आयुर्वेदाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर, त्याची उत्तरोत्तर प्रगती कशी झाली (मूळात तो प्रगतच आहे !) किंवा त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात अनेक थोर वैद्यांचा खूप मोलाचा सहभाग आहे, त्याबद्दल त्या सर्वांना शतश: नमन 🙏🙏🙏
ब्रिटीश काळात आयुर्वेदाची खूप हानी झाली. ब्रिटीशांनी ॲलोपॅथीला संरक्षण देऊन आयुर्वेदाला अवैधनिक, रहस्यमयी व केवळ धार्मिक विश्वास मानला व आयुर्वेदाचा नाश करण्याचा प्रयत्न केला. परिणामस्वरूप अनेक महान वैद्य, आयुर्वेदीक ग्रंथ आणि प्रक्रिया दबल्या गेल्या.
इ.स. १८३५ मध्ये कलकत्ता मेडीकल कॅालेजमधील आयुर्वेद शिक्षण कार्याला निंलबीत केले गेले. ग्रामीण भागात मात्र आयुर्वेद जिवंत राहीला.
कालांतराने इंग्रजांविरूध्द चिकित्साशास्रातील लढाई ‘आयुर्वेदीक राष्ट्रवाद’ म्हणून उदयास आली. विद्वान डॅव्हीड आर्नोल्ड ह्यांनी आयुर्वेदाच्या मूळ संस्कृत ग्रंथांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार खूप मोठ्या समुदायात झाला. त्याचा प्रभाव म्हणून की काय अनेक आयुर्वेदीक औषधालयांची निर्मिती झाली व आयुर्वेदाची जड मजबूत झाली.
१९ व्या शतकाच्या शेवटी व २० व्या शतकाच्या पुर्वार्धात आयुर्वेद चिकित्सा पध्दती संबंधीत पुस्तकांची भरपूर निर्मिती झाली.
उदा.- पहिले आयुर्वेदीक औषधालय इ.स. १८७८ मध्ये कविराज चंद्रकिशोरसेन कलकत्ता येथे चालू झाले.
त्या नंतर तब्बल २० वर्षांनी इ.स. १८९८ मध्ये तेलगू वैद्य पंडीत डी. गोपालचारलू यांनी मद्रास येथे औषधालय चालू केले. उत्तर भारतात स्री वैद्या
यशोदादेवी यांनी औषधालयाची स्थापना करून १०८ पुस्तके लिहीली.
इ.स. १९०७ मध्ये अखिल भारतीय आयुर्वेदीक काँग्रेसची स्थापना झाली. ह्यांच्या वार्षिक संमेलनामूळे आयुर्वेदाच्या पुन:रूत्थानाला गती मिळाली.
आजचा उत्तरप्रदेश म्हणजे तत्कालीन संयुक्त प्रांताने आयुर्वेदाच्या उन्नतीला खूप मोठा हातभर लावला.
३० आयुर्वेद पत्र-पत्रिका ह्या काळात प्रकाशित होत होत्या. जसे -धन्वतरी, वैद्य संमेलन त्रिका, सुधानिधी, अनुभव योगमाला, आयुर्वेद प्रचारक, वैद्य, राकेश,
आयुर्वेद केसरी इ.
जगन्नाथ शर्मा, किशोरी दत्तशास्री, शांडिल्य द्वीवेदी, रूपेंद्रनाथशास्री, जगन्नाथ प्रसाद शुक्ल, गणनाथसेन, शंकरदाजीपदे इत्यादी दिग्गज ह्या आंदोलनात सहभागी होते.
१८ वी शती – १९ वी शती ह्या काळात बऱ्याच ग्रंथांची निर्मीती झाली. त्यात सहभागी असणारे दिग्गज –
कवीराज गंगाधर राव (१७९८-१८६५) – मुर्शिदाबाद,
बलराम-आतङकतिमीरभास्कर -१८ वा शती आरंभ. वाराणसी.
शंकरभट्ट-वैद्यविनोद १७०५ ई., जयपूर.
कलादिबासवराज-शिवतत्वरत्नाकर१७०९ ई
धनपती-दिव्यरसेंन्द्रसार १८ वी शताब्दी.
