स्वप्नपूर्ती
नमस्कार, मंडळी.
मागच्या भागात आपण पाहिले कि, नायजेरियन महिलेकडून मी ड्रग कसे पकडले ! या वेळी थोडया वेगळ्या आठवणी !
ज्या गावावरून विमान गेलेले ऐकू आले, दिसले तरी सर्व गल्ली गोळा होऊन सर्व जण कुतूहलाने विमान पहायला जमायचे, असं आमचं हुपरी गाव. आणि मला वाटतं बहुतेक सर्व गावांमध्ये त्या काळी तश्शीच परिस्थिती असेल.
तर या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील माझ्या नेमणुकीमुळे मला दररोजच आंतर्देशीय, आंतरराष्ट्रीय विमाने जवळून पहाता येत होती.
एखाद्या विमान सेवेचा कर्मचारी चांगला ओळखीचा असेल तर त्याच्या सोबत जाऊन विमान आतूनही पहाता येत असे. अर्थात क्वचितच☺️
तसंच आपल्या सर्वांच्या प्रमाणे व वयानुसार बाॅलीवूडचे प्रचंड आकर्षण मलाही होते. पडद्यावर दिसणारी ही मंडळी प्रत्यक्ष आयुष्यात कधी तरी प्रत्यक्षात दिसावी, अशी तारुण्य सुलभ स्वप्ने मी पहात असे.
ही सर्व कलाकार मंडळी, जसे की, ड्रीमगर्ल हेमा मालिनी, जया बच्चन, रेखा, धकधक माधुरी, मनिषा, स्व.श्रीदेवी, जयाप्रदा, डिम्पल, त्याच प्रमाणे भाग्यश्री, करिष्मा, काजोल. मला आठवते तेंव्हा करिना छोटी होती व गोंडस होती, या सर्वांना माझ्या कर्तव्यामुळे मी खूप जवळून पाहू शकले.
त्यावेळी या गोष्टींचं मला फार अप्रूप वाटे. आपण पोलीस अधिकारी झालो, म्हणून या सर्व सेलिब्रिटी व्यक्तींना इतक्या जवळून पाहू शकतो, आपल्या नजरेखालून त्यांना जावे लागते याचा मला प्रचंड अभिमान वाटे.
स्व.श्रीदेवी या युनिट सोबत असल्या तर एका बाजूला जावून शांत बसत. कदाचित त्यांचा रिझर्व्ह स्वभाव असेल. वर उल्लेखलेल्या सर्व व इतर ही अभिनेत्री जेंव्हा तपासणीसाठी महिला कक्षात येत तेंव्हा कुतुहल मिश्रित आनंदाची लहर अनुभवास यायची. त्याच प्रमाणे लिजंड अमिताभ बच्चन, शशी कपूर, अनिल कपूर, देवानंद, विजयानंद, दिलीप कुमार, तरूणींची धडकन -शाहरूख, सलमान, अमीर खान, सनी देवोल, अक्षय कुमार व जवळ जवळ सर्व बाॅलीवूडचे अभिनेते पाहताना आपण स्वप्नात तर नाही ना ? असे वाटे. विमानतळावरील या कर्तव्यामुळे माझी स्वप्नपूर्ती मात्र झाली, हे मात्र खरेच.
काही कालावधीनंतर माझी सांताक्रूज विमानतळ येथील पास सेक्शनमध्ये नेमणूक झाली. सदर ठिकाणी असताना सर्व विमानतळावरील विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना पासेस देण्याचे काम चाले. तसेच सर्व महत्त्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्ती यांचे आगमन झाले कि, त्या प्रथम सेरोमोनियल लाऊंजमध्ये यायच्या. आमची ड्युटी तेथेच असायची .
स्व. पंतप्रधान राजीव गांधी, स्व.पंतप्रधान नरसिंहराव व इतर सर्व महत्त्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्तीचे जवळून दर्शन होत असे. त्या वयातील तो मंतरलेला कर्तव्य काळ होता.आजच्या सारखे कॅमेरा असलेले मोबाईल त्यावेळेस नव्हते, याचे आता वाईट वाटते. नाही तर त्यावेळी फुरसतीच्या क्षणी अनेक छायाचित्रे घेता आली असती. असो…
छायाचित्रे नसली तरी मनातील दृश्ये मात्र कायमची आहेत !

– लेखन : सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई .
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800