सहा वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीचा सार, फेसबुक वर प्रसिद्ध झाला होता. त्याची आठवण आज फेसबुक ने करून दिली. हा सार पुढे देत आहे. सार लिहिणारे श्री श्याम टरके आणि फेसबुक चे मनःपूर्वक आभार.
— संपादक
ज्येष्ठ माध्यमकर्मी, प्रेरक वक्ते, लेखक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ यांची सह्याद्री वाहिनीवर ‘नमस्कार मंडळी’ कार्यक्रमात नेहा परांजपे यांनी १७ डिसेंबर २०१९ रोजी थेट मुलाखत घेतली.

खडतर प्रवासातून यशाकडे जाण्याची भुजबळ यांची जिद्द, चिकाटी, ‘आनंद घ्या, आनंद द्या’ हा त्यांचा जगण्याचा मूलमंत्र या मुलाखतीतून छान उलगडला. या प्रेरणादायी मुलाखतीचा हा शब्दबद्ध केलेला संपादित अंश…..
लहानपणापासूनचा प्रवास तसा काही सुखद,काही तापदायकच. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं. अनेक जण मला चिडवत. परंतु कालांतरानंतर म्हणजेच वयाच्या सहाव्या वर्षी मला बोलता येऊ लागलं, असे मुलाखतीच्या सुरूवातीलाच श्री. भुजबळ सांगतात. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा प्रवास उलगडत जातो. तो असा…

