जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बिकट परिस्थितीतील एखादी महिलाही किती प्रगतीपथावर जाऊन स्व:तचे विश्व निर्माण करू शकते, याचं एक
उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श शिक्षिका सौ सीमा सोमनाथ मंगरुळे तवटे या होत.
सावित्रीबाईं फुले यांचा वसा जपणाऱ्या सीमाताईंची प्रेरक कहाणी…….
सौ सीमा सोमनाथ मंगरुळे (तवटे) यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभार गावात २३, मार्च १९७० रोजी झाला. आई सुशीलाबाई शांताराम तवटे तर वडील श्री शांताराम पिलोबा तवटे यांचा बांगडीचा व्यवसाय होता. त्यावेळी शिक्षणाला एवढे महत्व दिले जात नसे. मुलीचे लग्न करून जबादारीतुन मुक्त व्हावे असे पालकांना वाटत असे. सीमाताईंना तर आठवी पासून स्थळ येण्याची सुरवात झाली. मात्र त्यांना शिकायचे होते. समाजात स्वतःचे अस्तिव निर्माण करून स्वावलंबी आयुष्य जगायचे होते. अशी अनेक स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी लग्नाला विरोध केला. त्यांच्या काकांनी म्हणजे श्री रमेश मारुती तवटे यांनी पुढाकार घेऊन सीमाताईंच्या शिक्षणासाठी पैशाची मदत केली. त्यामुळे कमला नेहरू कॉलेज कराड येथून सीमाताईंनी डी.एड.ची पदवी प्राप्त केली.
केवळ डी एड ची पदवी प्राप्त करून न थांबता
सीमाताईंनी अतिशय जिद्दीने अनेक अडचणींचा सामना करत काकासाहेब चव्हाण विद्यालय तळमावले, येथे रोज पाच ते साथ किलोमीटर पायी जाऊन बी.ए. ची पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच त्यांचे नोकरीसाठी प्रयन्त सुरू होते.
आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. वृत्तपत्रात जाहिरात वाचली, एका डोंगराळ भागात जाणीव जागृती संस्था गिरीजा शंकरवाडी तालुका खटाव येथे सोशल वर्कर ची गरज होती असे समजले. घरातून विरोध होता. मात्र त्यांनी हिंमतीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
त्या वेळी मोठया बहिणीने म्हणजे सौ शोभा दत्तात्रय वजरीणकर यांनी घरात थोडे समजून सांगितले व तिच्या मदतीने कामाचा श्री गणेश केला. वयाच्या २० वर्षी तात्या पिसाळ म्हणून एका काकांच्या घरी त्यांच्या कुटुंबासोबत त्या राहू लागल्या. गावाचा विकास कसा करावा, कोणते काम करावे याचे धडे त्या घेत होत्या.
तळे करायचे, त्याची देखरेख करायची, झाडे लावायचे, गावाच्या प्रगतीसाठी असे अनेक लहान मोठी अनेक कामे त्यांनी केली. या अनुभवाच्या शिदोरीतून रोज ज्ञानात भर पडायची व त्याचा मोबदला ही मिळत असे. महिन्याला मिळणाऱ्या 3 ते ४ हजार रुपये म्हणजे त्यांना व कुटुंबाला खूप मोठा आधार होता.
डोक्यावर कर्ज होते. रहायला घर नव्हते. त्यावेळी सीमा ताईंनी स्वखर्चाने गावी घर बांधण्यासाठी हातभार लावला. मोठया दोन्ही बहिणींची लग्न झाली. दोन भाऊ देखील होते. एवढा मोठा प्रपंच बांगडीच्या व्यवसायावर चालणे शक्य नव्हते. पण आता सीमाताईंनी खूप मोठी जबाबदारी घेतली होती. ते गाव अतिशय दुर्गम होते. फारशी सोय नव्हती. तिथे त्यांनी दोन वर्षे काम केले.
सीमाताईंनी हार न मानता, आपली आवडती शिक्षिकेची नोकरी शोधण्याचे प्रयत्न सतत चालू ठेवले होते. शेवटी त्यांना यश मिळाले व भैरवनाथ विद्यालय चोराडे, तालुका खटाव या गावी त्यांना नोकरीची संधी मिळाली. हिंदी विषयावर प्रभुत्व असल्याने दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या शिकवू लागल्या. त्यांचा शिक्षणाला खऱ्याअर्थाने न्याय मिळाला. अनेक वर्षांचा संघर्ष, चिकाटी, जिद्दीची जणू ती पावती होती.
त्यावेळी मुलींना खूप मोठा हुंडा मागितला जाई. त्यामुळे अनेक स्थळे हातातून गेली. या एकमेव कारणाने त्यांना शिकलेले स्थळ मिळाले नाही. पुढे अंबवडे गावातील स्थळ सांगून आलं. श्री सोमनाथ परशुराम मंगरुळे जे एका बँकेत पिगमी एजंट होते, आधुनिक विचारसरणी व स्वभाव चांगला आहे हे समजल्यावर त्यांनी होकार दिला. १९९५ साली त्यांचे लग्न झाले.
पुढे १९९६ साली त्यांना मुलगा झाला. त्यामुळे मुलाची व कुटुंबाची जबाबदारी पडल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. दोन वर्षे त्या घरीच होत्या. पुढे १९९८ साली उत्कर्ष मंडळाची नूतन प्राथमिक शाळा वडूज येथे त्यांनी इंटरव्ह्यू दिला. अनुभव पाहून त्यांना संधी देण्यात आली. खटाव तालुक्यातील ही अतिशय नावाजलेली शाळा आहे.
