राजभवन, राष्ट्रपती भवन ही अशी ठिकाणं आहेत ना, की तिथे प्रोटोकॉल ला खुप महत्व असतं. तिथे पाऊल ठेवल्या ठेवल्या पावलागणिक तेथील वातावरण आपल्याला आपोआप गंभीर बनवत जातं.
असंच आमचं ही आज काहीसं झालं. निमित्त होतं, मा. राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मी लिहिलेल्या, संपादित केलेल्या आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे लोकार्पण करण्याचे.
आम्हाला दुपारी तीन ची वेळ दिली होती. मुंबईच्या ट्रॅफिक चा काही भरोसा नसल्याने आम्ही, (म्हणजे मी, प्रकाशिका – माझी पत्नी सौ अलका आणि न्युज स्टोरी टुडे टीम चा सदस्य अतुल सोनवणे, (एम टेक)) पाऊण तास आधीच राजभवन मध्ये पोहचलो. गेल्या गेल्या तेथील हसतमुख, कार्य तत्पर जनसंपर्क अधिकारी श्री उमेशजी काशीकर यांनी आमचे स्वागत केले आणि राज्यपालांच्या दालनाकडे घेऊन गेले. तत्पूर्वी राज्यपाल महोदयांचे उपसचिव श्री रवींद्र धूर्जांड साहेबांनी आम्हाला त्यांच्याकडे बोलाविल्याचा निरोप तेथील भालदाराने दिला. म्हणून आम्ही त्यांच्या कक्षात जाऊन बसलो आणि त्यांना पुस्तकाविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
ठरल्या प्रमाणे बरोबर तीन वाजता आम्हाला राज्यपालांनी बोलाविल्याचा निरोप आला. राज्यपालांचे भव्य दिव्य दालन पाहून आम्ही आणखीनच दबकुन गेलो. राज्यपालांना नमस्कार करून, हस्तांदोलन करून आम्हीं चौघेही हातात पुस्तके घेऊन फोटो साठी उभे राहिलो. तेथे उपस्थित शासकीय फोटोग्राफर ने पटापट फोटो काढले. आम्हाला वाटले, झालं, आपला कार्यक्रम संपला. आम्ही निघायच्या विचारात असतानाच राज्यपाल सहजपणे म्हणाले, “बैठीये, बताईये इस किताब मे क्या लिखा हैं ?”
पुढचा झालेला आमचा संवाद सर्व हिंदी भाषेतून झाला.पण वाचकांच्या सोयीसाठी तो मी मराठीतून देत आहे.
तर मी पुस्तकाविषयी, त्यातील यश कथा, या यश कथांचे नायक, नायिका यांची उस्फूर्तपणे माहिती देऊ लागलो. ती ऐकता ऐकता राज्यपालांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
ते सांगू लागले, शाळेत उन्हाळ्याची सुटी लागली की, काही मुले अभिमानाने सांगायचे आम्ही मुंबई ला जाणार आहोत, कुणी सांगायचे आम्ही दिल्ली ला जाणार आहोत. हे ऐकून मी खूप नाराज व्हायचो कारण माझे जे काही नातेवाईक होते, ते सर्व कानपूरमध्ये होते. कानपूर बाहेर कुणी नातेवाईकच नव्हते. त्यामुळे असे वाटायचे की आपल्याला दिल्ली, मुंबई कधीच पाहता येणार नाही.
पण आयुष्यात कुशाभाऊ ठाकरे भेटले आणि आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांच्यामुळे मी सार्वजनिक जीवनात, राजकारणात आलो. आमचे मुळचे शेतकरी घराणे. तत्पूर्वी आमच्या घराण्यात राजकारणात कुणीच नव्हते. पण कुशाभाऊंचे ऐकले आणि पुढे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, ७ वेळा खासदार झालो. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारात मंत्री राहिलो. जी दिल्ली कधी पाहायला मिळेल की नाही, असे वाटत होते, त्या दिल्लीत खासदार म्हणून तब्बल ३५ वर्षे काढली.
पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे पत्रकारांना वाटले, मी बंडखोरी करेल, कुणाला वाटले, मी काँग्रेस मध्ये जाईल. पण माझी पक्षाशी आणि विचारधारेशी पूर्ण निष्ठा असल्याने मी असे काहीही केले नाही आणि करण्याचा प्रश्न ही नव्हता. ज्या पक्षाने मला सर्व काही दिले, तो पक्ष माझ्या बाबतीत जो निर्णय घेईल तो मला मनापासून मान्य होता. मी सत्तेत राहून ही सत्ता कधी अंगाला चिकटवून घेतली नव्हती. त्यामुळे सत्ता गेल्याचे जराही दुःख झाले नाही.
या बाबतीत स्वतःच्या पत्नीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले, मी मंत्री असताना बंगल्यात सरकारी गाडी असली तरी माझी पत्नी तिच्या जुन्या सवयीप्रमाणे रिक्षानेच भाजी बाजारात जायची. तिथे भाजीवालीशी बोलत बसायची. हे पाहून लोकांना खुप नवल वाटायचे की मंत्र्याची बायको आणि भाजीवालीशी बोलत बसते. पण असा साधेपणा आमच्या घरात पहिल्यापासून कायम असल्याने आम्ही नेहमी आनंदी रहात आलो आहोत .
मला २०१९ ला लोकसभेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी थोड्याच दिवसात मला त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आणि गेल्या वर्षी अतिशय सन्मानाचे पद समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली, ही माझ्यासाठी मोठीच गौरवाची बाब आहे. कोणे एकेकाळी मी मुंबईत येण्याचे नुसते स्वप्नच पहायचो, त्या मुंबईत आता मी राहतोय तो महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून !
बोलता बोलता, राज्यपालांनी पुण्याच्या कार अपघाताचा संदर्भ देऊन पालकांनी आपली मुलं, मुली सुसंस्कारित कशी होतील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज प्रतिपादन केली. आपण भारतीय कौटुंबिक संस्कारांपासून दूर जात असल्याने हे प्रकार वाढीस लागले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे हे सर्व बोलणे एकतर्फी झाले नाही .अलका ही तिची मते मांडत होती, अनुभव सांगत होती तर अतुल ही युवकांच्या समस्या, आशा अपेक्षा व्यक्त करीत होता.बोलताना किती वेळ गेला, हे कळलेच नाही. शेवटी मी म्हणालो, की खरं म्हणजे आपल्याला टिव्ही वर पाहताना, वृत्तपत्रात आपली छायाचित्रे पाहताना आपण खूप रिझर्व्ह असाल, असे मला वाटत होते पण आज आपण आमच्याशी दिलखुलास संवाद साधून आमच्या साठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरविला या बद्दल आपले मानावे तेवढे आभार थोडेच पडतील. शेवटी निघता निघता अलकाने त्यांच्या सोबत आम्हा उभयतांचा त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि त्यांनीही ती आनंदाने मान्य केली.
खरोखरच १ जुन २०२४ हा दिवस कायम चा स्मरणात राहील, हे मात्र खरे.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800