अवर्णनीय अनुभूती
मुंबईत विमानतळ सुरक्षा विभागात एके दिवशी रात्रपाळी कर्तव्य असताना मला आदेश मिळाला कि, संत मदर तेरेसा ह्या विमान प्रवास करत असून विमानात बसेपर्यंत त्यांना सुरक्षा द्यावयाची आहे.
मानवतेच्या करूणेची त्यागमुर्ती, माझं आदर्श व्यक्तिमत्व मला जवळून पहायला मिळणार याचा मला अतोनात आनंद झाला. क्षणात मला माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत आठवली.
या मुलाखतीत एक प्रश्न मला असा विचारला होता की, नोबेल पुरस्कार मिळालेल्या एका महिलेचे नाव सांगा ? तक्षणीच मी मदर तेरेसा यांचं नाव सांगून त्या थोर सेवाव्रती माझ्या आदर्श आहेत, हे सांगितल्याचे आठवलं. आणि आज आपण त्यांना बघणार, त्यांच्या सेवेत राहणार याचा मला अतोनात आनंद झाला.
मी व माझे सहकारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक रामोळे आम्ही दोघे संत मदर तेरेसा यांचे आगमन होताच त्या करूणेच्या मूर्तीस पाहूनच धन्य झालो . विमान सुटायला वेळ असल्याने त्यांना घेवून आम्ही स्वागत कक्षात गेलो.

संत मदर तेरेसा वयोमानानुसार थकल्या होत्या .पण चेहऱ्यावर तोच अथांग करूणेचा भाव ! मी धन्य धन्य झाले. त्यांना चरण स्पर्श केला. मी श्रांत झाले. साधारणतः तासभर मला त्यांच्यासोबत थांबायला मिळाले. अर्थात वयोवृद्ध अवस्थेमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. तरी देखिल एका अवर्णनीय अनुभूतीचा प्रत्यय आला.
खरंच, ज्या पोलिस दलामुळे ही संधी मिळाली त्या दलाची मी शतशः ऋणी आहे.

– लेखन : सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800