पुण्यातील ‘शांतिमदिरा’ तून मला एक दूरध्वनी आला. त्यांच्या जुलै, २०२४ मध्ये विश्व आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद अमृतमहोत्सवी सोहळ्यात एक गौरव ग्रंथ प्रकाशित होणार असून त्यात त्यांच्या विषयी मी काही लिहावे अशी त्यांची इच्छा असल्याचे मला सांगण्यात आले.
मी पुण्यातील नूमवि प्रशालेत अध्यापक म्हणून १९६२ ते १९६४ अशी दोन वर्षे कार्यरत असताना माइया सद्भाग्याने तिथे मला भेटलेल्या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. जेमतेम एक वर्ष त्यांचा माझा गुरुशिष्य नात्याने संबंध आलेला. त्या काळात विद्यार्थी असलेल्या काही जणांनी आज वयाची पंचाहत्तरी गाठली वा ओलांडली आहे. ही सारी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने दीपस्तंभ झालेली आहेत. डॉ. विनोद त्याला अपवाद नाहीत. तसा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विश्वभर पसरलेला लौकिक माझ्याही कानावर आलेला होता. पण १९६४ नंतर त्यांची माझी भेट योगायोगाने २००९ मध्ये झाली. हडपसर येथील एका नामवंत संस्थेत व्याख्यानासाठी आले असताना आवर्जून माझ्या निवासस्थानी येऊन ते मला भेटले. त्यावेळच्या त्यांच्या रूपदर्शनाने मी थक्क झालो. एक तपस्वी सिद्धयोगी साक्षात् माझ्यासमोर उभा होता. मला आनंद झाला. त्यांच्या पावलांनी माझ्या घरात आलेला प्रसरतेचा गंध ते गेल्यानंतरही दीर्घकाळ मागे रेंगाळत राहिला होता.
पुणे या विद्येच्या माहेरघरी ज्ञानाची सदावर्ते असणाऱ्या ज्ञानपीठांची आणि गुरुकुलांची परंपरा तशी जुनी आहे. डॉ. इरावती कर्वे यांना रेल्वेतील एका सहप्रवाशाने एक प्रश्न विचारला होता, पुणे हे कशासाठी प्रसिद्ध आहे ? त्यावर विचार करून त्यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते, ते म्हणजे, पुण्यातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक संस्था आहे.!
स. प. महाविद्यालयाच्या पिछाडीस विश्वविख्यात अध्यात्मवेत्ते न्यायरत्र धुंडिराजशास्त्री विनोद यांचा ‘शांतिमंदिर’ आश्रम आहे. तिथे नित्य सत्संग चाले हे आम्ही विद्यार्थी असल्यापासून आम्हास माहीत होते. या सत्संगात महपौच्या आर्ष अमृतवाणीचा लाभ घेण्यासाठी पुण्यातील श्रेष्ठ विचारवंत मंडळी तिथे आवर्जून उपस्थित असत. त्यात आमचे एक गुरू विख्यात साहित्य समीक्षक प्रा. श्री. के. क्षीरसागर, सहृदय लेखक गोपीनाथ तळवलकर यांचीही तिथे हजेरी असे.
डॉ. संप्रसाद विनोद हे महर्षी विनोद आणि स्व. मैत्रेयी विनोद यांचे चिरंजीव. त्यांचे बालपण माता-पित्यांनी केलेल्या सात्त्विक संस्कारांत आणि आश्रमातील अध्यात्म भारल्या वातावरणात गेले, वाढले. वेद उपनिषदे, षड्दर्शन, सन्तवाङमय, पौरस्त्य- पाश्चात्य तत्त्वज्ञान, योगशास्त्र यांच्या विचारदर्शनांवर होत असलेल्या चिंतन, संकीर्तनाने त्यांचे व्यक्तिमत्त्व संपृक्त होत गेले. विद्यार्थिदशेतच अध्यात्मविचार-प्रसारासाठी जीवन वेचण्याचा संकल्प डॉ. संप्रसादांनी सोडला. वडिलांकडून मिळालेला संपत्र अध्यात्म वारसा गेली पंचेचाळीस वर्षे ते समर्थपणे सांभाळीत आहेत.
