Wednesday, July 2, 2025
Homeयशकथाआदर्श डॉक्टर सचिन पाथरकर

आदर्श डॉक्टर सचिन पाथरकर

डॉ. सचिन पाथरकर हे नुकतेच एका राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. दि ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनानिमित्त दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या अतिशय महत्वाच्या कॉलेज ऑफ जनरल फिजिशियन या देशातील “सर्वोत्कृष्ट प्रोफेसर” अर्थात ऑनररी प्रोफेसर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी देशातून दहा डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. यात डॉ. सचिन यांचा समावेश आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर माननीय डॉ. जे. ए. जयालाल यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देऊन डॉ. सचिन यांना गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

ही मोठी अभिमानाची बाब आहे की, डॉ. सचिन आपल्या कर्तृत्वावर एवढ्या उंच पातळीवर पोहचले तरी सर्वांशी प्रेमाने, आदराने वागतात. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. हा त्यांचा विशेष गुण आहे

एका गावातूनच शिक्षणाची सुरुवात करून शालेय, महाविद्यालयीन, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त करून सामाजिक बांधिलकी जपत, राष्ट्रासाठी आपले योगदान देत नव्या पिढीला प्रेरणा, ऊर्जा व नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या उत्कर्ष, उन्नतीसाठी कसा करता येईल याची महती डॉ सचिन पाथरकर यांच्या कार्याने होते.

डॉ सचिन पाथरकर यांचा जन्म मराठवाड्यातील
बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे १ जुलै १९८० रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मौजे ग्राम पंचायत अंजनडोह येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, किल्ले धारूर येथेच झाले.

वडील

घरामध्ये शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नसताना, अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचे वडील श्री. अशोक त्रिंबकराव पाथरकर हे स्टेशनरी व्यवसाय करीत. आई सौ चंचला अशोकराव पाथरकर या उत्तम गृहिणी, त्यांचा बहुतांश वेळ घरकामात जात असे. तरीही त्या मुलाच्या शिक्षणात विशेष लक्ष देत होत्या.

आई

अशा परिस्थितीत शिक्षण घेण्याची त्यांची जबरदस्त इच्छा तर होतीच शिवाय त्यांची शिक्षणाची आवड पाहून शिक्षकांनी देखील विशेष लक्ष दिले व योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे दहावीची परीक्षा ते उत्तम गुणांनी पास झाले.

पुढे अकरावी, बारावी सायन्स साठी त्यांनी दयानंद सायन्स ज्युनिअर कॉलेज, लातूर येथे प्रवेश घेतला.
रात्रंदिवस अभ्यास करून, कठोर परिश्रम घेऊन १९९८ साली बारावीत ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले.

लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहणाऱ्या सचिन यांची मेरिटनुसार वैद्यकीय शिक्षणासाठी, मुंबईचे प्रसिद्ध कॉलेज टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बा. य. नायर धर्मादाय रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. साठी निवड झाली. सन २००२ साली त्यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली. येथेही त्यांनी आपल्या प्रयत्नांचा कस लावून कठीण परिस्थिती व आर्थिक अडचणी वर मात करून वैद्यकीय शिक्षण घेतले.

पुढील पी जी शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा मनोदय होता. परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सायले गावी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. हे साल होते २००५. या आरोग्य केंद्रात उत्तम सेवा बजावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला आणि थोड्याच कालावधीत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांना लोकांचे भरभरून आशीर्वाद मिळाले. योग्य उपचार पद्धती आणि योग्य मार्गदर्शन हे त्यांचे ब्रीद आहे !

म्हणतात ना देव नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो ! याची प्रचिती त्यांना आली आणि याच दरम्यान डॉ सचिन यांनी उराशी बाळगलेले पी जी स्पेशलायझेशनचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळाले. थोड्याच अवधीत पुढील शिक्षणासाठी अर्थात पी जी स्पेशायझेशनसाठी (एम.डी.) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथे मेरिट नुसार त्यांचा निवड झाली. येथेही त्यांनी जिद्द व चिकाटी च्या जोरावर २००८ साली एम.डी. (बायोकेमिस्ट्री) ही पदवी संपादन केली.

पुणे जवळील तळेगाव दाभाडे येथील एम आय एम इ आर (MlMER) मेडिकल कॉलेज मध्ये ते सन २००८ साली प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी २००८ ते २०१० पर्यंत सेवा दिली.

डॉ सचिन यांची घोडदोड चालूच होती. त्यांना नवनवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या. यातच त्यांनी ज्या ठिकाणी एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली त्या मुंबई येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बी.वाय.एल.नायर धर्मदाय रुग्णालयात ते सहयोगी प्राध्यापक (जीव रसायनशास्त्र विभाग) म्हणून २०१० साली रुजू झाले. आजतागायत ते इथेच कार्यरत आहेत. इथेही त्यांनी कर्तृत्वाची चुणूक दाखवून सर्वांची मने जिंकली.

मुंबईच्या या प्रसिद्ध कॉलेज व रुग्णालयात अध्यापनाचे कार्य करीत असताना त्यांना भरपूर आनंद मिळतो. देशाचे भावी डॉक्टर घडविताना घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत व परिश्रम अतिशय आनंदाने स्वीकारून ते उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा सुरुळीत पार पाडीत आहेत

त्यांची अध्यापनाची पद्धत अतिशय छान व सुंदर आहे. त्याच बरोबर त्यांचा विषयाचा सखोल अभ्यास यामुळे व्यवस्थापन व विद्यार्थी देखील खुश असतात. हे त्यांच्या अध्यापनाच्या यशाचे खरे गमक होय.

मला येथे सांगायला आनंद वाटतो की, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, डेप्युटी डीन (अतिरिक्त कारभार) या पदावर सर रिचर्डसन अँड कुडास जम्बो कोविड १९ केअर फॅसिलिटी भायखळा, बृहन्मुंबई महापालिका मुंबई या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे. तेथेही ते आपली सेवा उत्कृष्टपणे बजावत आहेत.

सध्या कारोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. अशा कठीण परिस्थितीतही न डगमगता त्यांनी उत्कृष्ट रुग्ण सेवा केली. ते कोरोना वॉरियर ठरले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुढील संस्थांतर्फे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

1) TNMC AND BYL NAIR CHARITABL HOSPITAL, MUMBAI
2) IMA Mumbai Branch
3) IMA Maharashtra State
4) NGOJeevan Prabhodini Trust Mumbai
5) Special Appreciation from BD India / South Asia
6 ) Corona warrior Appreciation from AAP party Mumbai

वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन वैद्यकिय महाविद्यालय व अनेक संस्थेकडून त्यांना प्रशस्ती पत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील वीस वर्षाचा अनुभव असून या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे बारा शोध निंबंध प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ सचिन यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई ब्रांचचे सहसचिव पदही भूषवले आहे. सध्या ते इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई ब्रांचचे कार्यालयीन सदस्य असून सदस्य, मॅनेजिंग कमिटी या पदावर कार्यरत आहेत.

या शिवाय विविध राज्यातील विद्यापीठात परीक्षक म्हणून ते काम करीत असतात.

अशा रीतीने वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावत देशसेवेसाठी देशाचे भावी डॉक्टर घडविताना किंबहूना राष्ट्रासाठी ते उत्तम योगदान देत आहेत.

या शिवाय डॉ सचिन मुंबई व उपनगर परिसरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत हिरारीने भाग घेत असतात. या स्पर्धेतही त्यांना अनेक प्रशस्तीपत्र मिळाली आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ही त्यांचा मोठा सहभाग असतो.

लातूर येथील प्राचार्य बी. मैदर्गे यांची कन्या शीतल यांच्याशी डॉ सचिन २००७ साली विवाहबद्ध झाले. त्याही उच्च शिक्षित असून, वैद्यकीय व्यवस्थापन हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांचीही त्यांना उत्तम साथ लाभली आहे. त्यांना शरणयक व शर्विल अशी दोन मुले आहेत

अशा या अनमोल हिऱ्याचे, आदर्श डॉक्टरांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

दीपक जवकर

– लेखन : दीपक जवकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४