Thursday, January 8, 2026
Homeलेखआपणच लिहिलेली शोकांतिका !

आपणच लिहिलेली शोकांतिका !

या शतकाचे पाव शतक संपत आले.स्वातंत्र्य मिळून तर पंचाहत्तर वर्षे झालीत.आपला सशक्त लोकशाही असलेला देश.आतापर्यंत विविध राज्यात, केंद्रात आलेल्या वेगवेगळ्या सरकारचे दावे खरे मानले तर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात फक्त विकासच केला !

या लोकशाही देशात आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी हे फक्त लोकसेवाच करतात. ते एकनिष्ठ आहेत आपल्या पक्षाशी, पक्षाच्या विचारधारेशी. त्यांच्या या विचार धारा सारख्या बदलतात.प्रत्येकाला काहीतरी नवे हवे असते सारखे. जुन्याचा पटकन कंटाळा येतो. लोकसेवक असल्याने प्रत्येकाला स्वतःचा ही विकास तितकाच महत्त्वाचा वाटतो. किंबहुना स्वतःचाच विकास जास्त महत्वाचा असतो राजकारणात. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. कोणत्याही स्तराला जायची तयारी. निवडणुका आल्या की होणारे तमाशे, उडणारी धुळवड, चिखलफेक आपण बघतोच. हे आक्का, भाई, दादा, बाहुबली काहीही करू शकतात. मारामाऱ्या, खून, खोक्याची देवघेव.. अगदी काहीही.. कसलेही खास उत्पन्न,कामधाम नसताना हे लोकसेवक लखपती, करोडपती कसे होतात याचा कुणीच शोध घेत नाही. आपल्या सुधारलेल्या लोकशाही, विकसनशील देशात ! हे नवलच आहे !!

आपण शिक्षण क्षेत्रात सुधारणेचे दावे करतो. गेली पाच वर्षे सारखे एन इ पी म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाचे ढोल पिटले जाताहेत. अगदी जागतिक विद्यापीठाशी स्पर्धा सुरू असल्यासारखी वातावरण निर्मिती केली जातेय. पण अजूनही अनेक शाळेत शिक्षक नाहीत. स्वच्छता गृहाची नीट सोय नाही. प्रयोगशाळा, संगणक, इंटरनेट सारख्या सुविधा नाहीत. महाविद्यालयात तर विद्यार्थीच येत नाहीत वर्गात. तरी निकाल छान छान लागतात. संशोधक विद्यार्थी कॉपी पेस्ट करून प्रबंध लिहितात. त्यावर मान्यतेसाठी सही करायला प्राध्यापक लाखो रुपये घेत असल्याच्या बातम्या येतात. खाजगी कॉलेजेसची तपासणी, प्राध्यापकाच्या नेमणुका, त्यासाठी होणारी लाखोची देवघेव हे सगळे आता उघडे गुपित झाले आहे. काही अपवाद वगळता कुलगुरू नेमणुकीत होणारा राजकीय हस्तक्षेप, मग अशा कुलगुरू पैकी काहींनी केलेला पैशाचा अपहार, त्याचे मीडियातील व्हिडिओ क्लिप याचीही आपल्याला सवय झालीय. अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या कुणाची चौकशी झाली, त्यांना शिक्षा झाली, त्याची पेन्शन थांबवली असे ऐकिवात नाही. ही भ्रष्टाचारी माणसे समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात.लोकांना द्यान पाजळायला मोकळे फिरतात !

आपल्याकडे आय आय टी सारख्या उच्च शिक्षण संस्थात सरकारच्या,जनतेच्या पैशाने शिक्षण घेऊन आपलेच होतकरू तरुण,हुशार विद्यार्थी जगाचे कल्याण करायला परदेशात जातात.अन् आपल्या आईवडिलांना इकडे एकटे सोडून तिकडचे च होऊन बसतात. यालाच देशसेवा म्हणतात.कारण ते म्हणे इकडे डॉलर्स पाठवतात. ज्यामुळे देशाचा विदेश निधी वाढतो.देश थोडा बहुत आर्थिकदृष्ट्या संपन्न होतो. आपण कोणत्याही गोष्टीकडे कोणती दृष्टिकोनातून बघतो त्यावर फायदे तोटे, चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरत असते.

आपले शालेय शिक्षण तर इतके छान छान झालेय की विचारूच नका. कॉन्व्हेन्ट, इंटरनॅशनल,ग्लोबल अशी नावे असलेल्या ,विस्तीर्ण वातानुकूलित कॅम्पस असलेल्या शाळांतील पहिली दुसरीची फी लाखो रुपये असते. म्हणजे इंजिनियरिंग शिक्षणापेक्षाही महाग ! पण इथेही लांब लाइन असते ऍडमिशन साठी.कुणीही काहीही प्रश्न न विचारता इथे मुलाना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. मुळातच व्यस्त पालकांना आजकाल फालतू चौकशा करायला वेळ नसतो. प्रत्येकापुढे कसल्या ना कसल्या डेड लाइन्स असतात. मोठमोठे टार्गेट्स असतात. त्यासाठी ते अग्निशमन दलासारखे फायर फायटिंग करीत असतात.

आता या देशात पूर्वीची कुटुंब व्यवस्था, नाती गोती, त्यातला लळा जिव्हाळा हे सगळे शोधून बघावे लागते. “कामापुरता मामा” अशी परिस्थिती आहे.लग्न संस्थेला तडे जात आहेत. छोट्या मोठ्या कारणाने होणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मुले मुली लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहायला लागली आहेत.तेही पालकांच्या संमतीने! चालू आहे ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही अशी एकूण परिस्थिती आहे.तरीही आम्हाला आमच्या संस्कृतीचा, संस्कृतिक वारसा जपण्याचा, मूल्ये जोपासण्याचा सार्थ अभिमान आहे.याला गणितात paradox म्हणजे विरोधाभास म्हणतात.

पर्यावरण,निसर्गाची जपणूक, प्रदूषण या सारख्या विषयाचे गांभीर्य तर आमच्या ध्यानी मनी देखील नाही.हे सगळे परीक्षेत पर्यावरण विषय शिकणे, आवश्यक तितके पास होण्यापुरते मार्क मिळवणे इथपर्यंतच मर्यादित आहे. माणसाने निसर्गाचे वस्त्रहरण केल्यामुळे वाढलेले तापमान, प्रदूषण,बदललेले ऋतुमान, त्यामुळे वाढलेली रोगराई याची आम्हाला अजूनही गंध वार्ता ही नाही. त्यावर गांभीर्याने विचार करावा, हे सगळे थांबविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत, याकडे प्राथमिक गरज म्हणून बघावे असे आम्हाला,आम्ही निवडून दिलेल्या सरकारला कुणालाच वाटत नाही.आम्ही आपापल्या घरात, आपल्या कुटुंबात,आपल्या कामात फार बिझी आहोत.ही काही नैसर्गिक,काही मानव निर्मित भयानक संकटे आपल्या दाराशी येऊन ठाकली आहेत याचे आम्हा कुणालाच भान नाही.

जो माणूस कोणे एकेकाळी एकमेकाच्या हातात हात घालून सहकार्याने,विवेक बुद्धीने इथपर्यंत कसा बसा पोहोचला तोच माणूस आज एक दुसऱ्याच्या उरावर बसतो आहे. तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद वाजवतो आहे,ही खरी आपली शोकांतिका आहे, आपणच लिहिलेली !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments