Friday, July 4, 2025
Homeलेखआनंदी पापाजी@79

आनंदी पापाजी@79

चरणजितसिंग उर्फ सर्वांचे आवडते पापाजी यांचा आज 79 वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या, त्यांच्या आनंदी जीवनाचं रहस्य….

काही जणं स्वभावनेच इतके आनंदी असतात की, त्यांना पहाता क्षणीच आपल्याला ही आनंद होतो. ती व्यक्ती परत परत भेटावी असं वाटत रहातं. असं एक सदा आनंदी व्यक्तीमत्व म्हणजे आमच्या सोसायटीतील चरणजित सिंग.

आम्ही त्यांना प्रेमाने पापाजी म्हणतो. उंच पुरे, धट्टे कट्टे, दुरूनच पाहिल्या पाहिल्या आनंदाने हात उंचावून जवळ येताच आस्थेवाईकपणे ख्याली खुशाली विचारणारे पापाजी भेटले की पुढे किती वेळ गप्पांमध्ये जातो, ते कळतच नाही.

एकीकडे काही व्यक्ती सतत चिंताग्रस्त दिसतात. त्याचवेळी पापाजी मात्र सदा आनंदी असतात म्हणून मग ठरवलं, त्यांच्या आनंदी असण्याचं रहस्य जाणून घेऊ या आणि आपल्याला ही सांगू या !

पापाजी आता नवी मुंबईत जरी स्थायिक झाले तरी इथे आले ते फिरत फिरत. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९४२ रोजी अखंड भारतातील रावळपिंडी येथे झाला. त्यांचे वडील भारतीय संरक्षण दलात होते. ४ मुलं, ६ मुली असा त्यांचा मोठा परिवार होता. पापाजी आठव्या क्रमांकावर होते. भावंडांपैकी आता ते एकटेच आहेत.

भारत १५ ऑगस्ट १९४७  रोजी स्वतंत्र झाला. पण फाळणी होऊन. साहजिकच पापाजींचे वडील रावळपिंडी सोडून जबलपूर येथे लष्करात
असलेल्या हवालदार आत्मासिंग या मोठया मुलाकडे सर्वांसह आले. त्यामुळे पापाजींचे बालपण, मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण जबलपूर येथेच झाले.

शाळेत असताना पापाजींना अभ्यासापेक्षा खेळांची फार आवड होती. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ. विशेष म्हणजे हे खेळ ते आजही आनंदाने खेळतात.

खेळाच्या आवडीमुळेच त्यांना १९६० साली मध्य रेल्वेत जबलपूर येथेच नोकरी मिळाली. ती नोकरी त्यांनी २ वर्षे केली. पुढे संधी मिळताच विसाव्या वर्षी लष्करात ते जबलपूर येथेच भरती झाले. भांडार व्यवस्थापक या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली.

बदली झाल्याने पापाजी जबलपूर येथून १९७६ साली मुंबईत आले. पत्नी अमरजीतकौर मुंबईच्याच. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेवेत होत्या. अत्यन्त समाधानाने पापाजी ३० सप्टेंबर २००२ रोजी ऑरडीनन्स ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले.

पापाजींनी नोकरीत मनापासून काम केले. खूप नाव लौकिक मिळविला. संपर्कात येणाऱ्या गरजू व्यक्तीना निरपेक्षपणे मदत केली. पापाजी निवृत्तीनंतर मुंबई सोडून नवी मुंबईत रहायला आले. इथे ते विविध क्रीडा उपक्रमात, जेष्ठ नागरिक संघात सतत सक्रिय असतात.

आपल्या आनंदाचं रहस्य काय ? असं विचारल्यावर पापाजी म्हणतात, गुरुबानीतील “करे करावे आप, मानूस के कुछ नही हाथ” या तत्वावर आणि चांगले कर्म केले की चांगले फळ मिळते, या सिध्दांतावर आपली नितांत श्रद्धा आहे.

खेळाची आवड असणाऱ्या पापाजींची आणखी एक आवड म्हणजे भांगडा नृत्य. संधी मिळाली की त्यांची पावलं थिरकायला लागतात ती सोबत असणाऱ्या व्यक्तीला घेऊनच. सारखं उद्योगी रहायची आवड असल्याने पापाजी सानपाडा गुरुद्वारात, सानपाडा जेष्ठ नागरिक संघात आपली सेवा देत असतात.

पापाजींचा दोन मुलं, सुना, नातवंडे असा आनंदी परिवार आहे. स्वतः आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या, असे मानणाऱ्या पापाजींना शतायुषी होण्यासाठी, आरोग्यदायी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments