समारोप…..
नमस्कार मंडळी,
७ जून १९८७ रोजी सुरू झालेला माझा पोलिस खात्यातील कर्तव्यकाल जवळजवळ संपत आला होता. एक नजर झर्रकन भूतकाळावर गेली व पोलीस खात्यातील आठवणींनी मनात गर्दी केली.
मुंबईत मिळालेल्या पहिल्या पोस्टींगमध्ये विमानतळ सुरक्षा विभागात असताना विमातळावरील
(देशी व आंतरराष्ट्रीय) विमानतळावरील गजबजलेली दुनिया, पुढे बांद्रा पोलिस ठाणे येथील कर्तव्य काळात खऱ्या अर्थाने अनुभवलेला पोलीस कर्तव्यकाळ, त्याचवेळी मुंब्रा येथील घराच्या छपरावर चढून ताब्यात घेतलेला गुन्हेगार, सेवानिवृत्त भापोसे शिवानंदन साहेब, पोलिस निरीक्षक अंबादास पोटे व ग्रुप बरोबर अॅन्टी टेरेरीस्ट विभागात आलेले चित्तथरारक अनुभव, समुद्रातील कुजलेल्या स्थितीतील ताब्यात घेतलेले मृतदेह, त्यामुळे दोन दिवस उडालेली अन्नावरची वासना, सर्व सार्वजनिक सण उत्सव विषेषत: कॅथलिक संस्कृती, हरेक प्रकारचे गुन्हे यांचा अनुभव अशा प्रकारे बघता बघता ५ वर्षे सरली.
तेथे काम करताना स्व. बी.बी.पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व व.पो.नि.वरकड सर यांनी सतत प्रोत्साहन दिले. ते मी कधीच विसरू शकणार नाही.
पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्यूरो ऑफ इमिग्रशन येथील ७ वर्ष, तेंव्हा पहाता क्षणी इमपरसोनेशन ओळखलेले त्याचप्रमाणे जलद प्रवाशी तपासणीसाठी मिळालेले प्रशस्तीपत्र, त्याच दरम्यान आईपणाची वाढलेली जबाबदारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून मिळालेली पदोन्नती न घेता इमिग्रेशन मध्येच घेतलेली वाढ, एक वर्ष घेतलेली मातृत्व रजा हा सर्व काळ संस्मरणीय होता.
पुढे नियमानुसार अंधेरी पोलिस ठाणे येथे बदली झाली. अंधेरीतील पोलिस प्रशासन पहात असताना अपटूडेट केलेले पोलिस ठाणे पाहून सध्या सेवानिवृत्त आदरणीय भापोसे अरूप पटनायक सरांनी बक्षीसही दिले होते. पण काही कारणामुळे मी तेथून बदली मागितली. माझी बदली सहार पोलिस ठाणे येथे झाली.
सहार पोलिस ठाणेत मिळालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय दिलीप पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी जीवाची बाजी लावून हाताळलेली दंगल, एका पंचतारांकित हाॅटेलवर राजकीय पक्षाने काढलेला मोर्चा हाताळताना दाखविलेली तत्परता यामुळे तेथील कार्यकाल लक्षात राहिला. नंतर तो कार्यकाळ संपून विशेष शाखा २ येथे माझी बदली झाली.
विशेष शाखा २ मध्ये काम करताना आदरणीय भापोसे दोरजे मॅडम कडून खूप शिकता आले. तेथील कार्यकाल संपून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर वाहतूक शाखेत बदली झाली.
खऱ्या अर्थाने जशी नोकरी करायची होती तशी मी करू शकले. हाताखालील स्टाफला समजून घेवुन वडाळा ट्रॅफिक विभागाचे जीव ओतून काम केले. तिथे रूजु व्यक्तीमत्वाचे सन्माननीय डाॅ.श्री.भूषणकुमार उपाध्याय सर (भापोसे) व आदरणीय श्री.मिलिंद भारंबे (भापोसे) ह्या दोन्ही वरिष्ठांचा मला सार्थ पाठिंबा व मार्गदर्शन मिळाले. ते मी कधीही विसरू शकत नाही.
तेथून अपर पोलिस अधीक्षक अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली. मुलगा आजारी असल्याने माझ्यासाठी तो काळ सत्त्व परिक्षेचा होता. त्यात मुलगा दहावीत होता. वर्ष सव्वावर्षात माझी बदली करून मुंबईत जात पडताळणी ऑफिस, दक्षता पथक येथे नेमणूक झाली. तिथे कामाचा फारसा ताण नव्हता. १६-१७ वर्षांच्या प्रलंबित फाईल्स क्लिअर करून घेतल्या.
तेथून कोल्हापूर होम डीवायएसपी म्हणून बदली झाली. माझ्यासाठी हा टप्पा दोन कारणांसाठी महत्वाचा होता. एक म्हणजे कोल्हापूर माझे होम डिस्ट्रीक्ट व दुसरे म्हणजे माझी सेवानिवृत्ती एक वर्षावर आलेली. माझ्यासाठी अत्यानंदाचा कालावधी. माझ्या मायभूमीत काम करता आले. मी धन्य झाले. अशा प्रकारे ३४ वर्ष सेवा कालावधी पार पाडून ३० जून २०२१ रोजी मी सन्मानाने सेवानिवृत्त झाले.
आज मागे वळून या ३४ वर्षाचा लेखाजोगा मांडतांना, मी पूर्ण पोलीस प्रवाहात असताना हे ठामपणे सांगू शकते कि मी नेहमीच ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ व नेहमी तक्रार हाताळतांना मी स्वतःला नेहमी तक्रारदाराच्या भूमिकेतून पहात असे. सद्वविवेक बुध्दी जागृत ठेवून प्रसंगी प्राणपणांस लावून नोकरी केली. त्यात मला माझी आई, पती अविनाश, मुलगा वेदांत व माझ्या बहिणींची मोलाची साथ लाभली. त्यामुळेच पोलीस दलातील हा खडतर व संवेदनशील प्रवास मी पार पाडू शकले. ज्ञात अज्ञात व्यक्तीनी, सहकारी बंधू, भगिनींनी मला मोलाची साथ दिली त्यामुळेच हे शक्य झाले व आज मी अतीव समाधानाने निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यतीत करत आहे.
माझ्या या लिखाणाचे श्रेय माझे गुरू, निवृत्त माहिती संचालक आणि न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचे संपादक आदरणीय देवेंद्र भुजबळ सर यांना जाते. त्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले नसते तर मी व्यक्त होऊ शकले नसते.
या निमित्ताने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या जिगरबाज पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेते.
शुभं भवतु.🙏

– लेखन : सुनिता नाशिककर
पोलिस उपअधीक्षक (सेवानिवृत्त)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
सुनिता नाशिककर यांचा ३४ वर्षाचा पोलीस खात्यातला लेखाजोखा वाचताना मनोरंजन तर झालेच पण खूप माहितीही मिळाली.
धन्यवाद सुनिताताई.!
धन्यवाद देवेंद्रजी!!