अर्थ जर्नालिझम नेटवर्क या संस्थेच्या मदतीने हा लेख प्रा. डॉ. राधेशाम जाधव, साहाय्यक संपादक यांनी हिंदू बिझनेस लाईन मध्ये लिहिला आहे. प्रा डॉ किरण ठाकूर, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, सेंटर ऑफ कम्युनिकेशन फोर डेव्हलपमेंट यांनी मराठी भाषांतर केले आहे……
महाराष्ट्रातील कित्येक लहान मोठ्या गावांमध्ये वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित होईल अशा नोटिसा सरपंचाना दिलेल्या आहेत. थकबाकी सारखी वाढतेच आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड यांची एकूण थकबाकी ७३१७९ कोटी रुपयांपर्यंत थकली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी कंपनीचा आटापिटा चाललेला आहे. वीज ग्राहकांची आंदोलने ठिकठिकाणी चालू आहेत. “आमची थकबाकी माफ करा‘ किंवा निदान “टप्प्याटप्प्याने बिल द्यायची सवलत द्या” अशा प्रकारच्या मागण्यांचा जोर राज्यात अनेक वाढला आहे.
पण सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी येथे मात्र वेगळी परिस्थिती आहे. “आम्हाला मोफत वीज द्या” किंवा “सवलत द्या” अशी इतर गावांप्रमाणे आमची मागणी नाही, असे संगीता पाचपुते सांगतात. मान्याची वाडीने उलट आम्हाला वीज मंडळाकडून वीज नकोच, वीज निर्मिती बाबत आम्हाला पूर्णपणे स्वावलंबी व्हायचे आहे अशी भूमिका घेतली आहे. आम्ही ५०% टप्पा तर पार पाडला आहे. आता आम्हाला १०० % वीज निर्मिती करण्याचे लक्ष्य गाठायचे आहे असे संगीता ताई गावाच्या बैठकीत म्हणतात. बैठकीला उपस्थित सर्वांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे हे स्पष्टपणे दिसते.
“रात्रीचा अंधार हा जणू आमच्या पाचवीला पुजला होता… आमच्या घरात रात्री वीज आलेली आम्ही लहानपणापासून कधी पाहिलीच नाही. दिवसा केव्हातरी थोडा वेळ वीज यायची,” अशी आठवण गीतांजली पाटील सांगतात.
आमच्या वाडीत वीज नाही, रस्ते नाही, प्यायचे पाणी पुरेसे नाही, असे चित्र होते. त्यामुळे गावच्या मुलाशी लग्न करायला कोणतीही मुलगी तयार होत नसे.
दहा एक वर्षांपूर्वी गावकरी एकत्र आले आणि यातून काहीतरी वाट काढलीच पाहिजे असा निर्धार केला. वीज प्राथमिक गरज आहे असे सगळ्यांनी एकत्रितपणे ठरवून कामाला सुरुवात केली. नेतृत्व महिलांनी केले, असे सरपंच रवींद्र मोरे सांगतात.
कोणत्या प्रकारची वीज आपण वापरावी ? यावर ग्रामसभेत चर्चा झाली. नंतर तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली. सर्वानुमते सौर ऊर्जा हा पर्याय निश्चित झाला. मान्याची वाडी आता “सौर ग्राम” झाली पाहिजे हे ठरले.
सुरुवात रस्त्यावरच्या दिव्यापासून करायचे ठरले. गावच्या तरुणांनी एका व्यावसायिक कंपनीची निवड केली. प्रत्येक घराला सौर ऊर्जेचे एक युनिट द्यावे हा निर्णय झाला. एका युनिटला ५७०० रू. रुपये खर्च येईल असा अंदाज आला.
गावकऱ्यांना ही रक्कम अर्थातच फार मोठी होती. थोड्याशा शेतीवर पोट असणारे हे सर्व गावकरी. एवढी मोठी रक्कम कुठून आणणार ? मग महिला बचत गटांनी मदत करायची तयारी दर्शवली. ग्रामपंचायतीने हातभार लावला. काही गावकऱ्यांनी देखील आपला वाटा दिला.
एका सौर ऊर्जा युनिटसाठी वीस व्हॅट, दोन बल्ब, सोलर पॅनल, बॅटरी इत्यादी गोष्टी लागतात. ही सारी जुळवाजुळव काही दिवसात पूर्ण झाली. सूर्याची वीज गावी आली. त्याचा फायदा काय झाला ?
आपला स्वत:चा घराचा विजेचा खर्च सत्तर टक्क्यांनी कमी झाला. वाडी च्या रस्त्यावरचा विजेचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला, असा अनुभव ग्राम पंचायतीला आला. गावातील एक दूध डेअरी आणि शाळा देखील सौर ऊर्जेचा वापर करायला लागले आहेत.
“आता पाचेक वर्ष होत आली आहेत. आम्ही घरामध्ये सौर बल्ब वापरू लागलो आहोत. लोड शेडींग हा शब्द विसरलो आहोत” असे नमूद करून सर्जेराव माने सौर ऊर्जेवरील उपकरणांचा वापर आपल्या आपल्या घरात कसा होतो हे कौतुकाने सांगतात.
मुलांना अभ्यास करायचा असेल तर एक यंत्रणा आणि इतर सर्व कामासाठी वेगळी यंत्रणा असं ढोबळ मानाने सांगता येईल.
