सौदी अरेबियात पेट्रोलियम इंजिनिअर असलेला भूषण पवार भारत सरकारच्या वंदे भारत मिशनमुळे सुखरूप मायदेशात नुकताच परतला आहे. तोच नाही तर त्याच्याबरोबर १७४ भारतीय नागरिक वंदेभारत मिशन अंतर्गत विशेष विमानाने काल पुण्यातील लोहगाव विमानतळावर सुखरूप आले.
सध्या लॉक डाउनमुळे विविध देशात अडकलेले भारतीय नागरिक भारतात परतत आहेत. त्याप्रमाणे सौदी अरेबियात नोकरी निमित्त गेलेले परंतु कोरोनामुळे नोकरी गेलेले, वृद्ध, वयस्कर, गरोदर महिला तसेच परदेश गमन, व्यवसायानिमित्त गेलेले नागरिक तेथे अडकले होते. त्यांना भारतात यायला काही परवानग्या मिळण्यास अडचणी येत होत्या.
सौदी अरेबियात स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिका-र्यांनी या सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांना महाराष्ट्रात विशेष विमानाने पाठवण्याबाबत प्रयत्न सुरू केले. परंतु त्यात त्यांना काही अडचणी येत असल्याने त्यांच्यातील श्री. किरण आठवले, श्री.मंगेश सहस्रबुद्धे व श्री.भूषण पवार यांनी खा.गिरीश बापट याच्याशी संपर्क साधला.त्यांनी तातडीने हालचाली करुन पुणे जिल्हाधिकारी व परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानग्या प्राप्त करून घेतल्या.
परत आलेल्यांमध्ये प्रामुख्याने पुणे, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुमारे १७४ नागरिकांचा समावेश आहे. सौदी अरेबियातील दम्माम येथे भूषण अमेरिकेच्या व्हेदरफोर्ड कंपनीत आठ वर्षांपासून पेट्रोलियम इंजिनिअर म्हणून काम करतोय. एरव्ही तो दर दोन महिन्यांनी पुण्यात घरी येत असे.मात्र यावेळी तो १२ मार्चला पुण्याहून सौदीला गेला व दुसऱ्या दिवसापासून कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली.त्यामुळे त्याच्या घरच्या मंडळीचे हातपायच गळाले. साडेचार महिन्यापासून तो दमामला अडकला होता.
पुण्यात उतरल्यावर या सर्वांना ७ दिवस खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पुण्यातील शासकीय अधिकारी विशेषतः उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर हे विशेष काळजी घेत आहेत.पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट व आमदार श्री योगेश मुळीक यांनी या सर्वांच्या परतीसाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे या सर्वांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.
– Inputs विजय पवार, नाशिक.