मेकॅनिकचा जॉब
भुजबळ यांचे मूळ गाव अकोला (सध्या ते मुंबईत असतात). अकोल्यात असताना शालेय जीवनातच त्यांनी कामाला सुरूवात केली. इयत्ता नववीत असताना केळकर गॅरेजमध्ये ते कामासाठी जाऊ लागले. कारण त्यांना मेकॅनिक व्हायचे होते. पैशांची गरज होतीच. मेकॅनिक झाल्यास लवकर पैसे मिळतील, असा त्यांचा त्यावेळचा समज. कामाला तर सुरूवात झाली. परंतु गॅरेज मालकाने काम दिले ते… गाड्या पुसण्याचे ! त्यानंतर गॅरेज मालकाशी भुजबळ बोलले. ‘मला मेकॅनिक व्हायचेय. पण मला गाडी पुसायला लावताय’, त्यावर गॅरेज मालक म्हणाले, ‘सहा महिन्यानंतर मेकॅनिकचे काम शिकवू.’ भुजबळ यांच्या पदरी निराशा पडली. परंतु त्यांनी हार पत्करली नाही. पुढचा पर्याय त्यांनी शोधला. गणेश तायडे या मित्राच्या सांगण्यावरून बिर्ला कंपनीत काम करण्यास सुरूवात केली.
दहावी नापास…तरीही पदवी…
लहानपणापासूनच भुजबळांना वाचनाची आवड. त्यामुळे वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके वाचण्याची सवयच लहानपणी लागली. मात्र प्रतिकूल परिस्थिती आणि विज्ञान, गणित या विषयांची नावड यामुळे ते दहावीत ते नापास झाले. नापास झाल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठलं. तिथे भावाकडे ते राहत. शिक्षण अर्धवटच होते. तेव्हा आई म्हणायची ‘पदवीधर हो…’. मग ऑक्टोबर १९७७ मध्ये ते दहावी पास झाले. पदवीचे शिक्षण पुणे, नगरला पूर्ण केले, तेही वेगवेगळ्या तीन महाविद्यालयातून.
टर्निंग पॉइंट !
नगरमध्ये असताना आम्हा मित्रांना सिनेमाला जायचे होते. त्यासाठी सर्वांकडून दहा रूपये एकत्र करण्यात येत होते. परंतु माझ्याकडे ते नव्हते. भावापुढे किंवा इतर कुणाकडे पैसे मागायचे नव्हते. वर्तमानपत्रातील जाहिराती पाहिल्या. त्यात पीए (स्वीय सहायक) पाहिजे, अशी एक जाहिरात होती. ती वाचून छगनसेठ बोगावत यांच्याकडे गेलो. तिथे नोकरी मिळाली. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत महाविद्यालय अन् त्यानंतर नोकरी करू लागलो, असे भुजबळ सांगतात.
पत्रकारितेचा कार्यानुभव
वाचन, लेखनाची आवड असल्याने पत्रकारितेकडे वळलो. नगरच्या दै. समाचारपासून पत्रकारितेला सुरूवात झाली. पदवीनंतर पुणे विद्यापीठात शास्त्रशुद्धपणे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. तिथे प्रा. ल. ना. गोखले पाठयवृत्तीचा सर्व प्रथम मानकरी ठरलो. नंतर केसरीमध्ये उपसंपादक झालो. केसरी प्रकाशनच्या साप्ताहिक सह्याद्रीसाठी शनि शिंगणापूरची कव्हर स्टोरी केली. मुंबई दूरदर्शनने ‘केल्याने देशाटन’, दूरदर्शनच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रसारणात ‘सफर’ या कार्यक्रमामध्ये शनि शिंगणापूर वर कार्यक्रम झाले. पत्रकारितेची पदवी, अनुभव आल्याने दूरदर्शनमध्येही नोकरी मिळाली. त्यावेळी सामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी कल्पकतेने काम केले. वरिष्ठांना नवपक्रमाबाबत सांगत गेलो. पत्रकारिता, दूरदर्शनमधील कामाच्या अनुभवाचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मोठा फायदा झाला. महासंचालनालयातही अशाच पद्धतीने काम केले, त्याचे समाधान असल्याचे भुजबळ म्हणतात.
परदेश दौरा आणि लेखन
शासनाच्या ‘लोकराज्य’मध्ये “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” या विषयावर संशोधनपर लेखन केले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्रकारितेवर संशोधनपर लेखन केले. दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढत हे केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा न उलगडलेला पैलू लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता’ या संशोधनपर लेखनातून केला. ऑस्ट्रेलियात झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य सम्मेलनात या विषयावर व्याख्यान दिले. सामान्य माणासाला केंद्रबिंदू ठेऊन ‘गगन भरारी’, ‘प्रेरणेचे प्रवासी’, ‘करिअरच्या नव्या दिशा’, ‘भावलेली व्यक्तीमत्त्व’ या विषयावर लेख व पुढे पुस्तकं लिहील्याचे मुलाखतीत श्री. भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळांचा संदेश
माध्यम क्षेत्रात दीर्घ काम केल्यानंतर एक माध्यमकर्मी म्हणून ‘प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या माध्यमाची विश्वासार्हता जपावी.’ असा संदेश माध्यम क्षेत्रात काम करणा-यांना भुजबळ देतात. ‘छोट्या छोट्या गोष्टींवर निराश होऊ नका. नाऊमेद होऊ नका. कसोटीचे क्षण येतात, जातात. जिद्द आणि चिकाटीने अशा कसोटीवर मात करण्याचा अतोनात प्रयत्न करा.दिनचर्या नियमित ठेवा. नियमित व्यायाम करा.सकस आहार घ्या. रोज ध्यान धारणा करा., आपण असाल त्या धर्माची प्रार्थना रोज म्हणा. व्यसनाधीन न होण्याची दक्षता घ्या. “आनंदाने जगा, आनंदाने जगू द्या,” असा मोलाचा मुलमंत्रही भुजबळ देतात.
ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य पहा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा.
आपण भुजबळ यांना प्रेरक संवाद साधण्यासाठी जरुर बोलावू शकता. त्यांचा संपर्क असा : देवेंद्र भुजबळ –
email : devendrabhujbal 4760@gmail.com.
मो. क्र. : ९८६९४८४८००.

— शब्दांकन : श्याम टरके. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