सीमाताई या शाळेतील पहिले ते चौथी पर्यंतच्या मुलांना सर्व विषय शिकवतात. शाळेत मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. जसे की आठवडी बाजार, वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तकातील गोष्टी सांगून त्यांना पुस्तक वाचायला ही दिले जातात. त्याच बरोबर स्नेह संमेलनाच्या वेळी मुलांना नुत्य शिकवले जाते त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो.
सीमाताईंनी शाळेत सर्वांच्या विचाराने एक अनोखा उपक्रम राबविला तो म्हणजे एक दिवस मुलांनी शाळा चालवायची. त्या दिवशी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापक बनतात. तेच शिकवतात व शाळाही चालवतात. तो दिवस मुलांसाठी अविस्मरणीय असतो कारण त्यांना अनेक अनुभव मिळतात. शिक्षकांना शिकवताना किती त्रास होतो व त्यांचे काम किती जिकरीचे, जबाबदारीचे व मोलाचे असते याची जाणीव होते.
या उपक्रमामुळे मुलांच्या स्वभावात सकारात्मक परिवर्तन होते व ते शिक्षकांचा मनापासून आदर करतात. स्वतःच जेव्हा आपण ते काम करतो तेव्हा त्याचे महत्व ही पटते व शिक्षक आपल्याला का रागावतात ? का ओरडतात ? का शिक्षा करतात ? याचे उत्तर मिळते. शिकवण्यामागे शिक्षकांची तळमळ जाणवते व शिक्षणाचे महत्त्व ही पटते.
गेली २३ वर्षे अविरत, प्रामाणिक काम करून सीमाताईंनी गावात व समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपली आवडती गोष्ट आपण करू शकलो याचा त्यांना मनस्वी आनंद आहे. त्यांनी स्वकष्टाने स्वतःचे घर बांधले आहे.
पतीचे स्वतंत्र विचार व सक्षम सहकार्य व साथ असल्याने त्या सर्व क्षेत्रात काम करू शकते असा आवर्जून उल्लेख त्या करतात. योग्य जोडीदार मिळाल्यामुळे त्यांची प्रगती होत गेली, त्याबद्दल त्या स्वतःला खूप भाग्यवान समजतात.
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील त्यांनी ऑनलाईन क्लास घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. याची योग्य दखल साधना साप्ताहिकाने घेतली.
कोरोनाच्या काळातील वेळ वाया जाऊ न देता त्यांनी आपल्या कविता लिहिण्याचा छंद जोपासला. सिमाताईंच्या कविता अतिशय हृदयस्पर्शी असतात.
सीमाताईंचा पहिला कविता संग्रह ‘अंतरंग’ नुकताच साताऱ्यातील नगर वाचनालयात प्रकाशित झाला. त्याबद्दल अनेक मंडळांनी त्यांचा सत्कारही केला.
“अंतरंग” या काव्यसंग्रहासाठी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार ही त्यांना उस्मानाबाद येथे खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्याकडून प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर राज्यस्तरीय गुणिजन नारी रत्न पुरस्कार हा मनुष्यबळ विकास संस्था, मुंबई यांच्याकडून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्यासाठी जाहीर झाला आहे.
सीमाताईंचा सामाजिक कार्यात ही सक्रिय सहभाग असतो. गावात जेव्हा दिंडीचे आगमन होते त्यावेळी स्वखर्चाने त्या जेवण देतात. गोरगरिबांना आवर्जून मदत करतात. जेव्हा आपण स्वतः गरिबी पाहिलेली असते तेव्हाच त्याची जाणीव असते. पडत्यावेळी गरजवंतांना त्या स्वखुशीने आपल्या परीने होईल तेवढे सहकार्य करतात.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश देतात. त्यांच्या पुढाकाराने काही लग्नही जुळली आहेत.
लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड आहे. अजूनही समाजसेवा करण्याची त्यांची इच्छा असून भविष्यात अनाथ आश्रम काढण्याचा त्यांचा मानस आहे. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या सीमाताईंच्या आदर्श आहेत व प्रेरणास्थान आहेत.
सीमाताईंचा मुलगा शुभम हा मेकॅनीकल इंजिनिअर असून पुण्यातील रिलायन्स कंपनीत आहे. तर मुलगी शिवानी ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांना आदर्श माता म्हणून गौरविण्यात आले आहे.
सीमाताईंना तरुणांना असे सांगायचे आहे की आपल्या
आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. बचत करा. स्वावलंबी होऊन जिद्दीने व चिकाटीने आपले धैर्य पूर्ण करा. परमेश्वर संकट देतो तर तो वाटही दाखवतो. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवा व कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. लढा व जिंकूनही दाखवा.
अतिशय सकारात्मक विचारसरणी असलेल्या सौ सीमाताई या सर्व महिलांसाठी आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्य कौतुकास्पद आहे. सर्व क्षेत्रात त्या उंच भरारी घेत आहेत.
अशा या सदैव प्रयत्नवादी, आशावादी, हसतमुख व्यक्तिमत्वाला सलाम व पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सीमाताई तुमचे मनापासून अभिनंदन.दुर्दम्य इच्छा,जोडीला जिद्द चिकाटी,संघर्षाची तयारी यामुळे तुम्ही शिखर गाठले.
युवापीढीसाठी उत्तम आदर्शवत् व्यक्ती आहात तुम्ही