“माझ्या वीज मंडळाचे देखील कनेक्शन आहे. ते आम्ही रेफ्रिजरेटर आणि मिक्सर, ग्राइंडर यासाठी वापरतो. पण लवकरच यासाठी सुद्धा सौर ऊर्जेचा वापर आम्ही करू लागू याविषयी आम्हाला खात्री आहे, असे सर्जेराव सांगतात.
आपली वाडी शंभर टक्के सौर ग्राम करायचीच असा निर्धार आता गावकऱ्यानी केला आहे. शासनाच्या संस्था आणि खाजगी कंपन्या यांच्याशी बोलणी चालू आहेत. वीज मंडळाची वीज आम्हाला वापरायला लागू नये असे आम्ही ठरवले आहे असे रवींद्र माने म्हणतात.
तीन वर्षांपूर्वी वाडी ला नदीतून शेती साठी पाणी घेण्यासाठी तीन कि.मी. अंतरावर पाईप लाईन होती. पण अशा लिफ्ट साठी आत्ताची सौर यंत्रणा पुरेशी नाही. यावर काय उपाय करता येईल ? याचा आम्ही गावकरी विचार करत आहेत.
इतरही काही योजना गावाने यशस्वीपणे राबविल्या आहेत. उदाहरणार्थ भूमिगत पाणी नळ पुरवठा ही योजना. जैविक खताची निर्मिती ही दुसरी योजना.
राज्यातील ‘पहिले सौर ग्राम” म्हणून मान्याची वाडीने पारितोषिक पटकावले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील असे डझनभर मानसन्मान गावाने मिळविले आहेत.
“आमच्या गावातील मुले त्यांना हवे तेव्हा अभ्यास करू शकतात. कारण आमच्याकडे विजेची टंचाई नाही. आमची जीवनशैली खूप चांगली झाली आहे. ती खूप बदलली आहे. आम्ही ठरवले तर आम्हाला पाहिजे तसा बदल आम्ही करू शकतो. आमच्यातील प्रगती पाहण्यासाठी आसपासचे पाहुणे आमच्या वाडीला मुद्दाम येत असतात’ असे लता आसवकर म्हणतात.
सौर ऊर्जेच्या यंत्रणेची निगा राखण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या आसमंतात कदाचित आमचेच एकमेव गाव असे आहे की ज्याने वीज बिलाची माफी मिळावी अशी मागणी केलेली नाही.
वीजनिर्मितीच्या विविध पर्यायांमध्ये सौर ऊर्जा सर्वश्रेष्ठ आहे असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे .भारतामध्ये जवळपास २०५ ते ३०० दिवस सौर ऊर्जा उपलब्ध असते. ऊन प्रखर असते. वार्षिक किरणोत्सर्जन १६०० ते २२०० kWh/m2 असे असते.
उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात उपलब्ध असलेल्या ऊर्जा स्तोत्रात तुलना केल्यास ही ऊर्जा वार्षिक ६००० दशलक्ष GWh एव्हडी असते.
नॅशनल ॲक्शन फॉर क्लायमेट चेंज या संस्थेने मान्याची वाडीचे कौतुक केले आहे. भविष्यात सौर ऊर्जेचा मोठा वापर होण्याची क्षमता देशात आहे. यातूनच तळागाळातील जनतेला सक्षम करण्याची ची ताकत निर्माण होऊ शकते. मान्याची वाडी या छोट्याशा वाडीने दिशा दाखविली आहे. चारशे लोकसंख्येचे छोटेसे गाव जे करू शकते ते मोठे गाव आणि मोठे शहर देखील करू शकतात. छोट्या वार्डापासून सुरुवात केली पाहिजे असे या संस्थेने म्हटले आहे.
आपल्या यशाचे रहस्य काय ? असे या गावातील लोकांना विचारून पाहा. उत्तर काहीसे असे येईल.
“गावकऱ्यांची एकी, ग्रामसभेचा प्रभावी वापर, गावातील प्रत्येक सभासदाचा चर्चेत सहभाग, आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रबळ इच्छा ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत… विकासाच्या वाटचाली मध्ये राजकीय पक्ष आणि राजकारण न आणता काम केले पाहिजे. मुख्य म्हणजे महिलांचे नेतृत्व स्वीकारलं पाहिजे’
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सर्वनी आन्गीकारली पाहिजे अशी कल्पना आहे. सुंदर लेख.
अतिशय उत्तम व अभिमानास्पद उपक्रम आहे. एक लहानसे गांव एकजुटीने किती मोठे, यशस्वी प्रकल्प अंमलात आणू शकते यांचे हे गांव खुप मोठे उदाहरण आहे. सुर्याची भरपूर उर्जा भारतांत उपलब्ध आहे. त्याचा प्रत्येक गांवानेच नाही तर मोठ्या शहरांनी पण फायदा घ्यावा. माहितीसाठी देवेंद्रजींचे आभार मानते.
अतिशय आदर्श प्रकल्प..
खरोखरच गावकर्यांची एकी, गग्रामसभेचा प्रभाव ,प्रत्येक सभासदांचा सहभाग,विकासाच्या वाटेवर राजकीय पक्ष आणि राजकारण न आणल्यामुळे गावाचा होणारा कायापालट ही अत्यंत
प्रशंसनीय बाब आहे..