नमस्कार, मंडळी.
मागील भागात आपण पाहिले कि, कशा प्रकारे मुंब्रा येथे आरोपी पकडले. आता बांद्रा पोलिस ठाण्यात काम करत असतांना मला जवळ जवळ 5 वर्ष झाले होते.
दरम्यान माझी बदली पुन्हा विमानतळ सुरक्षा विभाग येथे झाली. मी बांद्रा पोलिस ठाणे येथे असताना सबसिडरी इंटेलिजन्स ब्यरो येथे (ब्युरो ऑफ इमिग्रेशन) येथे प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे 8, 9 महिन्यात परत माझी बदली BOI ब्युरो ऑफ इमिग्रशन येथे झाली.
ह्या विभागात काम करत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे काम करावे लागले. ही नेमणूक देखील खूपच संवेदनशील होती. परदेशी जाणारी विमाने खूपशी रात्रीच असल्याने प्रवाशांची झुंबड उडत असे. आम्हांस त्यांचे ट्रॅव्हल डाॅक्युमेंट (पासपोर्ट, व्हिसा,इतर ट्रॅव्हल डाॅक्युमेंट ) प्रवास करणारी व्यक्ती पासपोर्ट मधील आहे किंवा कसे ? इत्यादी बाबीची तपासणी करावी लागे. या ठिकाणी सुध्दा आपल्या कौशल्याचा कस लागे कारण प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, अल्पवेळात तपासणी व तीही रात्रभर चाले. 12 तासांची ड्युटी असे. एक दिवसपाळी व एक रात्रपाळी व सुट्टी अशी शिफ्ट ड्युटी असे.
रात्रपाळी ड्युटीला रात्रीचे 8 ते सकाळी 8 ड्युटी पार पडल्यानंतर सकाळी अंगात त्राणच उरत नसे. तेथे काम करत असताना जास्तीतजास्त प्रवासी तपासणाऱ्या स्टाफला “फास्ट क्लियरन्स” चे प्रशंसा पत्र मिळे. मला देखील ते मिळाले.
सांगण्यासारखी केस म्हणजे एके दिवशी गल्फ देशात जाणारा एक प्रवासी माझ्या काउंटर वर आला असता मला लगेच लक्षात आले कि प्रवास करणारा व्यक्ती व पासपोर्ट मधील व्यक्ती वेगळी आहे. मी ठाणे अमलदार अधिकाऱ्यास तसे सांगितले व परत काउंटरला येवुन इतर प्रवाशांची तपासणी करू लागले. साधारण अर्धा पाऊण तास वर नमूद प्रवाश्याची चौकशी करून तो प्रवाशी पासपोर्ट मधीलच आहे, करा क्लियर म्हणून मला सांगितले. त्यामुळे तो प्रवासी मी क्लियर केला. पण दुसऱ्या दिवशी तो प्रवासी पासपोर्ट मधील नव्हे (इंपरसोनेशन) म्हणून त्या देशाच्या इमिग्रेशनने परत पाठवला. मला फार वाईट वाटले. कारण मी जे काही सेकंदात पडताळले होते ते त्याची अर्धा पाऊण तास चौकशी करूनही त्यांना कळले नव्हते व माझे एका केसचे डिटेक्शन वाया गेले होते. असो…

– लेखन : सुनीता नाशिककर.
निवृत पोलिस उपअधीक्षक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800