्षाने काढलेला मोर्चा चा अनुभव सांगण्या सारखा आहे. त्यादिवशी मोर्चा असल्याने आम्ही सर्व पो.ठाणेत लवकर हजर झालो होतो. ठाणे दैनंदिनीत नोंदी करून त्या हाॅटेल एरियात कडेकोट बंदोबस्त लावला होता. सर्व बंदोबस्तास वपोनि पाटील साहेबांनी सागितल्याप्रमाणे सूचना देवुन बंदोबस्त चालू होता. मोर्चा अडविला गेला. स्वतः वपोनि पाटील साहेब, मी व इतर अधिकारी सतर्क होतो. पण मोर्चा अचानक आक्रमक झाला. हाॅटेल मधील नाराज कामगार बाहेर येवुन घुसले. मोर्चा अधिक आक्रमक झाला. आम्ही कसोशीने त्यांना आडवत होतो पण मोर्चा आक्रमकपणे नासधूस व हाॅटेलचे स्टाफला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. मी स्वत: हाॅटेलचे मागील बाजूस धाव घेतली कारण मोर्चातील लोक एका स्टाफचे मागे लागले होते. सर्व पुढील बाजूस गेले पण गांभीर्य ओळखून मी मागचे बाजूस गेलेला स्टाफ व मोर्चेकरी यांना हस्तक्षेप करून मारहाण न करू देता पुढील बाजूस आणले. तो पर्यन्त व.पो.नि पाटील साहेबांनी सर्वांचे मदतीने कठोरपणे हाॅटेलचे अधिक नुकसान होवु न देता परीस्थिती नियंत्रणात आणली.
महिला मोर्चेकरी आक्रमकपणे नुकसान करत होते. त्यांना सुध्दा काबूत आणले. सदर मोर्चा केवळ काही मिनिटांत आक्रमक झाला होता. काही लोकांना ताब्यात घेवुन व.पो.नि पाटील साहेबांचे नेतृत्वाखाली कठोरपणे तो मोडून काढला. पो.ठाणेत गुन्हा नोंदवून पो. नि.यादव साहेब (पो.नि.गुन्हे) यांनी व.पो.नि पाटील साहेब यांचे वैयक्तिक लक्ष घातलेने मोर्चातील लोकांना अटक केली होती. पक्षाचे दिग्गज नेत्यांना अटक केली होती. प्रशासनाने देखिल केसच्या आधारे कडक भूमिका घेवून कलेक्टर, बांद्रा यांनी राजकिय पक्षास हाॅटेल नुकसानी बद्दल मोठा दंड केला. त्याविरोधात सदर पक्ष उच्च न्यायालयात गेला पण मोठ्या रक्कमेचा दंड उच्च न्यायालयाने देखिल कायम केला व त्यामुळे जनमानसात चांगला संदेश गेला.
राजकिय पक्ष देखिल मोर्चे काढून मालमत्तेचे नुकसान करता दंड भरावा लागेल म्हणून मालमत्तेच्या नुकसान बाजीस पायबंद बसला. हे सहार पो.ठाणेचे टीमवर्कचे यश होते. असो…
सदर पोलिस ठाणेतील अनंतचतुर्दशी दंगल हाताळण्याच्या अनुभवसह पुढील लेखात भेटू.

– लेखन : सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800