टपोरीगिरीचा अनुभव
नमस्कार, मंडळी. मागच्या भागात आपण पाहिले कि, कशा प्रकारे माझे पोलिस ठाण्याचे कर्तव्य सुरू झाले. १९९३-९४ सालातील हा कालावधी. पोलिस ठाण्यात अजून महिला अधिकारी पहाण्याची लोकांना सवय नव्हती. बाहेरच्या टारगट गटाला सुध्दा अजून महिला पोलिस अधिकारी असल्याचे गांभीर्य समजले नव्हते.
एके दिवशी मी पोलिस ठाण्यातुन पायी येत होते. तेंव्हा मी गणवेषातच होते. एका दांडगट तरुणाने कांही काॅमेंट मारली. मी वळले. पाहिले कोणी आजूबाजूला आहे का ? खात्री केली ती कॉमेंट मला उद्देशूनच होती काय ? खात्री केली. ती कॉमेंट माझ्यासाठीच होती. मी त्याच्या जवळ जावुन त्याच्या कानाखाली एक सणसणीत लावली.
पोलीस ठाण्यात येवून बसले. थोड्या वेळाने एक तथाकथित शाखाप्रमुख आले व मला जाब विचारू लागले, ‘तुम्ही एका तरूणाला कानाखाली का मारले ?’ मी शांतपणे त्यांना म्हणाले, हो लावली त्याच्या कानाखाली. त्याने मारले हे सांगितले, पण का मारले ते नाही का सांगितले का ? त्याला माझ्या समोर घेवुन या, मग सांगते का कानाखाली का लावली ते. पण ते काही त्याला घेऊन परत आलेच नाही.
त्यानंतर असेच पोलिस ठाण्याच्या प्रत्यक्षात चालणाऱ्या कामकाजात मी तयार होत होती. मार्च महिना होता. होळीचा सण होता. रंगपंचमी खेळताना एका तरूणाने एका मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून ठेवले होते. पुन्हा एकदा तेच शाखा प्रमुख आले म्हणाले, ‘मॅडम त्या मुलाला सोडून द्या’ मी म्हणाले, ‘सोडते पण एका अटीवर ! जर त्या मुलीच्या जागी तुमचीच मुलगी असती तर आपण असेच सांगितले असते काय ? याचे उत्तर द्या.’ शाखा प्रमुख निरुत्तर झाले व निघून गेले.
आणखी एक वेगळा अनुभव. कोणीतरी वांद्रे परिसरात फिरणारी १५-१६ वर्षाची एकटी फिरणारी मुलगी पोलिस ठाण्यात आणली गेली. मुलगी गोड व चांगल्या परिवारातील दिसत होती. तिच्याकडे चौकशी केल्यावर ती रडू लागली. एका अभिनेत्याचे नाव घेवु लागली. त्याला कसेही करून भेटायचे आहे, म्हणू लागली. तिला खूप समजावले. पण ती फक्त त्या अभिनेत्याचे नाव घेवुन रडायची. आम्ही तिला खूप समजावले. फिल्मी जीवन व प्रत्यक्षात खूप अंतर आहे, फिल्म मनोरंजनाचे साधन आहे वगैरे. पण त्या अभिनेत्याचे गारूड त्या तरूणीवर व्यापून राहिले होते. आम्ही खूबीने माहिती काढली. आम्हाला समजले कि ती दिल्ली येथील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून.
त्याप्रमाणे वायरलेस मेसेज आदी करून तिच्या पालकांना मुंबईत बोलावून घेतले व ती मुलगी त्यांच्या ताब्यात दिली. अशाप्रकारे ती मुलगी सुखरूपपणे तिच्या घरी गेली. अन्यथा या मायानगरीत तिचे काय झाले असते ? याची कल्पनाही करवत नाही.
मी पोलिस अधिकारी म्हणून तयार होत होते. एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.बी.पाटील सर म्हणाले, सुनिता, तुला दोन चाकी वाहन चालवता येते का ? मी नाही म्हणून सांगितले. पण शिकावु वाहन परवाना असल्याचे सांगितले. सर स्वत: मागे हात बांधून उभे राहिले. त्यांनी एका अधिकाऱ्याला सांगितले, सुनिताला दुचाकी वाहन चालवणे शिकवा. आणि मी दुचाकी चालवायला शिकले. अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळी माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणीत केला.
थोड्याच दिवसांत मी वायरलेस ड्युटीवर असताना वायरलेस वाहन देखील चालवायला शिकले.
असे माझे पहिले गुरू बी.बी. पाटील सर. आज ते या जगात नाहीत. परंतु त्यांनी पहिल्याच पोलीस ठाण्यात मला जी शिकवण दिली ती माझ्या अंत:करणात शेवटपर्यन्त राहील. आजचा हा लेख माझ्या पहिल्या आदरणीय पोलिस गुरू स्व.निवृत सहायक पोलिस आयुक्त बी.बी.पाटील यांना समर्पित करते. ते आज या जगात नाहीत पण माझ्या ह्रदयात ते कायम जिंवत आहेत.
त्यांना विनम्र आदरांजली.

– लेखन : सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800