नमस्कार मंडळी.
आपण मागील भागांत पाहिले कि, पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेवर कसे सर्व अवलंबून असते. ते हाताखालील अधिकारी, कर्मचारी यांना कसे प्रोत्साहीत करू शकतात हे आपण पाहिले. अर्थात आपण सर्व अधिकारी असेच असतील असे गृहित धरू शकत नाही. असो…
पोलिस ठाण्यात काम करत असताना साधारण गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पध्दत (मोडस ऑपरेंडी) असते.
१) सकाळी लवकर मॉर्निंग वाॅकला जाणाऱ्या विषेशतः महिला व वृध्द यांचे मंगळसूत्र किंवा चेन स्नॅचिंग कमी करायची असेल तरमोटर सायकल स्वार रस्त्याच्या काॅरनर वर जर थांबले असतील तर त्यांना हटकले पाहीजे. माझे म्हणणे नाही कि ते मोटर सायकल स्वार चेन स्नॅचरच असतील पण त्यांना हटकून चौकशी केली पाहिजे. त्यांचे मोटरसायकल नंबर पाहिले पाहिजेत. त्यांना हटकताना पाहून खरे चेनस्नॅचर येथे फार चेकिंग चालते म्हणून दुसरीकडे आपला मोहरा वळवतात.
2) घरफोडीचे गुन्हे साधारण मध्यरात्री चे दरम्यान होतात. हे गुन्हेगार पोलीस गाडी पाहिली कि आडोसा, पार्किंग गाड्या यांचा आडोसा घेतात त्यामुळे इफेक्टीव्ह पेट्रोलिंग झाली पाहिजे.
3) शेठला मुलगा झाला आहे व तो गिफ्ट वाटत आहे तुमचे दागिने काढून ठेवा म्हणून सांगून हातचलाखिने ते दागिने चोरून या बाबत पोलिस पेट्रोलिंगचे वेळी विनाकारण निर्मनुष्य रस्त्यावर वा कमी वर्दळीचे भागात उभ्या असणार्या संशयास्पद व्यक्तीना हटकले कि त्या जागेवरून ते हलतील. त्याचप्रमाणे लोकांनी सुध्दा अशा आमिषाला बळी पडू नये.
4) बॅग लिफ्टींग मध्ये गुन्हेगारांची चारचाकी वहानाच्या उजव्या बाजूला एकजण रस्ता विचारण्यात गुंतवतो व दुसरा विरुध्द बाजूने गाडीतील बॅग,मोबाईल, लॅपटाॅप आदि वस्तू चोरतात. तसेच बिस्कीट आदि खावून अंगावर टाकून घाण अंगावर पडली आहे असे सांगून लक्ष वळवून, पैसे पडलेत म्हणून काही नोटा खाली टाकून लक्ष विचलीत करून सुध्दा गुन्हे होतात.
5) पुढे खुन झाला आहे आम्ही साध्या वेषातील पोलिस आहोत, चेकिंग चालू आहे, मौल्यवान वस्तू काढून ठेवा असे सांगून हात चलाखी करून चोरी केली जाते. अशा वेळी पेट्रोलिंगचे वेळी साधारणतः पोलिसासारखे केस कट असणारे वा बूट तशा पध्द्तीचा पेहराव करून रेगांळत असणार्याना प्रोफाईल करून हटकले पाहीजे.
6) अपार्टमेंटमध्ये/घरात येवून गुन्हे करणाऱ्या चोराबाबत मात्र प्रत्येक सोसायटीने सी.सी.टी.व्ही बसवून व प्रत्येकाने खात्री केल्याशिवाय कोणालाही दरवाजा उघडू नये व दरवाज्याची चेन लावूनच बोलावे व खात्री झाली तरच दरवाजा उघडावा.