नारायण-वैद्यामृत १८ वी शताब्दी.
राजवल्लभ (राजवल्लभ निघण्टू १८ वी शताब्दी)
महादेव उपाध्याय -आयुर्वेदप्रकाश १७१३
श्रीकण्ठ शंम्भू (वैद्यकसारसंग्रह१७३४ ई.)
नारायणदास-राजवल्लभीय द्रव्यगूण १७६० ई.
बटेश्वर-चिकित्सासागर १७८५ ई.
अनन्त -पारदकल्पद्रुम १७९२ ई
काशीनाथ/काशीराज –
अजीर्णमंजीरी/अमृतमंजीरी १८११ ई.
दिनकरज्योती – गुढप्रकाशिका/उपकारसार १८१८ ई.
देवदत्त -धातूरत्नमाला १८२८ ई
रणजितसिंह – कोबचिनीप्रकाश १८५५ ई
विष्णूवासुदेव गोडबोले – निघण्टूरन्ताकर १८६७ ई
के बीलाल सेनगुप्त – आयुर्वेदद्रव्याभिधान १८७६ ई
कवीराज विनोदलाल सेनगुप्त – आयुर्वेदविद्न्यान १८८७ ई
दत्ताराम चोबे- बृहतनिघण्टूरत्नाकर १८९१ ई
रघूनाथ इन्द्रजी -निघण्टूसंग्रह १८९३ ई
गोविंददास-भैषज्यरत्नावली १८९३ ई
उमेशचंद्रगुप्त- वैद्यकशब्दसिंधू १८९४ ई
कृष्णराम भट्ट-सिध्दभैषज्यमणिमाला १८९६ ई
लालाशालीग्राम वैश्य-शालीग्रामनिघण्टू १८९६ ई
स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर काही काळ आयुर्वेद उपेक्षित राहीला. स्वातंत्र्यानंतर संयुक्त चिकित्सा प्रणाली प्रभावीपणे काम करेल या उद्देशाने आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
१९६० मध्ये गुजरात आणि केरळमध्ये मेडीकल कॅालेज आणि विश्वविद्यालयाच्या विकासामध्ये प्रगती झाली परंतु आयुर्वेद चिकित्सा पध्दती मात्र नेपथ्यामध्येच राहीली.
२० व्या शतकाच्या शेवटी आणि २१ व्या शतकाच्या सुरवातीला आयुर्वेदामध्ये विशेष प्रयत्न केले गेले.
– केरळची आयुर्वैद्यशाला
– पतंजली आयुर्वेद (२००६) – स्वामी रामदेव,
– श्री.बालाजी तांबेंनी (फॅमिली डॅाक्टर) आयुर्वेदाला जनसामान्यांमध्ये स्थान मिळवून दिले.
भारत सरकारने २०१४ मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळाले .
२०२० मध्ये भारत सरकारने आयुर्वेदीक वैद्यांना काही प्रकारच्या शल्यचिकित्सा करण्यासाठी अनुमती दिली.(शल्य हे आयुर्वेदाचे प्रमूख अंग आहे.)
कोव्हीड पॅनडॅमिकच्या काळात देखील अनेक वैद्यांनी यशस्वी उपचार करून (आयुर्वेदाच्या मूळ तत्वांचा वापर करून) अनेक रूग्णांना मृत्यूशय्येतून बाहेर काढले आहे.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये आयुर्वेदाच्या साथीने रूग्णांवर होणाऱ्या दूष्परिणामांची (केमोथेरपी) तीव्रता, वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आयुर्वेदाच्या संहीता वाचनावर, मूलतत्वांवर अभ्यास करण्यासाठी अनेक वैद्य मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत, विद्यार्थी त्याचा फायद्या करून घेत आहेत. पर्यायाने आयुर्वेदाचे अध्ययन वाढत आहे, या क्षेत्रात रोज नवनविन प्रयत्न चालू आहेत.
चालू काळानूसार संहिताकालातील ज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येईल ? त्याद्दष्टीने नविन पिढी पुढे येत आहे. जनमानसात देखील आयुर्वेदाचे स्थान वाढत आहे.

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800