शिक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. आजची मुलं हेच तर उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे एका पिढीला घडवण्याचे अतिशय मोलाचे काम शिक्षक करत असतात.
आज आपला परिचय करून देणार आहे अशाच एका शिक्षिकेबरोबर ज्यांचा ३६ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा खडतर प्रवास त्यांना मुख्याध्यापिका पदापर्यंत येऊन पोहचला आहे. तर जाणून घेऊ त्यांची प्रेरक कहाणी….
सौ अल्पना ताई पालकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे ९ ऑगस्ट १९६६ रोजी झाला. आई सौ सुलोचना देवेंद्र सासवडे तर वडील देवेंद्र गणपती सासवडे हे आरे दूध डेअरीत कामाला होते. पण त्या अवघ्या अडीच वर्षाच्या असताना वडिलांचे छत्र हरपले.
अल्पनाताई यांचे काका श्री चंद्रकांत गणपती सासवडे यांनी त्यांना वडिलांची कधीही उणीव भासून दिली नाही. काकांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी घेतली. अल्पनाताई यांच्या आईचा बांगडीचा व्यवसाय होता. त्याही आईला मदत करत. त्यांचे आठवी पर्यंतचे शिक्षण वाई येथील नगरपालिकेच्या शाळेत झाले. आजी कॅन्सरने गेली म्हणून काका त्यांना सातारा येथे घेऊन आले.

आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी श्रीपतराव शाळा, करंजे येथे पूर्ण केले. अकरावी व बारावी त्यांनी एल बी एस कॉलेज मधून पूर्ण केले. डी.ए. रयत शिक्षण संस्थेचे जिजामाता कॉलेज मध्ये पूर्ण केले. त्यांनी बी ए ची पदवी मिळवली.
काका कडक स्वभावाचे असल्याने घरातील वातावरण अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांचे काका सातारा येथे लँड रेकॉर्ड खात्यामध्ये होते. काकांचा त्यांच्या पूर्ण कुटुंबाला खूप मोठा आधार होता. त्यामुळेच त्यांच्या दोन भावांचे व दोन बहिणींचे शिक्षण होऊ शकले. त्याचबरोबर काकांनी सर्वांच्या लग्नाची देखील जबाबदारी पार पाडली.
लहान वयातच अल्पनाताईं वर अनेक जबाबदाऱ्या पडल्या व त्यांनी त्या चोख निभावल्या. परिस्थितीने त्यांना अकाली प्रौढ केले. अनेक दुःखद प्रसंग घडले. त्यांचा भाऊ २२ वर्षाचा असताना गेला. मावशी सौ वनमाला चंद्रकांत सासवडे यांनी आईची भूमिका बजावली त्यामुळे जगायला व सर्व कठीण परिस्थितीचा सामना करायला त्यांना बळ मिळाले.

अल्पनाताईंनी धीर सोडला नाही. परिस्थितीचा सामना अतिशय धीराने व धैर्याने केला. शिक्षणाची यशस्वी वाटचाल केल्यामुळे १९८५ साली सातारा एज्युकेशन सोसायटीच्या हत्तीखाना शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
हत्तीखाना ही ऐतिहासिक वास्तू शाहू महाराजांच्या काळापासून आहे. तेथे पूर्वी हत्तींच्या रहाण्याची सोय होती. आज तेथे धान्याची कोठारे व पाण्याचे हौद पहायला मिळतात.
अल्पनाताई अतिशय शांत, समंजस, प्रेमळ स्वभावाच्या असल्याने थोड्याच कालावधीत त्या सर्व मुलांच्या आवडीच्या शिक्षिका झाल्या.
