स्वातंत्र्यपूर्व काळात, रत्नागिरी जिल्ह्यात, शैक्षणिक-सामाजिकदृष्ट्या विकासाची आत्यंतिक गरज असलेल्या कोकणी मच्छीमार समाजात जन्मलेल्या, स्वातंत्र्योत्तर पहिल्या दशकात, शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देणा-या पहिल्या पिढीचे शिलेदार, असे आय वाय सोलकर यांचे वर्णन समर्पक ठरेल !
आय वाय या नावानेच सुपरिचित असलेल्या सोलकर सरांचा जन्म रत्नागिरीला लागूनच, काजळी खाडीकिनारी असलेल्या छोट्याश्या सुंदर कर्ले गावात १५ जुलै १९३३ रोजी झाला. ज्या कोकणी मच्छीमार समाजात त्यांचा जन्म झाला, तो शैक्षणिक दृष्ट्या कोकणातील इतर अनेक समाजांप्रमाणेच तितकासा पुढारलेला नव्हता. उत्पनाचा मुख्य स्त्रोत समुद्र आणि खाडीतील मच्छीमारी तसेच त्यावर आधारित छोटे व्यवसाय अशी होती. त्याकाळात सर्वसाधारणपणे आयटीआय मधील एखादा ट्रेड करून कार्गो शिपवर सफरीला, नोकरीला जायचा ट्रेंड या समाजामध्ये प्रबळ होता. कष्टकारक आणि कुटुंबापासून दूर राहून अशा नोक-या करण्याचे कारण चांगला पगार हेही होते.
अशा त्या काळात आय वाय सोलकरांचे माध्यमिक शिक्षण, रत्नागिरीतील नामंकित शिस्तप्रिय अशा पटवर्धन हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाल्यामुळे त्यांना उर्दूबरोबर मराठी भाषेवरही प्रभुत्व मिळाले.
रत्नागिरीत गोगटे कॉलेजमुळे उच्च शिक्षणाची सोय होती. मॅट्रिक झाल्यावर आय वाय सोलकरांनी नोकरी करीत कष्टाने पुढील सर्व शिक्षण घेतले. ते बी.ए. तर झालेच पण त्याबरोबर शिक्षक म्हणून विविध ठिकाणी नोकरी करतानाच पुढील शिक्षणही त्यांनी चालू ठेवले. कॉलेजमध्ये प्रवेश घेताना इस्माइल हकिम यांनी केलेल्या आर्थिक सहकार्याचा आय वाय आजही नम्रपणे उल्लेख करतात.
पुढे उर्दू आणि पर्शियन मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असताना गोगटे कॉलेजमधील प्रोफेसर फकी यांचा ते अत्यंत आदराने उल्लेख करतात. किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनात विविध क्षेत्रात काम करताना आवश्यक असणारा, आत्मविश्वास मिळाला असे ते आवर्जून सांगतात.
सोलकर यांनी शिक्षकी पेशा स्वीकारल्यावर आधी बी.एड. आणि एम.ए. डीग्री प्राप्त केली. प्रो. फकी साहेब या त्यांच्या मार्गदर्शकाला खरतर त्यांनी डॉक्टरेट केली पाहिजे होती असे त्यांच्या आवाक्याकडे पाहून वाटायचे. आय वाय यांचे आई वडील मच्छीमार समाजातले, गरीबी असूनही, त्यांनी सतत उत्तेजन दिल्याचा उल्लेख करताना ते भावूक होतात. त्यांच्या समतोल साक्षेपी व्यक्तीमत्वाचा पाया अशा प्रकारे उच्च शिक्षणामुळे व्यापक आणि दृढ झाला. त्यांच्या पुढील सर्वस्पर्शी कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेताना ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.

उच्च शिक्षित व्यक्तींमध्ये अनेकदा आढळणारी आढ्यता सोलकरांमध्ये अजिबातच नाही. बोलक्या स्वभावामुळे, समाजातील सर्व वयाच्या, सर्व स्तरांच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची हातोटी त्याना लाभली आहे, हे सहजच जाणवते. अलिप्तता त्यांच्यामध्ये अजिबात नसल्याने ते समाजाशी कायम जोडलेले राहिले, हा त्यांचा गुण समाजातल्या इतर उच्चशिक्षितांनी घेतला पाहिजे. अजूनही कर्ले गावाविषयी प्रेम त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत भरलेले आहे. गावात चांगली प्रेक्षणीय स्थळे व्हावीत आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी सध्या चाललेले प्रयत्न स्वागतार्ह असून त्यामध्ये सर्व समाजाने सामील व्हावे आणि ते अधिक परिणामकारक पद्धतीने होउन कर्ले गाव स्वच्छ अन सुंदर व्हावे,असे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे.
त्यांची एकूणच कारकिर्द समजून घेतल्यावर अलिकडच्या भाषेत मल्टीटास्किंग म्हणतात त्याचा प्रत्यय सहजच येतो. आय वाय एकाच वेळी कर्ले गावचे सरपंच, मिस्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक, जिल्हा कॉन्ग्रेस कमिटीचे सदस्य, जिल्हा कॉन्ग्रेसचे जनरल सेक्रेटरी रत्नागिरी रेडक्रॉसचे संस्थापक सदस्य, डिस्ट्रीक्ट स्काऊट गाइड कमिटीवर काम असे विविध संस्थांवर कार्यरत राहिले. नेमस्तपणा, वक्तशीरपणा, जनसंपर्काची हातोटी, हाती घेतलेल्या कामाला न्याय देण्याची तळमळ यामुळेच आयवाय यांना अशा प्रकारे कार्यक्षमरित्या कार्यरत रहाता आले.