डॉ. संप्रसाद विनोद हे एक अफाट, व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. खरे तर ते वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी. त्या विद्याशाखेतील एम. बी.बी.एस, एम. डी., पी. एच डी., डी. एससी या अत्युच्च पदव्या त्यांनी मिळविल्या असल्या तरी अन्य विषयांच्या व्यासंगाचे त्यांना वावडे नाही. त्यांच्या मनाची, बुद्धीची मशागत पूर्वीच झाली होती. अध्यात्म, तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी आयुर्वेद, मानसशास्त्र, परामानसशास्त्र यांचा अभ्यास केला. हा व्यासंग त्यांच्या हाती घेतलेल्या कार्याला पूरक व पोषकच ठरला. त्यांनी पौरस्त्य, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास केला. पातंजल योगशास्त्राचे चिकित्सकपणे संशोधन करून अध्यात्माशी त्याची सांगड घातली. आणि आपल्या कार्याची दिशा निश्चित केली.

अध्यात्म साधनेसाठी डॉ. संप्रसादांनीही वडिलांसारखी भ्रमंती केली. डोंगरदर्यातील आश्रम धांडोळले. समर्थ सदुरूंचा शोध घेतला. १९४४ साली श्रीक्षेत्र ‘सिद्धाश्रम मठा’त महर्षी यांचे शिष्य पू. अनिरुद्धाचार्य महाराजजी यांचेकडून त्यांना ‘ श्री बीजाक्षर विद्या’ प्राप्त झाली. श्रीगुरूंवरील अढळ भक्ती व ब्रध्देने त्या विद्यद्येचे अनुसरण करून त्यांनी पिंडातील ब्रहमांडा’ चा शोध घेतला, विश्वात्म ईश्वराचे आपल्या ठायी असणारे अधिष्ठान त्यांना गवसले. स्वरूप बोधाचा हा अनुभव इतरांनाही द्यावा यासाठी व्यासपूजा महोत्सवाच्या मध्यरात्री सामूहिक संकल्प आणि – निर्विकल्प समाधीचा महर्षी विनोदांनी सुरू केलेला तांत्रिक प्रयोग डॉ. संप्रसाद विनोदांनीही चालू ठेवला.
महर्षी विनोदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या पत्नी डॉ. अनुता विनोद यांच्या साहाय्याने १९८३ साली महर्षी विनोद रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. पातंजल योगशास्त्रावर -आधारित उपचारपद्धती संशोधित केली.
भौतिक सुखाच्या मागे लागून दुःखी होणार्या आजच्या बहिर्मुख समाजाला अंतर्मुख करून स्वरूपानुभवाचा आनंद मिळवून देण्याचे आव्हानात्मक कार्य त्यांनी हाती घेतले. अध्यात्माचा योगाशी अतूट संबंध आहे, त्या मार्गाचे समर्थ – गुरूकडून मार्गदर्शन झाल्यास केवळ दुःखातून मुक्ती नव्हे तर अक्षय आनंदप्राप्ती होऊ शकते.
योगोपचार पद्धतीने असाध्य ते साध्य करता येते हे डॉ. संप्रसादांनी सिद्ध करून दाखविले. ‘शवासनातून ध्यानाकडे’ ही अपूर्व ध्यानपद्धत त्यांनी विकसित केली. या समर्थ पद्धतीचे ते आद्य प्रणेते मानले जातात.