१९८६ साली त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती
श्री दिपक रामचंद्र पालकर हे पुणे जिल्यातील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. उच्च व स्वतंत्र विचारसरणी असल्याने पतीने नेहमीच प्रोत्साहन दिले असे त्या आवर्जून सांगतात. तू हे करू शकते, तुला हे शक्य आहे त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण झाला हे केवळ त्यांच्या पतीमुळेच. सकारात्मक विचारसरणी असल्याने पतीने नेहमीच प्रत्येक क्षेत्रात त्यांचे मनोबल वाढवले त्यामुळे त्या सुत्रसंचलन देखील करू शकल्या. त्यांच्यातील धाडसी वृत्तीमुळे स्वभावातील परिवर्तन होऊ शकले हे पतीने वेळोवेळी दिलेल्या हिमतीने, सहकार्यामुळे.

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. अतिशय कोमल, निरागस मुलांना शिकवताना त्यांना खूप आनंद व समाधान मिळत होते. मुलांच्या विचारांमध्ये केवळ शिक्षक परिवर्तन करू शकतात व त्यांच्यामध्ये नवीन उमेद व जिद्द निर्माण करून त्यांचे भविष्य उज्जवल करू शकतात. त्यांचे प्रामाणिक काम पाहून शाळा व पालक दोघेही खूप खुश होते. दिवसेंदिवस मुलांची प्रगती होत गेली.
शाळेत त्या नवं नवीन उपक्रम राबवत होत्या. जसे की विज्ञान प्रदर्शन, गणेशोत्सव, विविध स्पर्धा, रांगोळी, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन वगैरे. उपक्रमात नावीन्य असल्याने मुलांचा सहभाग वाढत गेला व त्यांना नेहमीच उत्तम प्रतिसाद ही लाभला. ज्ञान दानाचे पवित्र काम त्या अतिशय प्रामाणिक पणे करत होत्या.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती एकत्रित कुटुंब असल्याने सर्वांची मने जिंकायला खूप कसरत करावी लागे कारण नोकरी व घरची जबाबदारी, चाली रिती, सण समारंभ अशी तारेवरची कसरत करत खूप कष्टाने, प्रेमाने व आपुलकीने त्यांनी सर्वांना आपलेसे केले.
लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. सुमित अतिशय हुशार होता. पुढे तो पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी आत्याच्या घरी रहात होता. तो ही अतिशय शांत व समंजस होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते. सर्व स्थिरस्थावर झाले होते. पण……..
नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुन्हा खूप मोठा आघात झाला. होत्याचे नव्हते झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा अचानक त्यांना सोडून गेला. त्याच्याशी नुकतेच बोलून झाले होते तो काही पुस्तक घेण्यासाठी गेला असताना पेट्रोल पंपावर थांबला असताना
फोन आल्यामुळे तो एका झाडाखाली बोलत असताना त्याला अचानक अटॅक आला. ब्रेन हॅमरेंज झाल्यामुळे तो जागेवरच गेला.
तरुण वयात, २३ वर्षाचा मुलगा जाण्याचे दुःख, आघात खूप मोठा आघात होता. कोणाचाही विश्वास बसणार नाही की असा चालता बोलता मुलगा अचानक गेल्याने
अल्पनाताई पूर्णपणे खचून गेल्या. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकानी तसेच शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी खूप धीर दिला. एक शिक्षक म्हणून त्यांचे कर्तव्य त्यांना खुणावत होते. त्यामुळे आभाळाएव्हढे दुःख बाजूला सारून अनेक मुलांसाठी त्या त्यांच्या आई झाल्या व शिक्षणाचा वसा अविरतपणे पार पाडू लागल्या.

ही लहान मुलं म्हणजे त्यांच्यासाठी प्राणवायू होता. मुलांमध्ये रमणाऱ्या अल्पनाताई या ज्ञान दानाचे पवित्र काम गेली ३६ वर्षापासून करत आहेत.
अल्पनाताईंनी शिक्षकांसाठी असणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी, जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच पालक मेळाव्यात देखील त्या पालकांना मार्गदर्शन करतात.
विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना उतुंग भरारी घेताना पहाणे हाच त्यांच्यातील शिक्षिकेसाठी अनमोल क्षण असतो. आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत. त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आज त्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक झाल्या आहेत. कामात व्यस्त राहिल्याने, लहान लहान मुलांमध्ये रमल्याने त्यांचे दुःख कमी होऊ शकले असे त्या सांगतात.
काका हेच त्यांचे प्रेरणास्थान आहेत. आपले कर्तव्य चोख निभावने ही शिकवण काकांकडून मिळाली. त्यामुळेच त्या उत्तम शिक्षिका होऊन मुख्याध्यापक पदापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकल्या. त्यांची परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे.
निसर्गात रमायला त्यांना खूप आवडते. तसेच फोटोग्राफी, शैक्षणिक व आध्यात्मिक वाचन करायला त्यांना खूप आवडते.
आज जेव्हा त्यांनी शिकवलेली मुलं भेटायला येतात, त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात, तुमच्यामुळेच आम्ही घडलो असे सांगतात तेव्हा त्यांना आत्मिक समाधान मिळते. आपली शिकवण योग्य झाली असे त्यांना वाटते. हाच खरा जीवनातील आनंद आहे असे त्यांचे मत आहे. मुलांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या साठी त्यांना भविष्यात काम करण्याची इच्छा आहे.
शाळेत काम करत असताना त्यांना अनेक पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ते पुढील प्रमाणे आहेत.
१) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले मंडळ, चिंचवड.
२) अण्णासाहेब राजेभोसले विद्यालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार.
३) महाराष्ट्र ऑलिंपियाड तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार.
४) सातारा नगरपालिका मंडळाच्या वतीने पुरस्कार.
५) महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार.
६) महाकालिका देवी ट्रस्ट सातारा वतीने कासार भूषण महिला पुरस्कार.
७) समर्थ रामदास स्वामी संस्थानतर्फे ‘दासनवमी ‘ निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक.
८) भगवतगीता ९ व १२ अध्याय पाठांतर स्पर्धेत पुरस्कार.
ज्ञानाचे भांडार खूप मोठे आहे व ते कधीही वाया जात नाही असा लाख मोलाचा संदेश ते मुलांना देऊ इच्छितात. मोबाईलचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी करावा. कष्टाला कोणताही पर्याय नाही व सहनशीलता हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे व आपल्या प्रामाणिक कामातून व उत्तम कृतीतून उत्तर दिले पाहिजे, अशी त्यांचे मुलांना सांगणे असते.
अशा या अल्पनाताई केवळ आदर्श शिक्षिकाच नव्हे तर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आजीवन उत्तम शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उत्तम कार्य केले व करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अल्पना पालकर या माझ्या नणंदच नाहीत तर त्या माझ्या चांगल्या मैत्रीण ही आहेत
त्यांचे आतापर्यंतचे प्रवास वर्णन वाचून थोडे भावनिक झाले आणि अभिमानाने ऊरही भरून आला. त्यांची त्यांच्या कामाप्रती निष्ठा, परिश्रम हे आम्ही अगदी जवळून पाहिलंय त्याचेच फळ म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात
तुम्हाला यश, उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नमस्कार 🙏, सर्वात प्रथम रश्मी ताई हेडे यांचे मनापासून आभार मानतो माझी बहीण अल्पना ताई विषयी आपण जे काही लिहिलं आहे ते खरोखर अभ्यास पूर्ण आहे
आम्हाला सर्व भावांना अभिमान वाटावे असेच कर्तृत्व आहे आमच्या बहिणीचे आणि हे सर्व अतिशय जिद्दी ने शांत पणे कोणाला ही न दुखावता तिने मिळवले आहे परमेश्वर तिला संपूर्ण आरोग्य सुख आणि शांतता पूर्ण आयुष्य देवो हिच प्रार्थना
अल्पनाताई पाकर यांची जीवनकथा वाचल्यावर एक जाणवते की ,समस्यांचा निडरपणे सामना करणार्यांना जगण्याचा मार्ग
सापडतो.