कर्ल्याचे सरपंच म्हणून त्यांची एकूण बारा वर्षाची कारकिर्द गावाच्या विकासात महात्वाची आहे. सुरूवातीला एकोणिसशे एकोणसाठ ते साठ अशी दोन वर्षे, आणि एकोणिसशे अडुसष्ट ते अठ्ठ्यात्तर अशी सलग दहा वर्षे अशा सरपंचपदाच्या कारकिर्दीमध्ये १९६० मध्ये गावात वीजजोडणी ,१९७१ मध्ये टेलिफोन जोडणी, १९७८ नळपाणी योजना या गावाच्या पायाभूत सुविधा ठळकपणे नोंदता येतात. त्याचबरोबर कर्ले जुवे बंधारा सुद्धा याच काळात बांधण्यासाठी त्यांचे योगदान होते. या कामगिरीसाठी ते त्यांचे स्नेही जिल्हापरिषद राजकारणातील अग्रणी अशा राजाभाऊ लिमये यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्यानेच या महत्वाच्या योजना पार पाडता आल्याचे स्पष्टपणे सांगतात. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. राजाभाऊ लिमयांबरोबरचा त्यांचा स्नेह नव्वदीतही तितकाच मजबूत आहे. सार्वजनिक जीवनात मा. हसनैन, भाई सावंत, दादा सुर्वे, वसंत सुर्वे यांचा उल्लेख करताना माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे सोबत भेट झाल्याचे नमूद करतात.
हेडमास्तर म्हणून त्यांची २४ वर्षाची प्रदीर्घ कारकिर्द आहे. एव्हढ्या कालावधीसाठी मोठ्या पदावर राहून काम करीत असताना त्यानी विविध विषयावर लेखनही चालू ठेवले. कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी गीता मंडळ रत्नागिरी सारख्या संस्थेवर २९ वर्षे त्यापैकी २१ वर्षे तर चेअरमन पद संभाळणे हे समाजाच्या सर्व स्तरात स्वीकारार्हतेचे एकमेव उदाहरण असावे. राजीवडा विद्यार्थी सहायक समिती, विषेश कार्यकारी अधिकारी पद, रेड क्रॉस सोसायटीवर कार्य, आदी संस्थांवर काम करीत असताना ते गावाच्या संस्थावर, गावजमातीच्या कार्यातही तितकेच मन लावुन काम करीत राहिले आहेत.
लातूर भूकंपातही मदत जमविण्यात त्यांचा पुढाकार होता. अगदी थंडीत कुडकुडणा-या रस्त्यावरील गरीबांच्या अंगावर उबेचे पांघरूण घालण्याचा मानवातावाद त्यांच्या वृतीत आहे. साहित्य क्षेत्रात अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे ते मेंबर होते. आकशवाणीवरही त्यानी कार्यक्रम संचालकांबरोबर काम केले.
रत्नागिरी कारागृहातील कैद्यांसाठी त्यानी अनेक उदबोधक व्याख्याने दिली. पाठ्यपुस्तक मंडळाचा अनुभवही त्यांच्या जवळ आहे. सामाजिक सलोखा निरंतर रहावा, यासाठी ते शांतता समितीवरही कार्यरत होते. तसेच माध्यमिक हेडमास्तर संघटनेचे मेंबर, उर्दू माध्यमिक शिक्षक असोसिएशनचे ते चेअरमन राहिले आहेत. लेप्रसी हॉस्पिटलसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजनात ते सहभागी होत असत.गरीब विद्यार्थ्यांसाठी सहाय्यनिधी जमविण्यात ते पुढाकार घेत असत.महाराष्ट्र राज्य सी फूड एस्टिमेशन कमिटीवर अशासकिय सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभली होती. जनता अदालतीत ते खूप वेळा पॅनेल मेंबर होते. अशा प्रकारे विविध क्षेत्रात त्यांचा सहजतेने वावर होता, हे खचितच स्पृहणीय आहे.
सोलकरांच्या कर्तृत्वाची पोच पावती म्हणून त्यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार १९८६ मध्ये प्राप्त झाला आहे. या सर्व कारकिर्दी विषयी बोलताना ते भावनाप्रधान होतात. यशाचे पूर्ण श्रेय आई- वडील आणि खंबीर साथ देणा-या सुविद्य पत्नीला देतात. कर्ल्यातीलच मुकादम कुटुंबातील माहेरवाशीण असलेल्या अजिजा इस्माइल सोलकर मॅडम प्राथमिक शिक्षिका होत्याच, पण विशेष म्हणजे त्या कर्ले गावातल्या मच्छीमार समाजातील पहिल्या एसेसस्सी महिला आहेत. सहाजिकच त्यांची चारही मुले उच्च विद्याविभूषित आहेत. मुलगा मरीन इन्जिनियर असून सध्या चिफ इंजिनीयर पदी कार्यरत आहे. एक मुलगी अमेरिकेत एम एस्स इन कॉम्प्युटर असून बॅन्केत असि. मॅनेजर आहे , तर दोन मुली एम ए. बी एड असून पुरस्कारप्राप्त शिक्षिका आहेत.
रत्नागिरीतील कर्ले गावातील असे, कर्तृत्ववान, निगर्वी व्यक्तिमत्व, असलेले माननीय आय वाय सोलकर एकाण्णवाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. समाजाचे सर्व स्तरातून त्यांचेवर अनेकोत्तम शुभेच्छांचा वर्षाव होत आहे !! ते शतायुशी होवोत, त्यांना दिर्घायू आरोग्य लाभो हीच शुभेच्छा !!

— लेखन : राजीव लिमये. कर्ले, रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सोलकर सरांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.