डॉ विनोद गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे ते योगाच्या प्रचारकार्यात मग्न आहेत. पातंजल योगशास्त्रावर त्यांनी केलेले चिंतन, लेखन व प्रयोग आता सर्वज्ञात झालेले आहेत. अध्यात्म योगाच्या समन्वयातून त्यांच्या प्रतिभेने नवे नवे प्रयोग केले. अध्यात्म म्हणजे नुसते कर्मकांड नव्हे. ‘अधि-आत्म’ म्हणजे स्वतःच्या जवळ जायला शिकविणारी विद्या आणि योगेन आत्मदर्शनम् ।’ या वृहत् याज्ञवल्क्य स्मृतीतील वचनाचा अर्थ योगाने स्वरूपाचे ज्ञान होते’ या विचारांची ओळख जगभरातील आपल्या अनुयायांना, विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिली. हे कार्य महनीयच म्हटले पाहिजे. मी त्यांना प्रयोगशील प्रज्ञावंत मानतो.
या प्रयोगाची, विचारांची नवता आणि मौलिकता सांगण्यासाठी त्यांनी देशविदेशातील शेकडो विद्यापीठातून, आकाशवाणीवरून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांतून हजारो व्याख्याने दिली. त्यांची बीजभाषणे, मुख्य वक्ता म्हणून दिलेली व्याख्याने ऐकणे ही श्रोत्यांना एक पर्वणीच वाटत आली आहे. ऐकणारांच्या कानाला जिभा फोडणारी, सहजपणे कानातून मनात अर्थी पोचविणारी त्यांची ओघवती वाणी खिळवून ठेवणारी अशी आहे. त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेने त्यांचा आत्मानुभक बोलका केला आहे.
डॉ. संप्रसादांचा लेखन प्रपंचही मोठा आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे, चिंतनशील स्फुटलेख संग्रहांचे वाचकांनी भरघोस स्वागत केले आहे. प्रशंसा केली आहे. वाचकांना भावणाऱ्या भाषाशैलीमुळे आणि विषयाच्या मौलिकतेमुळे त्यांच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्याही निघाल्या. माझ्या वाचनात आलेल्या पूर्णत्वाचा शोध आणि बोध आणि योग आणि मन’ या लेखसंग्रहांतून त्यांच्या चिंतनाचा दर्जा आणि पोत मोठा अस्सल वाटला. अनुभवाचे बोल पाल्लहाळिक नसतात; नेटक्या शब्दांतून त्यांच्या शैलीचे वैशिष्टय आहे. विचार स्पष्ट असतील, चिंतन मूलगामी असेल तर त्याची अभिव्यक्तीही प्रवाही होणारच.
‘ATMA YOGA-GURU DR. SAMPRASAD VINOD सूत्रबद्धतेने ते अवतरतात. सुबोधता ही ललित साहित्याची त्यांची आवड लपून राहिलेली नाही. कोणतेही नवे ‘पुस्तक मिळाले की ते लगेच वाचून हातावेगळे करतात. त्यावर साक्षेपी भाष्यही तयार असते. माझ्या “सायंतना” या कविता संग्रहावर त्यांनी लिहिलेल्या विस्तृत रसोद्वाही अभिप्रायातून मला त्यांच्यातला साहित्याचा साक्षेपी समीक्षक आणि सहृदय रसिक वाचक दिसून आला.
आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण होताच पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्याचे टाळून समाजाचे दुःख निस्तरण्याचे, योग-अध्यात्म साधनेतून आत्मप्रत्ययाचा मार्ग दाखविण्याचे अभूतपूर्व अलौकिक कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाकार्याची विश्वभर दखल घेतली गेली आहे. विश्वशांतिदूत, आत्मयोग गुरू म्हणून त्यांचा विश्वाने गौरव केला आहे, देशविदेशातील प्रतिष्ठित संस्थांनी तीनशेहून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व ताकदीची ओळख करून देणारे आहे.
या दिगंतकीर्त योगियास नमन करून थांबतो. गुरवे नमः !

— लेखन : प्राचार्य सूर्यकांत वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800