व्हाट्सएप समूह अनेक आहेत. पण या सम हाच !जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तीविकास मंच (साकव्य) समूह सदस्या, डॉ स्वाती घाटे यांचे या समुहाबद्दलचे हृद्य मनोगत अनेक समूह चालकांना, सदस्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल….
साकव्य च्या तृतीय वर्धापन दिनाचे निमित्त साधून मी आदरणीय श्री. पांडुरंगजी, विलासजी, माधुरीताई व सर्व साकव्यजनांना वंदन करते, मनापासून आभार व्यक्त करते व खूप खूप शुभेच्छा देते.
एकाची ही पुसटशी देखिल ओळख नसतांना, साकव्य मधे जुलै २०२० मधे मी थोडीशी अनपेक्षित पणेच जोडली गेले. आणि माझा बघता बघता कायापालट झाला. मी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत, जमेल तसं हौशीखातर स्वान्तसुखाय कविता रचीत असे. असा अनोळखी साहित्यिकांचा ग्रुप असतो हे ही मला माहित नव्हतं. पंचवीस वर्षं महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे मराठी संस्कृतीच्या प्रवाहाबाहेर असल्याची खंत देखिल कायम मनात सलत असे.
इथे आल्यावर गर्मजोशीने म्हणतात तसं स्वागत झालं. त्याच आठवड्यात एक काव्य स्पर्धा होती. त्यात मी कविता पाठवली. अगदी पहिल्यांदाच ..आणि तिला चक्क प्रथम पारितोषिक मिळालं. त्या स्पर्धेतील बावीस कवितांचं सुंदर परीक्षण ही परीक्षकांनी केलं होतं. माझी कविता प्रथम का हे ही विषद केलं होतं. एक सुरेख प्रशस्तीपत्रक ही मिळालं. माझ्यातील साहित्यिकाला, किंबहुना मलाच, असं भरभरून प्रोत्साहन मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्याने भारावून गेले, अंगावर जणू मोरपीस फिरलं.
आणि त्यानंतर असे प्रसंग वरचेवर येत गेलेत. माझं ज्ञान, साहित्याची समज व कस वाढवत गेलेत. आत्मविश्वास दुणावत गेलेत. इथे विविध साहित्यप्रकार हाताळण्याची संधी व मार्गदर्शन मिळाले. चिमुकल्या चारोळ्यांपासून अभंग, अष्टाक्षरी इतकंच काय, तर कधी ध्यानी मनी स्वप्नी ही नसलेली गझल लिहिण्यापर्यंत ची मजल मारली.
गझल कार्यशाळेसाठी तर पांडुरंगजींनी मला खूपच आग्रहाने बोलावून घेतले व हिंमत दिली. त्यांनी मला यासाठी योग्य समजले हा मला मोठा बहुमान वाटला व वाटतो. आता गझल कार्यशाळेला वर्षाच्या वर झालंय. तेथील विद्यार्थीदशा मला गझलविधाच नव्हे तर इतर ही बरीच जीवन कौशल्ये शिकविते आहे. त्यासाठी पांडुरंगजींचे व गझल गुरूवर्यांचे ऋण कधीच विसरणार नाही.
कविता सादर करण्याचा, परिक्षण करण्याचा, स्पर्धा आयोजित करण्याचा, कविकट्टयाचे अध्यक्षपद भूषविण्याचा असे अनेक नवनवीन अनुभव व सन्मान साकव्यवर घडोघडी लाभलेत. स्वत:च्या कवितांना गाऊन सादर करणं असो की इंग्रजीत कविता लेखन, कितीतरी गोष्टी पहिल्या वहिल्यांदा केल्यात. बुद्धीला चालना मिळाली. खूप काही शिकायला मिळालं. गद्यलेखनात देखिल, काव्य समीक्षा, आईमुलीचं नातं, प्रेमपत्र स्पर्धा, अलक लेखन अशा विविध उपक्रमांमधून मी नव्यानेच स्वत:ला ओळखू लागले. इतर मान्यवरांकडून खूप काही शिकत राहिले.
‘सुजाण पालकत्व’ या माझ्या पठडीच्या विषयावर व्यक्त होण्याची संधी पांडुरंगजींनी मला दिली, सविताताईंने मार्गदर्शन केले व स्वत: पांडुरगजींने जातीने त्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. हा साकव्यचा पहिला वहिला यू ट्यूब वरील कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला.
विलासजींनी ‘सुजाण पालकत्वा’ वर एक लेख माझ्याकडून लिहून घेतला व सामना सारख्या प्रतिष्ठित दैनिकात तो छापण्याची व्यवस्था केली. आपले खूप आभार, विलासजी.
साकव्य वर आल्यापासून गेले वर्ष सव्वावर्षात स्वत:वरच विश्वास बसणार नाही इतका उत्कर्ष झाला. नुसता साहित्याचाच नव्हे तर दृष्टीचा ही. पांडुरंगजीं सारखे नि:स्वार्थ व शांत, समंजस व्यक्तिमत्व मार्गदर्शक व पाठीराखे म्हणून लाभलेत. त्यामुळे कळत नकळत माझ्या व्यक्तिमत्वाच्या कक्षा रूंदावत गेल्या.
विलासजींची तळमळ व धडपड ही खूप प्रेरणादायी ठरली. त्यांच्याकडून व आमच्या गझल गुरूवर्यांकडून कुठल्याही कार्याला वाहून घेणे म्हणजे काय, याचे अमूल्य दर्शन झाले. महाराष्ट्राच्या विविध परंपरा, भाषांच्या छटा, संत साहित्यावर चर्चा, सांप्रतच्या साहित्यिक घडामोडी इत्यादींची समूहावर भेट झाली. मायभूमीशी नाळ पुन्हा जोडल्या गेल्याचे समाधान लाभले.
साकव्यवर सहजच समविचारी मंडळींशी सलोखा झाला, दूरस्थ असूनही जवळचे वाटणारे सहृद मिळालेत. या सर्वांतून हा करोनाचा कठीण काळ बऱ्याच प्रमाणात सत्कृत्यात व रचनात्मकतेत गेला. मनाची उभारी टिकून राहिली.
साकव्य वर दर रोज जणू दर्जेदार साहित्याचा बुफेच मांडला जातो. ज्याला जे हवं त्यानं ते घ्यावं, आणि ज्याला जे द्यायचं ते त्यानं द्यावं. बंधन फक्त एकच, ते व्यक्तित्व विकासाला पूरक असावं. म्हणजे, व्याप्तीच इतकी विशाल की, जगातील ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत’ असं सगळं महन्मधुर आपल्यापर्यंत पोचावं, आपलं जीवन मंगल व्हावं.
संचार माध्यमांच्या तोट्यांबद्दल आपण नेहमीच बोलत, ऐकत, वाचत असतो. पण या तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून जीवनात सकारात्मक बदल करण्याचा साकव्य सर्व सदस्यांना सुखद अनुभव देत आहे. त्याचे नादमधुर पडसाद त्यांच्या व त्यांच्या आप्तस्वकीयांवर असेच कायम पडत राहोत या शुभेच्छा.
समूह अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्री .विलास कुलकर्णी व समूह सदस्य श्री देवेंद्र भुजबळ यांच्या मुळे सदस्यांचे साहित्य जागतिक पातळीवर पोहचत आहे, त्यांचे खूप खूप आभार.
पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन अभिवादन व आभार मानते 🙏🙏

– लेखन :डाॅ. स्वाती घाटे, जयपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खुप छान माहिती व “साकव्य” ची संकल्पना भावली. धन्यवाद