अपार देणे आहे त्याचे कशास मागू मी काही
सांगा कोणती गोष्ट त्याने जी आपणा दिली नाही ?
तारे वारे नक्षत्रे ही सदैव दिमतीला असती
चंद्र चांदण्या सुरेख सुंदर अरूणोदय हो प्रभाती…
उष:काल हा किती मनोहर पूर्वेला ती नवलाई
झुळूझुळू वारा रोज गातसे चराचराला अंगाई …
पक्षी करती कुजन सुंदर बोली गोड किती त्यांची
सुमधुर ती भाषा किती हो देववाणी जणू साची..
भूमीतून त्या काय न मिळे? अन्नपूर्णा ती साक्षात
सोने लागते ठाई ठाई हरएक बात हो तिच्यात..
हिरवाईचे छत्र मनोहर पाचू नटली ती काया
फुले सुगंधी तऱ्हेतऱ्हेची अत्तराचा जणू फाया…
सुजलाम सुफलाम सरिता धावती पावन करती मनुजास
सहस्रधारांनी ती तृप्ती उपकारक तो पाऊस
गिरीशिखरे पावन मंदिरे सागरास त्या ये भरती
मर्यादा ना कधी सोडली करी मनुजावरती प्रीती…
किती मनोहर आहे सृष्टी कमी न काही ठेवियले
रूप मनोहर, बुद्धिचे ही वरदान सुपुत्रांना दिधले
हात लावता निघते सोने अशी दिली हो वसुंधरा
कृतज्ञतेने दात्याला या मनी मानसी नमन करा.

-रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक