पूर्वी नुसत्या स्मितहास्यातही शुभेच्छा असायच्या. भेटल्यानंतर एक दुसऱ्याची विचारपूस मनाला सुखावून जायची.
मग आलं ग्रीटिंग कार्ड दिवाळी किंवा वाढदिवसाचं ग्रीटिंगकार्ड तर खूपच आनंद द्यायचं. तेही जर पोस्टाने आपल्या नावाने आलं तर मग काय अत्यानंदच !
बघता बघता मोबाईलचा काळ आला. गुड मॉर्निंग चे मेसेजेस पाठवणं सुरू झालं.
हे थो..ड..सं खर्चिक होतं. 😢
अगदीच गरजेचे मेसेजेस पाठवले जायचे,
व्हाट्सअँप नावाचं app आलं आणि सर्व चित्रंच बदलून गेलं.
एकतर हे फुकट होतं. मग त्यावर चित्रं आली, छान छान चित्रं.
फुलंपानं, पक्षी, गोजिरवाणी मुलं असं बरंच काही.
मग सगळे जण त्यावरून शुभेच्छा देऊ लागले. अगदी माणसं आठवून आठवून शुभेच्छा देऊ लागले तेव्हा छान वाटलं. अजूनही वाटतं म्हणा.
कोणीतरी आपली आठवण काढतय याची जाणीव खूप आनंददायी असते.
तेवढयासाठी लोकांनी फोन बदलले, अँड्रॉईड फोन घेतले, अँड्रॉईड फोन ची विक्री वाढली.😊
आता सर्व सणवारांच्या शुभेच्छा दिल्या जाऊ लागल्या. अगदी श्राद्धपक्षाच्या ही शुभेच्छा..?
नुसतं सुप्रभात किंवा गुड मॉर्निंग म्हटलं तरी त्या शुभेच्छा असतात. पण मग चित्रं, एखादं छानसं चित्रं असलं तरीही चालतं, पण अतिउत्साहात ४-५ अगदी १०-१२ चित्रं पण एकाच कारणासाठी ? 🙄पाठवतात. देव जाणे यातून काय साध्य होतं ?
काही काही सुविचार खरंच खूप छान असतात. पण त्याचाही अतिरेक ! इतके येतात की संपूर्ण जगातील वाईट गोष्टी संपल्या आहेत की काय ? असं वाटावं.
आता तर काय In Advance शुभेच्छा ?😃
जसं काय यांना कुठे बाहेरगावी जायचं आहे. आणि तिथे नेटवर्क नसणार आहे.
(सर्वात अगोदर आमच्याकडून अरे तुम्ही सुध्दा फॉरवर्ड करताय ना ? आणि फक्त तुमच्यासाठी हे तर धांदात खोटं, कारण दहा जणांना हाच मेसेज फॉरवर्ड केलेला असणार.)
सण येई पर्यंत यांच्या शुभेच्छा शिळ्या झालेल्या असणार !
पुन्हा हीच मंडळी सणाच्या दिवशी पण तेवढ्याच उत्साहाने परत तेवढीच चित्रं पाठवणार. या मंडळींना एवढाच उद्योग आहे का ?
आणि ही मंडळी कोणतेही मेसेज वाचत असतील की नाही ही शंकाच आहे. फक्त इकडंच तिकडे करतात.
असो.
आपण आपलं डिलीट करायचं काम करू या. दुसरं काय करू शकतो ?
आपल्याला काही सुचत असेल तर अवश्य कळवा. चांगल्या सुचनांना अवश्य प्रसिद्धी दिली जाईल ☺️

– लेखन : हर्षदा राणे
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800