दंगल नियंत्रण
नमस्कार, मंडळी.
मी सहार पोलिस ठाणे येथे असताना घडलेल्या जातीय दंगली बाबत आज आपण पाहू या…
2010 ची घटना. गणेश उत्सव नेहमी प्रमाणे अपूर्व उत्साहात पार पडला होता. गणेश आगमन बंदोबस्त, दिड दिवसांचे, तीन दिवसांचे, गौरी आगमन, गौरी विसर्जन, पाच दिवसाचे, सात दिवसाचे, दिवसाचे गणेश विसर्जन बंदोबस्त पार पडले होते व अनंतचतुर्दशीचा बंदोबस्त लागला होता.
माझी बीट चिमटपाडा असल्याने मी सकाळपासूनच बीट चौकीत हजर होते. सर्व स्टाफ सुध्दा अलर्ट होता. जसजशी दुपार होवु लागली तसे हळूहळू बीट हद्दीतील एक एक सार्वजनिक गणेश मिरवणूका वाजत गाजत रस्त्यावर येत होते.
संध्याकाळ होत आली होती. माझ्या स्टाफ पैकी एक अनुभवी हवालदार पाटील माझे कडे आले व मिरवणूक मागील बाजूस काही गडबड होईल असे शब्द कानावर आलेचे बोलले.
मी सतर्क झाले. पूर्ण मिरवणूक मधून एक चक्कर मारली. पुढे काही अंतरावर एक अन्य धर्मियांचे धार्मिक ठिकाण होते. तेथील स्टाफला स.पो.नि लोखंडे यांना अलर्ट रहाणे बाबत निरोप पाठविला. मी स्वतः अत्यंत दक्षपणे बंदोबस्त करत होते.
मिरवणूक जसजशी अन्य धर्मियांचे धार्मिक स्थळाजवळ येवु लागली तशी मला काही गडबड होईल याची चाहूल लागली. मी ताबडतोब पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील सर यांना फोन केला व मी होते त्याठिकाणी येण्यास विनंती केली. सर ताबडतोब सदर ठिकाणी आले. त्यांना मी माझे सोबत थांबण्यास सांगितले.
पाटील सर व मी बोलत बोलत जात होतो. सरांना मी सांगितले कि मला हवालदार पाटील यांनी सांगितलेले सांगितले. अन्य धर्मीय धार्मिक स्थळाजवळून आम्ही व मिरवणूक पुढे जात होती. आम्ही दक्ष होतो. इतक्यात पश्चिम कडून मिरवणूकी कडे एक मोठा तरूणांचा जमाव मिरवणूकीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही अलर्ट असल्याने त्यांना अडवत तुम्ही कोण ? कुठून आलात ? असे त्यांना अडवत विचारत होतो.
तो पर्यन्त मागून पूर्वेकडून देखिल मिरवणूकीतील जमाव एकत्र झाले व पहाता पहाता दंगल सुरु झाली. पाटील सरांनी ताबडतोब कंट्रोल रूमला कळविण्यास सांगितले. मी व पाटील सर जमावाच्या मध्ये होतो. येथे एका गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे, बांद्रा पोलिस ठाणेला असताना परब नावाचे अधिकारी व मी गप्पा मारता मारता दंगलींचा विषयी बोलत होतो. ते आपला बांद्रा जैन मंदिर येथे नेमणूकीस असताना मंदिरात चाल करून आलेला मोठा जमाव व आपली पोलिसांची तुटपुंज्या संख्या पाहून सरळ जमावाला सामोरे जात हात जोडून जमावास विनंती केली व कायदा हातात न घेण्याची विनंती केली होती व दंगल रोखण्याचा अनुभव सांगितला होता.
मला तो चांगलाच स्मरणात होता. मी देखिल तो फॉर्म्युला वापरायचा निर्णय त्वरित घेतला व जमावाच्या मध्ये शिरून जमावास मोठ्या आवाजात हात जोडून विनंती केली कि कायदा हातात घेवू नका. “आप लोग हठ जावो” असे मी ओरडून जमावास सांगत होते. पाटील सर व मी मध्ये आणि जमाव आपल्या विरूध्द जमावाशी भिडण्याचा प्रयत्न करत होता. पण पाटील सर व मी दोन्ही बाजूचे मध्ये राहून त्यांना एकमेकाला भिडण्यास प्रतिबंध करत होतो.तो पर्यन्त मागून एक दगड आला पण सुदैवाने तो माझ्या कॅपवर लागला.
दुसरा दगड आला तो बेल्टवर लागला. हे दोन्ही दगड मागील बाजूने आले होते. पूर्व बाजूकडून आलेला दगड मात्र माझे गुडघ्यावर लागला पण मी बधले नाही. हात जोडून जमावास विनंती करतच होते. “आप लोग हठ जावो” जमाव सांगत होता मॅडम आप हठ जावो. मी म्हणाले, “मै मरूंगी लेकिन हटूंगी नही. हटना आप लोगोंको है.”
थोड्या वेळात कंट्रोल ला कळवल्या नुसार अतिरिक्त मदत आली व निसर्गाने सुध्दा आम्हास साथ दिली. धो धो पाऊस सुरू झाला. जमाव विखुरले व मिरवणूक मार्गी लागली.
मला त्यावेळी जे सुचले ते केले हे कदाचित इतरांना अयोग्य सुध्दा वाटू शकते. एवढी रिस्क घेण्याचे कारण काय असे सुध्दा वाटू शकते. पण तात्कालिक उथळपणे दंगलीत सहभागी झालेले तरूण वर्ग त्यातील एखाद्याचा बळी गेला तर कुटुंबीयावर काय दुःखाचा डोंगर कोसळत असेल ? किती आयाचे पुत्र ?किती तरुणींचे कुंकू पुसले जात असेल ? किती अश्राप बालकांचे छत्र नाहीसे होत असेल ? किती बहिणींचे राखी व भाऊबीजेवर व भाऊबहिणीच्या प्रेमावर दुःखाचा डोंगर कोसळत असेल ? याचा विचार केला तर परत परत मी हात जोडून तरूण वर्गास व अशा दंगलीला आपली पोळी भाजून घेणार्याना विनंती करेन कि, दगंलीतून काय साधते ? फक्त आणि फक्त वेळ निघून गेल्यावर होणारा पश्चात्ताप.
एक अधोरेखित गोष्ट म्हणजे सामान्य कार्यकर्ते त्याच प्रमाणे पोलीस बळी पडतात. पहा बरे कोणी महत्वाची व्यक्ती दंगलीत बळी पडते काय ?
पोलीस दलाने देखिल हे लक्षात घ्यावे की आपण लोकशाहीत पोलीस आहोत.जमावाची मानसिकता वेगळी असते. त्यात जे आक्रमक आहेत त्यांना बाजूला करून प्रसंगी हेल्मेट, लाठी आदि साधनाने सुरूवातीसच सतर्क राहून दंगली काबूत आणाव्यात.
सदर दिवशी अनुभवी पाटील हवालदार, खमके वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदरणीय पाटील सर यांचे मुळे अनंतचतुर्दशी चे दिवशी ची दंगल थोडक्यात आटोक्यात आली व मुंबई अभद्रातून वाचली. नाहीतर कल्पना करवत नाही कि काय घडले असते ? असो…

– लेखन : सुनिता अविनाश नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800