भारतीय संस्कृतीत विविधता असून आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा मोठा आहे. १२ व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी समाजोद्धारक विचार दिले, ती मुल्ये अजूनही टिकून आहेत. सत्य, अहिंसा, मानवता, सद्भावना, सेवा ही मुल्ये भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आध्यात्मिक संस्कार यज्ञाच्या माध्यमातून विचारांचा प्रभाव समाजावर पडतो. तेथुनच समाज निर्मिती होते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथिल यात्रा महोत्सवात केले.
महानुभाव पंथ संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी ८०० वर्षांपूर्वी समाजाला विचार दिले, त्याचे अनुकरण आजही ३ टक्के मंडळी करीत आहे. पंथाच्या या संस्कारातून अनेकांनी जीवन वृद्धी केली. स्वामींनी सांगितलेली जीवनमुल्ये ही मोठी शक्ती असून लोकशिक्षण, लोकप्रबोधन या विचारांतून समाज निर्मिती होत आहे. मंदिरे ही आध्यात्मिक उर्जेची केंद्रे असून त्यांची जोपासना आवश्यक आहे.
श्री चक्रधर स्वामींच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात १६५० तीर्थक्षेत्रे निर्माण झाली, हा ऐतिहासिक वारसा आहे. तो जोपासने आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. मंदिरांमुळे समाजाचे सौहार्द टिकून राहते असेही गडकरी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर नाशिकच्या निफाड येथील भागवताचार्य महंत चिरडेबाबा, माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावणकुळे, आमदार ऍड आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर मेंघर, श्रीदत्त सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मेंघर, हरिहर पांडे उपस्थित होते.
श्रीदत्त जयंतीनिमित्त १६ डिसेंबरपासून सुरू असलेल्या आचार्य महंत चिरडेबाबांच्या श्रीमद्भागवत कथेचा समारोप झाला. दहा दिवसीय संगीतमय ज्ञानयज्ञात गीतेतील जीवनमुल्ये महंत चिरडेबाबा यांनी उलगडून दाखविली.
दहा दिवस भक्तिमय वातावरणात कळसारोहण, ग्रंथदिंडी, दहीहांडी, गोपालकाला, पंचअवतार उपहार, पालखी, महाप्रसाद असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. खासदार कृपाल तुमाने, मंत्री सुनील केदार, अरविंद गजभिये, पारशिवनी नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीसस्टेशन पदाधिकारी यांच्यासह राज्यातील हजारो मंडळीनी ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव जगदीश मोहोड़ यांनी केले, तर आभार अध्यक्ष सुधाकर मेंघर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमलाकर मेंघर, कोषाध्यक्ष महंत कृष्णराज बाबा कपाटे, रत्नाकर मेंघर, गंगाधर काकड़े, पांडुरंग मेंघर, दौलत खेरगडे, पांडुरंग मेंघर, रविंद्र ठाकरे, संदीप मेंघर, राहुल मेंघर यांनी परिश्रम घेतले.
– लेखन : हरिहर पांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800