नमस्कार, मंडळी .
मागील लेखात पाहिले कि माझी बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र येथे झाली. माझ्यासाठी ती कसोटी ठरली. कारण मुलगा 10 वीत शिकत होता. त्यातून त्याला डेंग्यूची लागण झाली होती. मुलगा म्हणू लागला, आई मला सोडून अमरावतीला जावु नको. कुटुंबीयांचे देखिल मत पडले कि मी प्रमोशन नाकारून मुंबईतच रहावे.
माझी मनस्थिती द्विधा झाली. एका बाजूला आजारी मुलगा, त्यातून 10 वी सारखे महत्वाचे वर्ष. तिकडे कर्तव्य कालावधीतील बढतीच्या महत्वाचा टप्पा. फारच मानसिक गोची झाली होती. त्यातून मुंबईतच ठेवा, ही विनंती वरिष्ठ ऐकेनात व जेंव्हा अमरावतीला जावेच लागेल हे निश्चित झाले तेंव्हा माझा बांध कोसळला व ऑफिस मध्येच मी ढसाढसा रडले.
कोणास वाटेल बदली तर नोकरीतला अविभाज्य घटक. त्यात काय एवढे ? पण ‘जावे ज्याचा वंशा तेंव्हा कळे’ हेच खरे. मनावर बांध घातला. मुलाला समजावले, परिक्षेपूर्वी विशेष रजा असते ती घेवुन येते म्हणून.
अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे फोन करून मी हजर होत असलेबाबत कळविले व अंबा एक्सप्रेस पकडून अमरावतीला गेले.
अमरावतीचा सुरूवातीच्या काळ अवघड गेला पण अमरावती इनचार्ज म्हणून एस.पी.धिवरे साहेब आले व त्याच दरम्यान अपर पोलिस अधीक्षक देशमुख साहेब सेवानिवृत्त झाले व माझी जबाबदारी देखिल वाढली. हा कालावधी चांगला गेला.
सांगायची एक गोष्ट म्हणजे मला तेथे सरकारी निवासस्थान न मिळाल्याने मी थोडे दिवस सरकारी रेस्ट हाऊसला राहिले. नंतर ओळखीने मला अमरावती कॅम्प येथील ब्रम्हाकुमारी कोरडे दीदींचे घरात जे सेंटर आहे, तेथे राहण्याची सोय झाली. माझ्या मुळच्या स्वभावास अनुसरून आध्यात्मिक क्षेत्रातील एक जीवन परिवर्तन होणारा टप्पा मिळाला.
मला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कामासंबंधी विषेश काही सांगावे असे काही काम करता आले नाही. मी मुंबईत अवर सचिवांना (गृह विभाग) यांना नम्र विनंती करून एक वर्ष दोन महिन्यात मुंबई जात पडताळणी ऑफिस, दक्षता पथक येथे नेमणूक झाली.
हा विभाग समाजकल्याण खात्याचे अखत्यारीतला. तेथे देखिल काम करण्यास फारसा वाव नव्हता पण हाताखाली पोलिस स्टाफच्या मदतीने दक्षता पथकाकडील सर्व जून्या प्रलंबतीत प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्ष कार्यकालानंतर माझी बदली कोल्हापूरला मुख्यालय पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली.
तेथील अनुभव पाहू पुढील भागात. धन्यवाद.

– लेखन : सुनिता नाशिककर
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