7) घरातील नोकर व वाॅचमन यांचे बोटाचे ठसे, त्यांचे फोटो, पत्ता, नातेवाईक व गावचा पत्ता आदि माहिती जरूर ठेवावी. त्याच प्रमाणे भाडेकरू ठेवल्यास त्याची माहिती पोस्टाद्वारे (फाॅरमॅट तयार असतो) अॅकनाॅलेजमेंट सहित कळवावे. पोलिस ठाणे द्वारा रिसिव्ह झालेली पावती आपल्याकडे सांभाळून ठेवावी.पोलिस स्टेशनला व्यक्तीशः जाणेची गरज नाही.
अपघात प्रकार
1) किरकोळ अपघात उदा. किरकोळ घासाघाशी
2) गंभीर अपघात ज्यात वहान चालवणारे अगर पादचारी जखमी असतात.
3) प्रणांतीक (फेटल) अपघातात मृत पावणे आदि प्रकार मोडतात.
अपघाताच्या बाबतीत एक कळकळीची विनंती आहे कि जर कोणी जखमी असेल तर प्रथम त्यांना वैद्यकीय दिली पाहिजे. नंतर सर्व कायदेशीर बाबी पहाव्यात. कारण जीव वाचविण्यासाठी हे महत्वाचे असते. सदर वेळी फक्त एवढे लक्षात घ्यावे अपघातग्रस्त वाहनांचे नंबर नोट करून घ्यावेत व ते पोलिसांना द्यावेत. वरील प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांना कळवावे व नोंद घेण्यास सांगावे. पोलिस नोंद करून कारवाई करतील व ज्यांची चूक असेल (ते नुकसान व जागा बघून कळते) त्याच्यावर कारवाई करतील. इन्सुरन्स वरून भरपाई होत असते म्हणून इन्सुरन्स वेळेच्या वेळी भरावा. मांडवलीच्या भानगडीत पडू नये.
सध्या तर सायबर क्राईम वाढले आहेत व भविष्यात त्यात वाढ होणार आहे. तरी खबरदारी म्हणून आपले बँक डिटेल्स फोन वरून कोणास देवु नयेत. आपल्या ए.टी.एम चा कोड इतर कोणास सांगू नये. तसेच लाॅटरी लागली आहे यासारखे मेसेज वा ऑनलाईन व्यवहार करताना ओटीपी नंबर आदी कोणास शेअर करू नयेत ई. काळजी घ्यावी.
अपघात होवु नयेत वा झाल्यास कमीत कमी नुकसान वा जीवितहानी होवु नये या बाबत ट्राॅफिकच्या कर्तव्यकालातील अनुभवात सविस्तर लिहीनच. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीत छेडछाड किंवा विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी कोणत्या महिलांना लग्न करू म्हणून फसवणूक इ. गुन्हे होतात. याबाबत महिलांनी लगेच घरच्यांना विश्वासात घेऊन सदर बाब निदर्शनास आणावी व छेडछाड करणार्याना तेथेच धारेवर धरावे. भिती वाटत असल्यास पोलीसांची मदत घ्यावी.
बलात्कार सारख्या घटनांमध्ये असे निदर्शनास येते कि आरोपी बऱ्याच वेळा जवळचा नातेवाईक वा मित्र वा परिचित असतो म्हणून मुलींना गुड टच/बॅच टच बाबत महिला अधिकारी व कर्मचार्याकडून अवेअरनेस कॅम्पेन चालतो तो प्रत्येक शाळेतून चालवावा. हल्ली हुंडाबळी सारखे गुन्हात व्यवस्थीत चौकशी करावी.
तर माझा नोकरी करताना जास्तीत जास्त भर हा prevention is better than cure वर भर आहे. अर्थात त्यामध्ये एक तोटा असतो. केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोगा (नोंद) होत नाही. पण आंतरिक समाधान खूप मिळते. धन्यवाद.
क्रमशः

– लेखन : सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सुनता नाशिककर यांचे सर्वच लेख वाचनीय आहेत.
आजच्या लेखात गुन्हे कसे घडतात व गुन्ह्यच्या बाबतीत
लोकांनी कसे सावध रहावे हे छान सांगितले आहे…